नटराजाच्या नित्य आराधनेने । अर्पिली नृत्यातुनी भावसुमने ।
अनुभवले देवत्व भावावस्थेतुनी । नृत्य-संगीताचा हा मिलाप होऊनी ।
लाभली आम्हा ही संतद्वयी । न्यावे आम्हासही सत्वर ईश्वरचरणी ।
या संगीत-नृत्य आराधनेतुनी । हीच प्रार्थना साधकांची संतद्वयींच्या चरणी ॥
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केली संतत्वाची घोषणा
- नृत्य आणि गायन यांच्या माध्यमातून संगीत आराधना करून संतपद प्राप्त केल्याचे दुर्मिळ उदाहरण !
शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या माध्यमांतून संतपदाला पोचलेले ठाणे
येथील एकमेवाद्वितीय पू. किरण फाटक आणि नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर !
‘तक्षशीला आणि नालंदा या विश्वविद्यालयांत १४ विद्या आणि ६४ कला शिकवल्या जायच्या. ‘हा इतिहास नुसता वाचण्यापेक्षा नवइतिहास निर्माण करावा’, असे अनेक वर्षे माझ्या मनात होते. त्यासाठी मी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ या संस्थेची वर्ष २००४ मध्ये स्थापना केली. ‘१४ विद्या आणि संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तीकला इत्यादी ६४ कला यांच्या माध्यमांतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, याचे शिक्षण ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’त द्यायचे’, असा माझा विचार होता. मला ६४ कलांपैकी एकाही कलेची काहीच माहिती नाही, तरी ‘देव माझ्या मनातील एकेक इच्छा कशी पूर्ण करतो’, याच्या अनुभूती देव मला देत आहे. ईश्वराने ‘पू. किरण फाटक यांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताद्वारे आणि नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर यांच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्याद्वारे साधनेत प्रगती करून संतपद गाठता येते’, याची मला ओळख करून दिली. याबद्दल मी पू. किरण फाटक आणि नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
‘इतर कलांच्या संदर्भातही देवाने माझी इच्छा अशीच पूर्ण करावी’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
रामनाथी (गोवा) – ईश्वरप्राप्तीचे माध्यम असलेल्या कलांना सध्या केवळ मनोरंजनाचे रूप आले आहे. आज मनोरंजनासाठी कला आत्मसात करणारे अनेक आहेत. अत्यंत रज-तम प्रधान वातावरणातही संगीतावर अत्यंत निष्ठा ठेवून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणारे कलाकार कलेच्या माध्यमातून साधना करणार्यांसाठी पथदर्शक आहेत. मोहमायेच्या विश्वात राहूनही पैसा, प्रसिद्धी यांच्या मागे न धावता कलेच्या माध्यमातून ईश्वराला अनुभवणारे ठाणे येथील प्रसिद्ध कथ्थक नृत्याचार्य डॉ. राजकुमार केतकर (वय ७१ वर्षे) आणि डोंबिवली येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. किरण फाटक (वय ६५ वर्षे) यांनी संगीताद्वारे साधना करणार्यांसमोर आदर्श ठेवला आहे. ‘समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रती भाव असणारे कथ्थक नृत्याचार्य डॉ. राजकुमार केतकर आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारे शास्त्रीय गायक श्री. किरण फाटक यांनी संगीताच्या माध्यमातून साधना करत संतपद गाठले आहे’, असे सनातनच्या आश्रमात २६ जानेवारी या दिवशी झालेल्या अनौपचारिक सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घोषित केले. या आनंदवार्तेने सर्वांचे मुखमंडल उल्हसित झाले, नकळत हात जोडले गेले आणि संतद्वयींच्या संगीतनिष्ठेप्रती सर्वांचा आदरभाव दुणावला. अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले सोहळ्याला उपस्थित राहिले.
सनातनचे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी पुष्पहार घालून, तसेच भेटवस्तू देऊन पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक यांचा सन्मान केला. पू. केतकर यांच्या पत्नी सौ. वैशाली आणि पू. फाटक यांच्या पत्नी सौ. संजीवनी यांना सनातनच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. देवी कपाडिया यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांनी सूत्रसंचालन केले.
२४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर आणि गायक पू. किरण फाटक यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. तेव्हा नृत्याचार्य पू. केतकर यांचे नृत्य आणि पू. किरण फाटक यांचे गायन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित साधकांना आलेल्या उच्च स्तराच्या अनुभूती त्यांनी कथन केल्या. सनातनचे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप अन् कु. मधुरा भोसले यांनी कार्यक्रमांच्या वेळी केलेले सूक्ष्म परीक्षण सांगितले.
सन्मानानंतर संतद्वयींनी व्यक्त केलेले मनोगत
‘आजच्या सन्मानामुळे कथ्थक ही कला किती प्राचीन
आहे, याची प्रचीती आली !’ – नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर
‘माझे गुरु (पंडित गोपीकृष्ण) मला म्हणत असत ‘राजा, जर तू ‘नटवर (श्रीकृष्ण)’ कोण होते, याचा प्रसार करशील, तर विद्यार्थ्यांना ते समजेल.’ ‘नृत्यआराधनेने माझी आज प्रगती झाली, यावरून कथ्थक ही प्राचीन, वेदकालिन विद्या आहे’, हे सिद्ध झाले. हा गुरुमहिमा आहे. माझ्यावर नटवराची (श्रीकृष्णाची) अशीच कृपा होऊ दे. आमची यापुढेही प्रगती होऊ दे, अशी प्रार्थना !’
‘ज्याच्यावर ईश्वराची कृपा आहे, अशीच व्यक्ती संगीताच्या माध्यमातून साधना करू शकते !’ – पू. किरण फाटक
भारतीय शास्त्रीय अभिजात संगीत मनापासून गायले जाते. आंतरिक लयीसह आंतरिक सूर येऊ लागल्यावर त्याच्या आनंदाने आपल्या पेशीपेशींचे नर्तन चालू होते. हे अनुभवणे ही खरी संगीताची व्याख्या ! ज्याचे प्रारब्ध चांगले आहे, ज्याच्यावर ईश्वराची कृपा आहे, अशीच व्यक्ती संगीताच्या माध्यमातून साधना करू शकते. ज्याने यापूर्वी ईश्वरभक्ती केली आहे, तीच व्यक्ती संगीताकडे वळते. संगीत ही ईश्वराची देणगी आहे. ती देणगी ज्याला मिळते, तो संगीताचा साधक बनतो. आजकाल सहस्रो लोक संगीत शिकतात; मात्र त्यातील कलाकार कोणी होत नाही. अगदी कोणी कलाकार झाले, तरी ते पैसा आणि प्रसिद्धी यांच्या मागे धावतात.’
साधकांनी व्यक्त केलेले मनोगत
१. डॉ. (कु.) आरती तिवारी
१ अ. पू. केतकर यांचे नृत्य पाहतांना ध्यानावस्था अनुभवली !
पू. केतकरकाका नृत्य करतांना माझ्या मनात कोणतेच विचार नव्हते. नृत्य पाहतांना प्रथमच माझे ध्यान लागले होते. त्यांच्या शंकानिरसन सत्राच्या वेळी ‘मला वाईट शक्तींमुळे होणारा त्रास अल्प होत आहे’, असे जाणवत होते. इतके ज्ञानी असूनही ते नम्र आहेत. ते प्रत्येक वेळी ‘तुम्ही सांगाल, तसे करूया’, असे म्हणत होते.
१ आ. पू. फाटककाका गातांना निर्गुण स्तराची अनुभूती आली !
देवतांची भक्तीगीते ऐकतांना मला देवतेचे दर्शन होत होते; पण पू. फाटककाका श्रीरामावरील बंदिश गातांना मला श्रीरामाचे सगुण रूपातील दर्शन न होता पिवळा प्रकाश दिसला. गायन ऐकतांना निर्गुण स्तरावरील अनुभूती प्रथमच आली. (बंदिश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. याला ‘छोटा ख्याल’, ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा दृत लयीत गातात.)
२. सौ. अनघा जोशी
पू. केतकर आणि पू. फाटक यांचा चैतन्यदायी सहवास दिल्याविषयी मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञ आहे. दोघांकडून चैतन्यदायी लहरींचे प्रक्षेपण होत होते. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुरांचे दर्शन झाले. त्यांच्यातील अत्यंत उत्कट भावामुळे ‘सोहळ्याच्या वेळी त्यांच्याकडून आनंदाचा स्रोत दर्शकांकडे येत आहे. प्रत्येक स्वरातून त्यांच्या संगीताच्या साधनेचे दर्शन होते’, असे मला जाणवले.
वयानुसार येणार्या शारीरिक मर्यादांवर मात करून आध्यात्मिक बळावर
संगीतसाधना करणारे पू. किरण फाटक आणि नृत्यसाधना करणारे नृत्याचार्य पू. (डॉ.) केतकर !
नृत्याचार्य पू. (डॉ.) केतकर वयाच्या ७१ वर्षीही नृत्य करतात, तर पू. फाटक हे ६५ व्या वर्षीही गायन करतात. ‘या वयात ही साधना शारीरिक स्तरावरही कशी शक्य होते’, या प्रश्नाला पू. (डॉ.) केतकर आणि पू. किरण फाटक यांनी दिलेले उत्तर त्यांची संगीतसाधनेवरील निष्ठा दर्शवते. तरुणांनाही लाजवेल, असे उत्तर त्यांनी दिले.
अ. पू. किरण फाटक
ती ऊर्जा वेगळी आहे. तीच एवढे बळ देऊ शकते. मला आधुनिक वैद्यांनी ‘खाली बसू नये’, असे सांगितले आहे. तरीही मी सलग २ – २ घंटे बसून गायन करू शकतो.
आ. नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर
ॐ च्या उच्चाराने नाभीपासून शक्ती येते. मला माझे गुरु पंडित गोपीकृष्ण समोर दिसतात. त्यांनी एकदा सलग ९ घंटे नृत्य केले होते. शेवटी आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानंतर काही जणांनी त्यांना थांबवले होते. जो साधक बनतो, त्यालाच ती ऊर्जा प्राप्त होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची नम्रता !
नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक यांनी कक्षात प्रवेश केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या दोघांनाही खाली वाकून नमस्कार केला. वास्तविक नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक हे वयाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापेक्षा लहान आहेत. तसेच परात्पर गुरु डॉक्टरांनाही अत्यंत शारीरिक त्रास होत आहेत. असे असूनही श्रीगुरूंनी स्वतःच्या कृतीतून दिलेली ही शिकवण त्यांचे अलौकिकत्व दिसते.
पू. किरण फाटक यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !
‘तुमच्या रूपाने स्वामी समर्थच बसले आहेत. तुम्ही खरेच पूजनीय आहात’, असे म्हणून पू. फाटक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना चरणस्पर्श केला.
पू. (डॉ.) राजकुमार केतकर यांनीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार केला.
‘सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर योग्य
मार्ग मिळाला !’ – शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत संशोधनात सहभागी असलेले ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस या वेळी म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर मला योग्य मार्ग मिळाला आहे. आता मला ‘संगीतातून ईश्वरप्राप्ती व्हावी’, याचा ध्यास लागलेला असतो. ‘मला केवळ आनंद हवा आहे’, असे वाटते. सनातन संस्थेचा मी आभारी आहे.’’
श्री. प्रदीप चिटणीस यांची विनम्रता !
माझ्या माध्यमातून नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक यांच्याशी संपर्क झाल्यामुळे ‘हा सोहळा माझ्यामुळे झाला’, असे येथे सांगितले. प्रत्यक्षात मला गुरुदेवांनीच बुद्धी दिली. ईश्वरानेच मला या दोघांची नावे सुचवली. त्यांनीही संपर्कासाठी वेळ दिला. ‘ऋषितुल्य नृत्याचार्य पू. (डॉ.) राजकुमार केतकर आणि गायनाचार्य पू. किरण फाटक यांच्याविषयी बोलावे’, अशी माझी क्षमता नाही. ते ज्ञानी आहेत.’’
सनातनचे आश्रम आणि साधक यांच्याविषयी उपस्थितांनी काढलेले गौरवोद्गार !
१. पू. किरण फाटक : कु. तेजल पात्रीकर हुशार आहे. तिचा सेवाधर्म उच्च प्रतीचा आहे. येथे सर्वांचाच सेवाभाव चांगला आहे. त्याला मी हात जोडतो. येथे कोणाला राग येत नाही.
२. सौ. संजीवनी किरण फाटक : आश्रमात येऊन आम्हाला आनंद झाला.
३. सौ. वैशाली राजकुमार केतकर : सनातनच्या आश्रमातील अनुभव सात्त्विक होता. येथे शांतता आहे. सर्वजण अत्यंत प्रेमाने वागतात. आश्रमाचे ते वैशिष्ट्य आहे.