‘विवाहसंस्कारा’संबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण

 

 

खंडण करण्यामागील उद्देश

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, धार्मिक विधी, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते. काही लोकांना ती टीका खरी वाटते, तर अनेकांना ती टीका विखारी आहे’, हे लक्षात येऊनही टीकेचे खंडण करणे शक्य होत नाही. काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी अयोग्य विचार मांडले जातात.

 

असे सर्वच अयोग्य विचार आणि टीका यांचा योग्य प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते अन् त्यामुळे धर्महानी होते. ही धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना बौद्धिक बळ प्राप्त व्हावे, यासाठी ‘विवाहसंस्कारा’संबंधी अयोग्य विचार आणि टीका यांचे खंडण पुढे दिले आहे.

 

 

१. शास्त्र जाणून न घेता ‘कन्यादाना’ला रानटी म्हणणारे आंग्लाळलेले भारतीय !

टीका

‘सालंकृत कन्यादान म्हणजे हुंडा ! कन्या ही का दान करण्याची वस्तू आहे ? कन्यादान हे रानटीपणाचे आहे. स्त्रीला विनिमयाची वस्तू बनवणार्‍या रानटी संस्कृतीची ही अवस्था आजही टिकून आहे.

खंडण

१. कन्यादान करण्यामागे पवित्र हेतू असणे

‘संत तुकाराम महाराज सांगतात, `सालंकृत कन्यादान, पृथ्वीदानासमान ।’ संत तुकाराम महाराज रानटी होते का ? प्रेमविवाह हा ‘गांधर्व विवाह’ आहे. गांधर्व विवाहात कन्यादान हा प्रकार नाही.

कन्यादान म्हणजे हुंडा नव्हे ! कन्यादान शुल्क नाही. शुल्क (म्हणजे हुंडा इत्यादी) मिळावे, अशी अपेक्षा नाही. ती बुद्धीच नाही. सालंकृत कन्यादान ! विवाहप्रसंगी तिला तिचे वडील, भाऊ, आप्त इत्यादी सुवर्णादी अलंकार देतात, ते सालंकृत कन्यादान ! शुल्क बुद्धीचा तिथे अभावानेही गंध नाही. `दान’ याचा अर्थ ‘समर्पण’ हे विसरू नका.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ११.९.२००८)

२. ‘हुंडा’ आणि ‘दान’ यांमध्ये भेद असून अलंकार हे मुलीचे ‘स्त्रीधन’ असणे

लग्नात वधूपित्याने मुलीला दिलेले अलंकार हे स्त्रीधन असते. त्यावर केवळ तिचाच अधिकार असतो.

कन्यादानाच्या विधीत वधुपिता वराला म्हणतो, ‘ही सुस्वरूप, सुदृढ आणि सुवर्णाच्या अलंकारांनी युक्त अशी कन्या ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घेण्याच्या इच्छेने, तसेच पितरांचा उद्धार करण्यासाठी आपणांस पंचभूतांच्या आणि देवतांच्या साक्षीने श्रीविष्णुप्रमाणे समजून देतो.’ तेव्हा वर वधुपित्याला सांगतो, ‘धर्म आणि प्रजा यांच्या सिद्धीसाठी मी या कन्येचा स्वीकार करतो.’ यावरून हुंडा आणि दान यांतील भेद स्पष्ट होतो, त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही.

 

२. म्हणे, विवाहपूर्व एकत्र राहून स्वभाव जाणून घेतल्याने घटस्फोटांचे प्रमाण अल्प होईल !

टीका

‘विवाहपूर्व एकत्र राहून स्वभाव जाणून घेतल्याने घटस्फोटांचे प्रमाण अल्प होईल !’ – डॉ. प्रमोद साळगावकर (पणजी, गोवा येथील ‘ब्रागांझा इन्स्टिट्यूट’ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केलेले विचार)

खंडण

१. एकाशी स्वभाव जुळत नसल्याचे लक्षात आल्यावर दुसर्‍यासमवेत रहाणे, हाही एकप्रकारे घटस्फोटच असणे

‘काही काळ विवाहपूर्व एकत्र राहून स्वभाव जाणून घेतल्याने घटस्फोटांचे प्रमाण अल्प होईल’, हे म्हणणे कितपत योग्य आहे ? प्रारंभी एकत्र रहायचे, न जमल्यास वेगळे व्हायचे, हाही एकप्रकारे घटस्फोटच असेल. अमेरिकेत विवाहपूर्व एकत्र राहून स्वभाव जुळत नाहीत, हे लक्षात आल्यावर बरेच जण दुसर्‍यासमवेत रहातात. असे कितीतरी जणांसह एकत्र रहाण्यात आयुष्य निघून जाते. याला घटस्फोटांचे प्रमाण अल्प व्हायला साहाय्य झाले, असे म्हणता येईल का ?

२. अती स्वैराचाराने मानसिक अस्वस्थता वाढणे

अती स्वैराचाराने मानसिक अस्वस्थता वाढून जीवन सुखी, समाधानी आणि स्थिर रहात नाही; म्हणूनच आता पाश्चात्त्यांनाही कुटुंबसंस्थेचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

३. विवाहाविषयीचा साम्यवादी दृष्टीकोन

३ अ. म्हणे, विवाहामुळे मुक्त जीवनाला (स्वैर जीवनाला) प्रतिबंध येतो !

अयोग्य विचार

‘अनुवंश, कुलाचार, परंपरा असा सगळा धर्म आहे. धर्म माणसाला हाता-पायाच्या साखळदंडासारखा आहे’, असे साम्यवादी मानतात. विवाहामुळे मुक्त जीवनाला (स्वैर जीवनाला) प्रतिबंध येत असल्यामुळे, म्हणजेच कामवासनेची तृप्ती होत नसल्यामुळे विवाह हा मार्क्स आणि आजच्या आधुनिकांनी त्याज्य ठरवला. ते Glass-Water Theory अनुसरतात, म्हणजे ‘तहान लागली की, पाणी प्यायचे. त्यासाठी भांडे जवळ बाळगण्याची काय आवश्यकता’, असे साम्यवाद्यांचे मत आहे. तसेच ‘मुलांचे पोषण आणि संगोपन शासन करील’, असे ते म्हणतात.

खंडण
१. हिंदूंची समाजरचना धर्मशास्त्राप्रमाणे असून विवाहाच्या माध्यमातून मानवहित साधलेले असणे

‘संततीचे संगोपन आणि पोषण करण्याला (खाजगी) आई-वडिलांपेक्षा शासन अधिक सक्षम आहे’, असे हे साम्यवादी सांगतात. असा समाज किती वर्षे टिकेल ? साम्यवाद जन्माला आला, तेव्हापासून अवघ्या ६०-७० वर्षांत तो कोलमडला. रशिया छिन्नभिन्न झाले. आमची समाजरचना शास्त्राप्रमाणे आहे. आम्हा हिंदूंच्या विवाहाचे हेतू सुप्रजा निर्माण करणे, धर्म आणि संस्कृती यांचे चिरंजिवित्व राखणे, मानवाचे ऐहिक हित साधणे आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त करून घेणे, हे आहेत. आम्ही जातीधर्म, कुलधर्म आदींचे पालन करून अनुवंशाचे अबाधित्व राखतो. आमच्या विवाहामुळे निर्माण होणारा वंश हा जोवर भूलोकी नद्या, पर्वत, अरण्ये आहेत, तोवर राहिला पाहिजे.’ (साप्ताहिक सनातन चिंतन, ६.११.२००८)

२. विवाहामुळे समाज सदाचारी होणे, तर स्वैराचारामुळे तो अधोगतीकडे जाणे

‘मानवासहित सर्व भोगयोनी आहेत; परंतु मानव हाच केवळ भोगावर नियंत्रण ठेवून साधना करून आत्मोन्नती करू शकतो. यासाठी विवाहाचे महत्त्व आहे. आत्मोन्नती हेच मानवी जीवनाचे लक्ष्य आहे आणि मानवातील भोगवासना केवळ प्रजोत्पत्तीसाठीच आहे. विवाहामुळे आनंद आणि आत्मीयता लाभून जीवन सुखकर होते, समाज सदाचारी होतो, तर स्वैराचारामुळे माणसावर बंधन न राहिल्याने तो व्यसनाधीन होऊन भरकटत जातो. स्वैराचारामुळे जीवन आधाररहित होऊन अंतिमतः मानवाची अधोगतीच होते. स्वैराचाराचे पाश्चिमात्त्यांवर झालेले दुष्परिणाम आता दिसून येत आहेत.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

३ आ. व्यभिचाराला ‘कामसंतर्पणा’चे नाव देऊन लोकांची दिशाभूल करणारे साम्यवादी !

अयोग्य विचार

‘तो व्यभिचार नव्हे. ते कामसंतर्पण आहे’, असे साम्यवाद्यांचे मानणे आहे. कामतृप्तीसाठी विवाहबाह्य संबंधाला आजचा समाज मान्यता देतो.

खंडण
१. व्यभिचारामुळे अनीतीचे समर्थन होणे

‘याचा अर्थ आधुनिक समाजाला व्यभिचार मान्य आहे ! ‘कामसंतर्पण’ हे सगळे थोतांड आहे. व्यभिचार हा नेहमी सुडाच्या स्वरूपाचा असतो. व्यभिचार करणार्‍या व्यक्ती प्रेमभावना इत्यादी सांगून आपल्या अनीतीचे नेहमी समर्थन करू पहातात. ज्यांच्यामध्ये अहंगड असतो, त्यांच्यामध्ये भावना अधिक प्रबळ असतात. भावनांमुळे कोणत्याही गोष्टींचे समर्थन होऊ शकत नाही.’ (साप्ताहिक सनातन चिंतन, ६.११.२००८)

२. व्यभिचारातून निर्माण होणारी संतती वाईट मार्गाला लागल्याने समाजाची घसरण होणे

‘कामतृप्तीसाठी विवाहबाह्य संबंधाला आजचा समाज मान्यता देत असला, तरी त्याचे दुष्परिणामही पाहिले पाहिजेत. विवाहामुळे कुटुंबव्यवस्थेतून निर्माण होणार्‍या मुलांना सुसंस्कार, प्रेम आणि सुरक्षितता लाभते; परंतु व्यभिचारातून निर्माण होणारी संतती या सर्वांपासून वंचित राहिल्याने व्यसनाधीन होऊन वाईट मार्गाला लागते. यामुळेच समाजाचीही घसरण होते. विदेशात याचमुळे अनाचार माजला आहे. वासना नित्य प्रेम देऊ शकत नाही. व्यभिचार, स्वैराचार यांमुळे एडस् सारखे रोग उत्पन्न होऊन त्याचे वाईट परिणाम पुढे भोगावे लागतात, म्हणजेच अल्पकाळाच्या कामतृप्तीसाठी माणूस स्वतःच्या आयुष्याचा नाश करतो. अशा तात्पुरत्या सुखाला काय अर्थ आहे ?’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment