श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना सोहळ्याच्या निमित्ताने रामनाथी येथील सनातन आश्रमात पार पडले धार्मिक विधी

ब्रह्मादिक तुज ध्याती गुण संकीर्तन करिती ॥
परब्रह्मरूपिणी माते महालक्ष्मी जय जय जय ॥

श्री भवानीदेवीची भावमुद्रा

रामनाथी (गोवा) – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे असणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, यासाठी साधकांना आध्यात्मिक बळ देण्यासाठी श्री भवानीदेवीचे १९ जानेवारी या दिवशी चैतन्यमय वातावरणात मिरवणुकीद्वारे येथील सनातन आश्रमात शुभागमन झाले. हंगरहळ्ळी (तालुका कुणीगल, कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या आज्ञेने येथील सनातन आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची स्थापना होत असून त्यानिमित्ताने देवीचा सोहळा साजरा होत आहे. २० जानेवारी या दिवशी आश्रमात भावपूर्णरित्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीप्रतिष्ठापनेचे विविध धार्मिक विधी करण्यात आले. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावेत’, असा संकल्प करून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री गणपतिपूजन केले.

श्री भवानीदेवी मूर्ती प्रतिष्ठापनेचा संकल्प करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि शेजारी पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी

सनातन संस्थेचे साधक दांपत्य श्री. नीलेश आणि सौ. नंदिनी चितळे यांनी पुण्याहवाचन हा विधी केला, तर पुरोहितांनी वास्तुदेवता, ब्रह्मादिमंडलदेवता आणि नवग्रहदेवता यांचे आवाहन अन् पूजन केले. या वेळी नवग्रह होम, प्रासादवास्तु होम आणि मुख्य देवता होमही करण्यात आले. या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासह सनातन संस्था आणि एस्.एस्.आर्.एफ्. (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन) यांचे संत अन् साधक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment