सनातन संस्थेच्या इतिहासात लिहिला जाणारा एक सुवर्णमयी भावक्षण
शरणागतदीनार्त परित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवि नारायणी नमोस्तुते ॥
‘हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आध्यात्मिक बळ देणार्या श्री भवानीदेवीच्या कृपेने आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे’, हीच तिच्या चरणी आर्ततेने प्रार्थना !
रामनाथी (गोवा) – ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या या सृष्टीचे परिचालन होते ते शक्तीच्या आधारेच ! श्रीविष्णु विराजमान असलेल्या वैकुंठामध्ये जिचा अखंड वास असतो तीही शक्तीच ! जिने अनेक दैत्यासुरांचा नाश करत भक्तांचे रक्षण केले आणि जिने छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वतःची तलवार देऊन त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आश्वस्त केले, ती श्री भवानीदेवी ! छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्या भवानीदेवीचे पूजन केले, तिची आयुष्यभर भक्ती केली आणि ‘जय जगदंब’, ‘जय भवानी’ या घोषात शत्रूंना नामोहरण केले आणि तिच्याच आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. १९ जानेवारी २०२० या दिवशी त्याच श्री भवानीदेवीचे शुभागमन येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात झाले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, यासाठी श्री भवानीदेवी येथील सनातनच्या आश्रमात विराजमान होणार आहे. सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीने स्थानापन्न होणे, हा इतिहासात लिहिला जाणारा एक सुवर्णमयी भावक्षणच आहे. त्यामुळे देवी आश्रमातच विराजमान होणार असल्यामुळे साधकांना आनंद तर झालाच; पण त्याही बरोबर अनेक साधकांचा भाव वृद्धींगत झाला.
पारपतीवाडा (बांदोडा) येथून सायंकाळी ५.२५ वाजता ‘श्री भवानीदेवीचा विजय असो’, ‘जय भवानी, जय अंबे’ असा देवीचा जयघोष करत फुलांनी सजवलेल्या वाहनातून रामनाथी आश्रमापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मिरवणुकीच्या प्रारंभी देवीचे पुष्पहार अर्पण करून औक्षण केले. या वेळी पारंपरिक वेशात उपस्थित साधकांनी हातात भगवे ध्वज घेतले होते. याचसमवेत मिरवणुकीमध्ये ध्वनीक्षेपकावर देवीची भक्तीगीते लावण्यात आली होती.
सायंकाळी ६.१० वाजता मिरवणुकीद्वारे देवीच्या मूर्तीचे पुरोहितांनी केलेल्या शंखनाद करत आश्रमाच्या प्रवेशद्वारी शुभागमन झाले. अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवीचे दर्शन घेतले. देवीच्या स्वागतासाठी आश्रमात सनातन संस्थेचे संत, साधक यांच्यासह एस्.एस्.आर्.एफ्.चे (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे) साधकही पारंपरिक वेशभूषेत नमस्काराच्या मुद्रेत उभे होते. या वेळी त्यांनी देवीच्या मूर्तीवर फुले वाहिली. यानंतर वेदमंत्रांच्या घोषात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री भवानीदेवीचे पंचोपचार पूजन केले.