शिष्य होणे म्हणजे काय ?

अनुक्रमणिका

आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणार्‍या साधकाच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अधिक असते; पण गुरूंचे मन जिंकण्यासाठी चांगला शिष्य होणेही आवश्यक असते. शिष्यत्वाचे महत्त्व, इतर नाती आणि शिष्य यांच्यातील भेद (फरक) तसेच गुरु कोणाला करावे, याविषयीची तात्त्विक माहिती पुढील लेखातून समजून घेऊया.

 

१. शिष्य या शब्दाची व्याख्या आणि अर्थ

अ. आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जो गुरूंनी सांगितलेली साधना करतो, त्याला शिष्य असे म्हणतात. कुलार्णवतंत्रात शिष्याची व्याख्या करतांना म्हटले आहे,

शरीरमर्थप्राणांश्च सद्गुरुभ्यो निवेद्य यः ।
गुरुभ्यः शिक्षते योगं शिष्य इत्यभिधीयते ।।

अर्थ : जो तन, धन आणि प्राण (म्हणजे सर्वस्व) गुरूंना समर्पण करून त्यांच्याकडून योग शिकतो (म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना करतो), त्याला शिष्य म्हटले जाते. (म्हणूनच बायकोमुलांना अगदी वार्‍यावर सोडून जरी शिष्य गुरूंकडे गेला, तरी त्याला पाप लागत नाही.)

 

२. शिष्यत्वाचे महत्त्व

अ. देव, ऋषि, पितर आणि समाज ही चार ऋणे शिष्याला फेडावी लागत नाहीत.

आ. गुरुपुत्रो वरं मूर्खस्तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा ।
शुभकर्माणि सर्वाणि दीक्षाव्रततपांसि च ।। १५१ ।। – श्री गुरुगीता

अर्थ : गुरुपुत्र या पदवीस योग्य असा गुरुसेवक शिष्य, व्यवहारात भोळसट असला, तरी त्याच्या दीक्षा, व्रते, तप, वगैरे साधना सिद्धीस जातात. गुरुसेवक नसणार्‍यांना तसे फळ मिळत नाही.

 

३. विद्यार्थी आणि शिष्य यांमध्ये कोणता भेद आहे ?

गुरु आणि शिक्षक यांच्यात भेद आहे, त्याचप्रमाणे शिष्य आणि विद्यार्थी यांच्यातही भेद आहे. शिक्षकाचे शुल्क दिले की, विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा हिशोब पूर्ण होतो; पण गुरु आत्मज्ञानच देत असल्याने गुरूंसाठी काहीही आणि कितीही केले तरी ते थोडेच असते. लहानपणी आईवडिलांनी आपले सर्व केलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण कितीही केले, तरी ते थोडेच असते, तसेच हेही आहे.

 

४. माध्यम आणि शिष्य

‘माध्यम म्हणून एखादा कार्य करतो, तेव्हा त्याची प्रगती होत नाही. तो परप्रकाशी रहातो. याउलट गुरु शिष्याकडून कार्य करवून घेतात, तेव्हा ते शिष्याची क्षमता वाढवतात; जसे श्री रामकृष्णांनी विवेकानंदांचे आत्मबल वाढवले आणि मग त्यांच्याकडून कार्य करवून घेतले.’ – प.पू. भक्तराज महाराज (सनातन संस्थेचे श्रद्धास्थान)

 

५. साधक आणि शिष्य

साधकाने स्थूल जगात अडकू नये म्हणून त्याने सगुणाबरोबर निर्गुण-तत्त्वाची उपासना करणे आवश्यक असते. गुरुप्राप्ती झाल्यावर सगुणातील निर्गुणाची, म्हणजे मायेतील ब्रह्माची, अनुभूती येण्यासाठी सगुणातील गुरूंची सेवा करणे आवश्यक असते.

 

६. गुरु-शिष्य नातेच खरे कसे ?

या जगात गुरु-शिष्य हे नाते पवित्र मानलेले आहे. हे एकच नाते खरे आहे. गुरु-शिष्य संबंध फक्त आध्यात्मिक स्वरूपाचे असतात. शिष्याला ‘माझा उद्धार व्हायला हवा’ ही एकच जाणीव असली पाहिजे. गुरूंना एकच जाणीव असते की, ‘याचा उद्धार व्हायला हवा.’ गुरु-शिष्याचे नाते हे वयपरत्वे नसते. हे नाते ज्ञानवृद्धि आणि साधनावृद्धि यांच्यावर आधारलेले असते. जीवसृष्टीतील सर्व प्राणी ज्ञान आणि साधना यांच्याच माध्यमातून अभिवृद्धि साधत असतात. बाकी सर्व नाती भीतीच्या किंवा सामाजिक बंधनांच्या पोटी आलेली असतात; म्हणून त्यांच्याशी व्यवहार सीमित असतो. त्या नात्यांत अहंभाव सातत्याने राखला जातो. त्या नात्यांत ज्ञान आणि साधनेला किंमत नसते. अहंभाव राखणे म्हणजेच नाती टिकविणे. अहंभाव राखणारी सर्व नाती खोटीच असतात.

 

७. गुरुप्राप्तीसाठी काय करावे ?

अ. गुरु शोधू नये

सामोरे श्री गुरुदेवरूप आले । ज्ञानचक्षुवीण कैसे कळे ।।

(संत भक्तराज महाराज विरचित भजनामृत, भजन क्र. १९ : ओळखा तो देव कोठे जागा आहे ।)

ओळख पटेना जरी तुम्हासी । लीन व्हावे श्रीचरणासी ।
देतील ओळख स्वस्वरूपाची । शुद्ध प्रेमे चित्त वेधी ।।

(संत भक्तराज महाराज विरचित भजनामृत, भजन क्र. ९३ : रामरूपी रामरंगी ।)

गुरु शोधून सापडत नाहीत; कारण गुरुतत्त्व सूक्ष्मतम आहे आणि साधकाला फक्त स्थूल आणि थोडेफार सूक्ष्म एवढेच कळत असते. अध्यात्मात शिष्याने गुरु करायचे नसतात, तर गुरुच शिष्य करतात, म्हणजे तेच शिष्याची निवड आणि सिद्धता करतात. साधकाचा आध्यात्मिक स्तर ५५ प्रतिशतहून अधिक झाला की, गुरु स्वतःहून त्याच्याकडे येऊन त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात. साधकाचा आध्यात्मिक स्तर ४० प्रतिशत इतका न्यून असला ; पण त्याचे मुमुक्षुत्व तीव्र असले, तरीही त्याला गुरुप्राप्ति होते. थोडक्यात म्हणजे गुरु शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिष्य म्हणून लायक होण्याचा साधकाने प्रयत्न करावा.

आ. गुरूंची परीक्षा घेऊ नये

‘विचार करून, म्हणजे डोळसपणे श्रद्धा ठेवायची असे जर ठरले, तर गुरूंची परीक्षा घ्यावी लागेल. परीक्षक हा परीक्षार्थीपेक्षा वरचढ असावा लागतो. शिष्य तसा नाही. यासाठी आपण उत्तम शिष्य कसे होऊ, हा एकच ध्यास साधकाने घ्यावा.

इ. स्वतःच स्वतःला कोणाचाही शिष्य समजू नये

अमुक एका गुरूंचा मी शिष्य आहे, असे समजू नये. गुरूंनी म्हटले पाहिजे की, हा माझा शिष्य आहे. एखाद्या तरुणाने मनाशी ठरविले की, अमुक एक तरुणी माझी प्रेयसी आहे, तर त्याचा उपयोग नाही. तिनेही तसे म्हटले पाहिजे. तसेच गुरु-शिष्य संबंधातही असते.

ई. गुरु कोणाला करावे ?

‘प्रत्येकाने निर्गुणातल्या गुरूंचे शिष्य व्हावे. नुसत्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी होऊ नये. एकदा तुम्ही निर्गुणाला जाणले की, मगच तुम्हाला सगुणाला ओळखता येईल. एकदा तुम्ही निर्गुणाला जाणले की, तुम्ही कुठे आहात हे कळेल. (निर्गुणातल्या गुरूंचे शिष्य म्हणजे निर्गुणाची अनुभूती सतत घेत असलेल्या परात्पर गुरूंचे किंवा नामाचे शिष्य.)

उ. गुरु आणि शिष्य यांचा चार आश्रमांतील आश्रम

ब्रह्मचार्‍याला ब्रह्मचर्याश्रमी, वानप्रस्थाश्रम्याला वानप्रस्थाश्रमी आणि संन्यासाश्रम्याला संन्यासाश्रमी गुरु अधिक जवळचे वाटतात. गृहस्थाला मात्र ब्रह्मचर्याश्रमी, वानप्रस्थाश्रमी, संन्यासाश्रमी किंवा गृहस्थाश्रमी गुरु केले, तरी ते जवळचे वाटतात.

 

८. शिष्याचा अहंकार नष्ट होणे आवश्यक !

गुरुविना तरणोपाय नाही, हे प्राथमिक अवस्थेतील प्रत्येक साधकाने वाचलेले असते, तर पुढच्या अवस्थेतील साधकाने अनुभवलेले असते. गुरुप्राप्तीसाठी निश्‍चितपणे काय करायचे, हे ठाऊक नसल्याने बर्‍याच साधकांच केवळ वर्तमान जन्मच नव्हे, तर पुढील कित्येक जन्म वाया जातात. गुरुप्राप्ती होण्यासाठी एखाद्या आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांचे मन जिंकायला लागते, तर अखंड गुरुकृपा होण्यासाठी गुरूंचे मन सातत्याने जिंकता यावे लागते. याचा सोपा मार्ग म्हणजे उन्नत आणि गुरू यांना अपेक्षित असेल ते करत रहाणे. त्यांना एकाच गोष्टीची अपेक्षा असते आणि ती म्हणजे साधना.

साधनेच्या पुढच्या टप्प्यात तन, मन, धन अन् प्राण हे सर्व श्री गुरूंना अर्पण करायचे असतात. तसे टप्प्याटप्प्याने करता शिष्य स्वतःत गुण असले पाहिजेत, गुरूंविषयी भाव कसा असावा, गुरुबंधूंशी कसे वागावे, शिष्याचे एकंदरीत जीवन कसे असावे, हे शिकत जातो.

अ. अहंकार नष्ट झाल्यावरच गुरु ज्ञान देतात !

ईश्‍वरप्राप्ती हे ध्येय साध्य करण्यासाठी मनुष्याने सातत्याने साधना करणे आवश्यक आहे. ज्ञानयोग, कर्मयोग इत्यादी योगमार्गांने साधना करतांनाही संत किंवा गुरु यांचे मार्गदर्शन आवश्यकच असते; अन्यथा अहंकाराचे वादळ त्याची साधनारूपी नौका परमार्थाच्या पैलतीरी पोहोचण्याआधीच नष्ट करते. संत किंवा गुरु प्रथम अहंकार नष्ट करतात; मगच आत्मज्ञान देतात. ते जीवनात येण्यासाठी स्वतःत साधकत्व निर्माण होणे महत्त्वाचे आहे.

आ. गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात करण्यासाठी शिष्याचा अहं दूर होणे आवश्यक !

जसे समुद्रातील पाणी कितीही काढून घेतले, तरी ते संपत नाही. त्याचप्रमाणे गुरूंनी शिष्याला ज्ञान दिले, तरी गुरूंचे ज्ञान न्यून होत नाही. शेतात असणारे जंतू आणि किडे मारण्यासाठी प्रथम ते वाळवले जाते अन् नंतर शेतात पेरणी केली जाते. शिष्याला ज्ञान देण्यापूर्वी गुरु त्याचा अहं दूर करतात. पाणी भरतांना भांड्यातील हवा बाहेर गेल्यावरच पाणी त्या भांड्यात भरले जाते. त्याचप्रमाणे शिष्याचा अहं न्यून झाल्याविना गुरु देत असलेले ज्ञान तो आत्मसात करू शकत नाही. – (पू. बाळाजी आठवले यांचे विचारधन : खंड २)

इ. गुरु ज्ञान देऊन जिवाचा अहं न्यून करतो !

गुरु-शिष्य यांतील सर्वोच्च नाते केवळ शब्दातीत ज्ञानापुरतेच मर्यादित असते. गुरु शिष्याला चित्ताच्या स्तराला नेऊन त्याच्यावर ज्ञानरूपी गुह्यतेचा चैतन्याच्या भाषेत संस्कार करून त्याला मायारूपी भवसागर तरून जाण्याचे प्रशिक्षण देतो. गुरु हा प्राणदायक अन् जीवहारक आहे. गुरु ज्ञान देऊन जिवाचा अहं न्यून करतो. ज्या वेळी गुरूंचे कार्य संपत येते, त्या वेळी त्यांचे गुरु-शिष्य हे नातेच संपुष्टात येते; कारण त्या वेळी शिष्याला गुरुपण आलेले असते आणि गुरु आता उरलो उपकारापुरता या जाणिवेच्या स्तरावर कार्य करत असतात.

ई. शिष्याचा अहंकार घालवणे

१९९२ ची गुरुपौर्णिमा मुंबईला होती. त्याच्या सिद्धतेविषयी बाबा अधूनमधून विचारायचे की, काही हवे का ? तेव्हा मी (प.पू. डॉ. आठवले) बाबांना सांगत असे, आम्ही सर्व नीट करू. काही काळजी करू नका ! आम्ही पैसे गोळा करून गुरुपौर्णिमा चांगल्या प्रकारे साजरी करू, असा त्यात भाव असे. पुढे इंदूरच्या आश्रमाच्या बांधकामासाठी पैसे हवे आहेत, असे बाबांनी सांगितल्यावर आम्ही गुरुपौर्णिमेसाठी जमवलेले सर्व पैसे बाबांना दिले. नंतर पुन्हा पैसे जमवल्यावर गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून मला देणार असलेल्या पैशांपैकी काही पैसे कांदळी आश्रमात विहीर खणण्यासाठी द्या, असे बाबांनी सांगितल्यावर त्यांना ते दिले. जमलेले पैसे दिल्यामुळे आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करता येईल, ही काळजी आमच्या मनात निर्माण झाली. मग जाणीव झाली की, गुरुपौर्णिमा आम्ही करू हा अहंभाव नाहीसा करण्यासाठी बाबांनी हे सर्व केले. तेव्हापासून काळजीही गेली अन् पुढची कामेही सहज होत गेली. ( ग्रंथमालिका आदर्श शिष्य : खंड १)

९. गुरूंविषयी अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण !

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, धार्मिक विधी, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते.

याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिष्य’

Leave a Comment