‘पू. नेनेआजींनी देहत्याग केल्याचे कळल्यावर ‘देहत्याग’ या शब्दामुळे जेवढे दुःख होते, ते न जाणवता ‘पू. नेनेआजी’ या शब्दांमुळे मला नेहमीप्रमाणे आनंदच जाणवत होता. २ आठवड्यांपूर्वी मी पू. नेनेआजींशी दूरभाषवर शेवटचे बोललो होतो. तेव्हा त्या मधेमधे काही शब्द बोलायच्या. त्यांच्या प्रत्येक शब्दाबरोबर आनंद जाणवायचा आणि त्यांचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. अशी अनुभूती मला आयुष्यात पहिल्यांदाच आली.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पनवेल – सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात वास्तव्यास असणार्या सनातन संस्थेच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांनी पौष पौर्णिमेस, म्हणजे १० जानेवारी २०२० या दिवशी दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी देहत्याग केला. पू. (श्रीमती) नेनेआजी या ९६ वर्षांच्या होत्या. त्यांनी व्यष्टी संतपद प्राप्त केले होते. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या त्या आत्या (पू. बाळाजी आठवले यांच्या मामेबहीण) होत्या.
पू. (श्रीमती) नेनेआजी या नेहमी आनंदी असत. ‘साधनेसाठी वयाची, स्थळाची कोणतीच आडकाठी नसून भाव असल्यास साधनेतील अत्युच्च शिखरही गाठता येते’, हा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. पराकोटीची नम्रता, अहं नसणे, प्रेमभाव, इतरांना समजून घेणे, परिस्थिती स्वीकारणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. ११ जानेवारी या दिवशी सकाळी त्यांच्यावर अग्नीसंस्कार करण्यात येणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात