१. कुलस्वामी खंडोबा असणार्या कुटुंबात अमावास्या
आणि पौर्णिमा या दिवशी अन् काही कुटुंबांत विजयादशमी
(दसरा) आणि चंपाषष्ठी या दिवशी ‘तळी भंडार’ हा विधी केला जात असणे
‘ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात, त्या प्रत्येक कुटुंबात ‘तळी भंडार’ हमखास होतोच. ‘तळी भंडार’ हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर ‘तळी भंडार’ करण्याची प्रथा आहे. काही कुटुंबांत विजयादशमी (दसरा) आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो.
२. विधी का केला जातो
‘मणिसुर आणि मल्लासुर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषिमुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचेच ‘तळी भंडार’ हे प्रतीक आहे’, असे प्रचलित आहे.
३. ‘तळी भंडार’ विधी
३ अ. जेजुरी मंदिरात केला जाणारा ‘तळी भंडार’ विधी
१. जेजुरी मंदिरात भंडारगृह, बारद्वारी किंवा पितळी कासव यांवर ‘तळी भंडार’ विधी केला जातो. घरातील देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यांत थोडा भेद आहे. देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःखे उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो.
२. खोबर्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो. खोबर्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे ‘या माध्यमातून आपला वंश खोबर्याच्या तुकड्यांसारखा (कुटक्यासारखा) एकास दोन आणि दोनास चार’, असा वाढो’, ही सदिच्छा व्यक्त केली जाते. दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडार्यासह उधळल्या जात असत. कालौघात मोहरा उधळणे शक्य नाही; म्हणून खोबरे उधळले जाते. सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्त्वाचा आहे. अंतःकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोचते.
३ आ. घरी देवासमोर केला जाणारा ‘तळी भंडार’ विधी
एका ताम्हनात विड्याची (नागिणीची) पाने, सुपारी, खोबर्याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात. तीन, पाच, सात अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात.एका ताम्हनात विड्याची (नागिणीची) पाने, सुपारी, खोबर्याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात. तीन, पाच, सात अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात. त्यानंतर पानाचा विडा ठेवून (काही कुटुंबांत डोक्यावरील टोपी, रुमाल अथवा वस्त्र भूमीवर ठेवून) त्यावर ताम्हन ठेवले जाते. एक विडा देवासमोर ठेवतात. तळी उचलणार्या प्रत्येक व्यक्तीपुुढे एकेक विडा ठेवतात. देवाला भंडारा वाहून प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात. शेवटी तळीचे ताम्हन मस्तकी लावतात.
४. ‘तळी भंडार’ विधी
स्वच्छ विस्तीर्ण पात्र असावे ।
त्यामाजी अष्टदळ काढावे ।
भंडारे पूरित करावे । मध्ये कलश स्थापिजे ॥ १ ॥
नागवेली दळे करून ।
कलश सुशोभित करावा जाण ।
कलशात पूर्णपात्र नारळ ठेवून ।
तळीकेचे पूजन करावे ॥ २ ॥
मुष्टीभंडार आत ठेवावा ।
आप्त-परकीय समुदाय मेळवावा ।
येळकोट नामाचा उच्चार करावा ।
एकावच्छेदे करूनिया ॥ ३ ॥
तळी उचलून आधार पात्रावर ठेविजे ।
मग भंडारा सर्वांस लाविजे ।
प्रसाद सर्वांस वाटिजे । अत्यादरे करूनिया ॥ ४ ॥
तळी भरावयाचे समयी । दीपिका करी असावी ।
मग तळी पुन्हा उचलावी ।
मस्तकी धारण कीजे ॥ ५ ॥
५. येळकोट येळकोट जयमल्हार ।
हर हर महादेव । चिंतामणी मोरया ।
आनंदीचा उदे उदे । भैरोबाचा चांगभले ।
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ।
येळकोट येळकोट जयमल्हार ॥ १ ॥
अगडधूम नगारा । सोन्याची जेजुरी ।
देव आले जेजुरा ।
निळा घोडा । पायात तोडा । कमरी करगोटा ।
बेंबी हिरा । मस्तकी तुरा ॥ २ ॥
अंगावर शाल । सदाही लाल ।
आरती करी । म्हाळसा सुंदरी ।
देवा ओवाळी नानापरी ॥ ३ ॥
खोबर्याचा कुटका । भंडाराचा भडका ।
अडकेल ते भडकेल । भडकेल तो भंडार ।
बोल बोल हजारी । वाघ्या मुरुळी ।
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम ॥ ४ ॥
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ।
येळकोट येळकोट जयमल्हार ।’