गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील. गुरु म्हणजे काय, गुरुंचे जीवनातील महत्त्व, गुरुकृपा कार्य कशी करते यांबाबतचे विवेचन या लेखातून समजून घेऊया.

१. गुरु या शब्दाची व्युत्पत्ति, व्याख्या आणि अर्थ

अ. व्युत्पत्ति

गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः ।
अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।

अर्थ : ‘गु’कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि ‘रु’कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा.

आ. व्याख्या आणि अर्थ

गुरु शब्दाच्या काही व्याख्या आणि अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.

 

प.पू. काणे महाराज

१. शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नति व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूति देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते (कारण ते प्रारब्धानुसार असते), तर केवळ आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.

२. ‘ईश्वर आणि भक्त वेगळे असत नाहीत; पण ईश्वर निर्गुण असल्यामुळे त्याला देहभाव असलेल्या भक्ताशी बोलता येत नाही; म्हणून तो आपल्या कार्यब्रह्माशी भक्ताची गाठ घालून देतो. त्या कार्यब्रह्मालाच गुरु असे म्हणतात; म्हणजेच गुरूंच्या रूपाने तोच बोलत असतो.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जि. पुणे, महाराष्ट्र.

 

२. गुरुपरंपरेचा इतिहास

अ. आचार्यांचा उदय

‘मंत्रांच्या संहितीकरणाच्या कालात त्यांचे अध्ययन, अध्यापन, स्वाध्याय आणि विनियोग यांचे शिक्षण देणार्‍या गुरुसंस्थेची आवश्यकता उत्पन्न झाली. हळूहळू यज्ञकर्म विस्तृत आणि जटिल होऊ लागले आणि त्या विद्येत प्रावीण्य मिळवण्यासाठी विशेष अभ्यासाची निकड निर्माण झाली. त्यामुळेही जाणत्या आचार्यांच्या भोवती शिष्यवर्ग एकत्रित होऊ लागला. संहितीकरणाच्या कालातल्या अशा अनेक आचार्यांची नावे आज उपलब्ध आहेत. अंगिरस, गर्ग, अत्रि, बृहस्पति, वसिष्ठ हे तत्कालीन प्रमुख आचार्य होत.

आ. गुरु जनक आणि याज्ञवल्क्य

श्रौतकर्माविषयी ज्यांच्या मनात अनास्था, अश्रद्धा निर्माण झाली, तो वर्ग आरण्यकांचा होय. या वर्गात अध्यात्मविषयाची जोपासना होऊ लागली आणि ते विषय परंपरेने उपदेशणारे गुरुही उत्पन्न होऊ लागले. या गुरूंत जनक आणि याज्ञवल्क्य यांची नावे मुख्यत्वे सांगता येतील.

 

३. गुरुकृपा

अ. गुरुकृपा कार्य कशी करते ?

‘संकल्प’ आणि ‘अस्तित्व’ या दोन प्रकारांनी गुरुकृपा कार्य करते.

१. संकल्प (सूक्ष्मतम)

‘एखादी गोष्ट घडो’ एवढाच विचार एखाद्या उन्नतांच्या मनात आला, तर ती गोष्ट घडते. याशिवाय त्यांना दुसरे काही एक करावे लागत नाही. ८० प्रतिशतहून अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या उन्नतांच्या बाबतीत ते शक्य होते. ‘शिष्याची आध्यात्मिक उन्नती होवो’, असा संकल्प गुरूंच्या मनात आला की, मगच शिष्याची खरी उन्नती होते. यालाच गुरुकृपा म्हणतात.

२. अस्तित्व (सूक्ष्मातिसूक्ष्म)

या अंतिम टप्प्यात मनात संकल्पही करावा लागत नाही. गुरूंच्या नुसत्या अस्तित्वाने, सान्निध्याने किंवा सत्संगाने शिष्याची साधना आणि उन्नती आपोआप होते.

हे मजचिस्तव जाहले । परि म्यां नाहीं केलें ।
ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ।। – श्री भावार्थदीपिका (श्री ज्ञानेश्वरी) ४:८१

अर्थ आणि भावार्थ

हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही. हे ज्याने ओळखले, तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटला. यातील ‘मजचिस्तव जाहले’ (माझ्यामुळे झाले), म्हणजे माझ्या अस्तित्वामुळे झाले, यातील ‘मी’पण हे परमेश्वराचे आहे; तर ‘म्यां नाही केलें’ (मी केले नाही), म्हणजे कर्तेपण माझ्याकडे नाही. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे सूर्य उगवतो तेव्हा सर्व जण उठतात, फुले उमलतात वगैरे. हे केवळ सूर्याच्या अस्तित्वाने होते. सूर्य कोणाला सांगत नाही की ‘उठा’ किंवा फुलांना सांगत नाही की ‘उमला’. ९० प्रतिशतपेक्षा अधिक पातळीच्या गुरूंचे कार्य या पद्धतीचे असते.

आ. गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते. तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून ‘मी काय केले की ती खुष होईल’, या दृष्टीने प्रयत्न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला ‘माझे’ म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून ‘मी काय केले की ते प्रसन्न होतील’, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते. कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे गुरुकृपेशिवाय गुरुप्राप्ती होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार, हे गुरूंना आधीच ज्ञात असते.

इ. गुरुकृपेचे तुलनात्मक महत्त्व

पुढील कोष्टकात शिष्याच्या कोणत्या कृतीने किती प्रमाणात गुरुकृपा होऊ शकते, हे दिले आहे

अनु. क्र शिष्याची कृती गुरूकृपा (%)
१. नुसते दर्शन घेणे
२. फक्त अध्यात्मविषयक प्रश्न विचारणे १०
३. आश्रमातील कामे करणे ४०
४. अध्यात्माचा अर्धवेळ परिणामकारक * प्रसार करणे ७०
५. अध्यात्माचा पूर्णवेळ परिणामकारक * प्रसार करणे १००

* परिणामकारक प्रसार करणार्‍यात शिष्याचे सर्व गुण असावे लागतात. नुसत्या राजकीय किंवा सामाजिक प्रचारकासारखे काम करून चालत नाही.

 

४. गुरुतत्त्व एकच असणे

सर्व गुरु जरी बाह्यतः स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात. ज्याप्रमाणे गायीच्या कोणत्याही आचळातून सारखेच शुद्ध आणि निर्मळ दूध येते, त्याचप्रमाणे प्रत्येक गुरूंमधील गुरुतत्त्व एकच असल्याने त्यांच्याकडून येणार्‍या आनंदलहरी सारख्याच असतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गरुकृपायोग’

 

५. गुरूंकडे काय मागावे ?

अ. गुरूंचा अनुचित वापर नको !

एकाने चित्रपटाची तिकिटे मिळावीत; म्हणून गुरूंची प्रार्थना केली !
खरा शिष्य अर्थातच अशा व्यवहारातील गोष्टी गुरूंकडे मागत नाही. नवीन शिष्यांनी मात्र गंमत म्हणूनही अशा प्रकारचा विचार मनात आणू नये.

२. माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याची शक्ती मागा

भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चितच देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.

३. गुरु : काय पाहिजे ?
शिष्य : माझी आठवण आपल्या (आपली आठवण माझ्या) हृदयात अखंड असावी.

४. श्री शंकराचार्य म्हणाले, “तुम्हाला काही विचारायचे असले, तर विचारा.” पद्मपादांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हात जोडून ते म्हणाले, आचार्यदेव, आम्हाला आता काहीही विचारायचे नाही. संपूर्ण जीवनभर परिश्रम करून आपण जो मार्ग आखून दिला आहे, आपल्या आशीर्वादाने आम्ही तोच मार्ग चोखाळू. आपणच आमच्या जीवनपथावरील प्रकाशज्योती आहात. आपल्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याचे सामर्थ्य आमच्या ठायी उत्पन्न होवो, असा आशीर्वाद आपण आम्हाला द्या.

५. गुरूंकडे काही मागू नये : आपले गुरु सर्वज्ञ आहेत. आपल्याला काय आवश्यक आणि उपयुक्त आहे, हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते, या श्रद्धेने केवळ साधना करत रहावे. आपली पात्रता नसतांना आपण काही मागितले, तर ते देणार नाहीत. आपली पात्रता असली आणि आपण काही मागितले नाही, तरी ते देतातच. मग त्यांच्याकडे काही मागायचे तरी कशाला ?

६. तन, मन, धन आणि प्राण गुरूंना अर्पण केल्यावर त्यांच्याकडे मागायचे असे काही उरतच नाही.

७. मांडल्या अतिविघ्न सांकडें । ग्लानी न करिती आणिकांकडे ।
जाणती रामनामापुढें । विघ्न बापुडें ते कायी ॥  – एकनाथी भागवत, अध्याय २४, ओवी ३४१

अर्थ : ग्लानी न करिती म्हणजे प्रार्थना करत नाहीत. आणि कांकडे म्हणजे सद्गुरूंकडेही. रामनामापुढें म्हणजे नामजपापुढे. जिवावर कितीही घोर विघ्न आले, तरी खरा साधक सद्गुरूंचीही प्रार्थना करत नाही; कारण नामजपापुढे विघ्न काय करणार, याची त्याला निश्‍चिती असते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आदर्श शिष्य : खंड १’

 

Leave a Comment