शनिशिंगणापूर येथे २ दिवसांच्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स प्रारंभ
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
शनिशिंगणापूर – क्रियाशील हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा मिळण्याच्या उद्देशाने तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ दिवसांच्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला ४ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. प्रथम दिवसाच्या प्रथम सत्रात सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर सेलू (परभणी) येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट उपस्थित होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समवेतच शासनाने
तात्काळ लोकसंख्या नियंत्रण कायदा कार्यान्वित करायला
हवा ! – ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर, राष्ट्रीय कीर्तनकार
हिंदूंची सहिष्णुता आणि त्यांना अहिंसेचे शिकवलेले पाठ यांमुळे भारतावर आतापर्यंत अनेक आक्रमणे होऊन भारताचे विभाजन झाले. आज देशात अस्तित्वात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला जात आहे. या कायद्यासमवेतच शासनाने तात्काळ लोकसंख्या नियंत्रण कायदा कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत धर्मसेवा करूया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था
धर्मरक्षणाचे कार्य करणार्यास संत, देवता, भगवान श्रीकृष्ण यांचे आशीर्वाद प्राप्त होतात; म्हणून प्रत्येकाने तन, मन आणि धन अर्पण करून, झोकून देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत धर्मसेवा करूया. अधिवेशनाच्या दोन दिवसांत येथील चैतन्य आणि ऊर्जा ग्रहण करून पुढील धर्मकार्यासाठी सर्वांनी प्रेरणा घेऊन जाऊया, असे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारतात लोकशाहीचा
पराभव होत आहे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय होत आहे, तर अल्पसंख्यांकांना फायदे दिले जात आहेत. बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचा प्रथम विचार होत नाही. गोरक्षकांना कारावास आणि गोहत्या करणारे मोकाट अशी आजची स्थिती आहे. कन्हैया कुमारसारखे लोक देशविरोधी घोषणा देतात, त्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जाते. याउलट काही मासांपूर्वी मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधीर रंजन सेन यांनी ‘भारताला इस्लामिक राष्ट्राच्या दिशेने घेऊन जाऊ नका’, असे वक्तव्य केले होते; मात्र धर्माधांच्या विरोधामुळे त्यांना हे विधान मागे घ्यावे लागले. हा लोकशाहीचा पराभव आहे.
‘देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक होण्याची वेळ आली आहे. नेपाळमधील मुसलमान समुदाय आंदोलन करून ‘नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदु राष्ट्र घोषित करा’, अशी मागणी करत आहे; कारण नेपाळ हिंदु राष्ट्र असतांना तेथे कोणताही त्रास नव्हता. आज मात्र अन्य पंथियांकडून त्रास सहन करावा लागत आहे, असे श्री. घनवट या वेळी म्हणाले.