अयोध्येतील राममनोहर लोहिया विश्‍वविद्यालयामध्ये ‘गर्भसंस्कार’ अभ्यासक्रमाचा प्रारंभ

राममनोहर लोहिया विश्‍वविद्यालयाचे अभिनंदन ! देशातील प्रत्येक विश्‍वविद्यालयामध्ये अशा प्रकारचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला पाहिजे. त्यामुळे गर्भावर चांगले संस्कार झाले, साधनेचे संस्कार झाले, तर भारताची पुढील पिढी नीतीमान आणि सदाचारी बनेल अन् भारत पुन्हा विश्‍वगुरु होईल !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील राममनोहर लोहिया विश्‍वविद्यालयामध्ये ‘गर्भसंस्कार’ नावाचा अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे. ३ आणि ६ मासांचा हा अभ्यासक्रम असणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे दांपत्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांच्या आधारे याचे शिक्षण देण्यात येणार आहे. राममनोहर लोहिया शोध संस्थानच्या समन्वयक गायत्री वर्मा यांनी सांगितले की, अशा प्रकारचा अभ्यासक्रम शिकण्याची लोकांमध्ये आवड असल्याचे दिसत आहे. जी दांपत्ये होणार्‍या मुलांवर संस्कार करण्याविषयी अधिक सतर्क आहेत, त्यांना हा अभ्यासक्रम लाभदायक ठरणार आहे.

१. या गर्भसंस्कार अभ्यासक्रमामध्ये केवळ मानसिक स्थिती, भोजन, स्थान आदींचाच नाही, तर ‘गरोदरपणात महिलेने कोणते वस्त्र परिधान करावे’, याविषयीही शिकवण्यात येणार आहे.

२. या अभ्यासक्रमाद्वारे दांपत्यांना कशा प्रकारचे आचरण आणि व्यवहार करणारी मुले हवी  आहेत, त्यानुसार त्यांना गर्भसंस्कार करण्याचे शिक्षण देण्यात येणार आहे.

३. या अभ्यासक्रमानुसार एखाद्या दांपत्याला धार्मिक आचरण करणारे मूल हवे असेल, तर त्यांना धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे लागेल. गर्भधारण केलेल्या महिलेला घरात देवतांची चित्रे लावणे, तसेच भक्तीसंगीत ऐकावे लागेल. तसेच या दांपत्याने सहज आणि सौम्य व्यवहार करण्यासह बाहेरील वातावरणापासून दूर राहावे लागेल.

४. ज्या दांपत्यांना विज्ञानवादी मूल हवे आहे अशा दांपत्यांना विज्ञानाविषयीची माहितीचे वाचन करण्यासह घरात वैज्ञानिकांची छायाचित्रे लावावी लागणार आहेत. असे करण्यासह गरोदर महिलेला वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधांविषयी विचार करावा लागणार आहे. ‘विज्ञानवादी मूल हवे असणार्‍या दांम्पत्यांनी वैज्ञानिकांकडून संशोधन केले जाणार्‍या ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे’, असेही अभ्यासक्रमात म्हटले आहे.

५. ज्या दांपत्यांना युद्धकला शिकणारा आणि शूरवीर बालक हवा असेल, त्यांनी त्या संदर्भातील साहित्य वाचले पाहिजे. त्याची माहिती देणारी दृश्ये पाहिली पाहिजेत. तसेच युद्ध करणार्‍या देवतांची आणि महापुरुषांची चित्रे घरात सर्वत्र लावली पाहिजेत. तसेच घरातील वातावरणही तसे ठेवणे आणि तशा प्रकारची वस्त्रे परिधान करणे, अशा कृतीही गरोदर महिलांना कराव्या लागतील.

६. रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास याविषयी म्हणाले की, गर्भसंस्काराची आणि गर्भाने ज्ञान ग्रहण केल्याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र यात संबंधित विषयाचे ज्ञान आईवडिलांना असले पाहिजे. तसेच गर्भधारण करण्याची वेळ, दिवस, वातावरण, नक्षत्र, महिला आणि पुरुष यांची मानसिक स्थिती आदींचाही विचार केला पाहिजे.

 

हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांमध्ये गर्भसंस्कारांचा उल्लेख

हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये गर्भसंस्कारांची माहिती आहे. महाभारतात अभिमन्यूचे उदाहरण आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा हिला ‘चक्रव्यूह’ कसे भेदले जाते, याविषयी सांगितले, त्या वेळी अभिमन्यू सुभद्रेच्या गर्भामध्ये होता आणि तो ते ऐकत होता; मात्र चक्रव्युुहाचे सातवे द्वार भेदण्याविषयी श्रीकृष्ण सांगत असतांना सुभद्रा झोपल्यामुळे ती याविषयीची माहिती ऐकू शकली नाही आणि अभिमन्यू याला त्याची माहिती मिळाली नाही. प्रत्यक्षात महाभारताच्या युद्धात अभिमन्यू याने चक्रव्युहात प्रवेश करून ६ चक्र तोडले; मात्र पुढचे चक्र तोडून बाहेर येण्याची कला त्याला ठाऊक नसल्याने कौरवांनी त्याला ठार केले.

अन्य एका उदाहरणामध्ये दुर्वासऋषि मातेच्या गर्भात असतांना त्यांच्या वडिलांचा अवमान करण्यात आला. त्या वेळी त्यांच्या मातेला ७ वा मास चालू होता.  वडिलांच्या झालेल्या अवमानाचा राग आल्याने ७ व्या मासातच दुर्वासऋषींचा जन्म झाला. वडिलांचा अवमान होतांना गर्भाने ऐकले आणि त्याचा गर्भाला अतिशय राग आला. त्यामुळेच दुर्वासऋषि अत्यंत रागीट स्वभावाचे होते. ज्याप्रमाणे गर्भावर संस्कार होतात, त्याप्रमाणे मुले जन्माला आल्यावर आचरण करतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment