उडुपी (कर्नाटक) येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्‍वेश तीर्थ स्वामी यांचा देहत्याग

कर्नाटक राज्यात ३ दिवसांचा सरकारी दुखवटा घोषित

श्री विश्‍वेश तीर्थ स्वामी

उडुपी (कर्नाटक) – येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्‍वेश तीर्थ स्वामी यांनी २९ डिसेंबर या दिवशी सकाळी देहत्याग केला. ते ८८ वर्षांचे होते. श्‍वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना २० डिसेंबरला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू होते. त्यांना २८ डिसेंबरला रुग्णालयातून मठात आणण्यात आले होते. त्यानंतर सकाळी त्यांनी देहत्याग केला. ते पेजावर मठाचे ३३ वे मठाधिपती होते. त्यांच्या देहत्यागावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी शोक व्यक्त केला. तसेच कर्नाटक सरकारने ३ दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. हिंदुत्वाच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यक्रमात ते नेहमीच सहभागी होत. राममंदिर उभारण्यासाठी जी चळवळ उभारली गेली, त्यात स्वामीजी सहभागी झाले होते. गोहत्या रोखण्यासाठी त्यांनी कार्य केले, तसेच गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित करण्याची त्यांनी मागणी केली होती. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठीही त्यांनी कार्य केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याला त्यांचे नेहमीच सहकार्य असायचे. श्री विश्‍वेश तीर्थ स्वामी यांच्या देहत्यागामुळे त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती परिवाराने श्रद्धांजली वाहिली आहे.

 

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वामीजींच्या देहत्यागावर शोक प्रकट केला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले, मला स्वामींकडून शिकण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वत:ला धन्य समजतो. यावर्षी झालेल्या गुरुपौर्णिमेच्या पुण्य दिवशी त्यांच्याशी झालेली भेट नेहमीच स्मरणात राहील.

माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या नेत्या उमा भारती या स्वामीजींना गुरुसमान मानत होत्या आणि स्वामीजींच्या आजारपणामुळे त्या काही दिवसांपासून मठामध्ये जात होत्या. मोदी पतंप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर स्वामीजींनी देहली येथे जाऊन त्यांना आशीर्वाद दिले होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे पदावर असतांना उडुपी येथे गेले होते. त्या वेळी त्यांनीही स्वामींजींची भेट घेतली होती.

 

श्री विश्‍वेश तीर्थ स्वामी यांचा परिचय

श्री विश्‍वेश तीर्थ स्वामी यांचा जन्म वर्ष १९३१ मध्ये झाला होता. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. ते लहानपणीच कृष्णभक्तीमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मोठे झाल्यावर त्यांनी अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. ते अध्यात्मासह राजकीय विषयावरही चर्चा करत. लोक त्यांना ‘राष्ट्र स्वामीजी’ असेही म्हणत.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतली होती श्री विश्‍वेश तीर्थ स्वामी यांची भेट !

सनातन संस्थाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले ७.१.२००५ ते १४.१.२००५ या कालावधीत कर्नाटक दौर्‍यावर होते. त्या वेळी ते उडुपी येथे आलेले असता त्यांनी श्री विश्‍वेश तीर्थ यांना भेटून आशीर्वाद घेतले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वामीजी यांना हिंदु धर्माच्या दुःस्थितीविषयी सांगितले. तसेच या दिशेने छोटीशी सनातन संस्था करत असलेल्या कार्याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यावर स्वामीजींनी ‘‘सनातन संस्थेचे साधक चांगले कार्य करत असून ते श्रीकृष्ण मठातील प्रत्येक कार्याला चांगले साहाय्य करत आहेत. आजची युवा पिढी प्रसारमाध्यमांमुळे चुकीचा मार्गाने जात आहेे’’, असे सांगितले. स्वामीजी यांनी धर्मप्रसार करत असलेल्या सनातन संस्थेला या वेळी शुभाशीर्वाद दिले होते.

 

आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत राष्ट्र-धर्म कार्याविषयी अदम्य
उत्साह असणारे पेजावर स्वामीजी सर्वांसाठी प्रेरणादायक ! – हिंदु जनजागृती समिती

पेजावर मठाचे श्री विश्‍वेश तीर्थ स्वामीजी यांच्या देहत्यागामुळे केवळ राष्ट्र-धर्माच्या कार्यात सक्रीय असलेल्या एका स्वामीजींना नव्हे, तर उतारवयातही अविरत कार्य करणार्‍या, युवकांना प्रेरणादायी असलेल्या एका महान स्वामीजींना आम्ही मुकलो आहोत. वयाच्या ७ व्या वर्षी संन्यास दीक्षा घेऊन २१ व्या वर्षी प्रथम पर्याय पीठारोहण (उडुपी येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मठात पूजेचा अधिकार दर १६ वर्षांनी पेजावरसहित ८ मठांपैकी एका मठाला अधिकार येतो, याला ‘पर्याय’ म्हणतात.) करणारे स्वामीजी सतत अन्नदान आणि ज्ञानदान करून जनसामान्यांना आश्रय देणारे होते. त्यांचे कार्य स्फूर्तीदायक आहे. राममंदिराच्या लढ्यामध्ये त्यांनी पुष्कळ परिश्रम घेतले, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

श्री. गौडा यांनी पुढे म्हटले आहे की, स्वामीजींनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य धर्मकार्यासाठी अर्पण करून समस्त जनसामान्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. आजच्या युवकांसह सर्वांनीच त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘स्वामीजींचा आशीर्वाद सदैव आम्हाला लाभू दे’, अशी आम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment