श्री सप्तश्रृंगीदेवीच्या मंदिर न्यासाच्या निर्णयामुळे नास्तिक अंनिसचा थयथयाट !
- मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य असलेल्या या निर्णयामुळे अंनिससारख्या नास्तिकतावाद्यांना पोटशूळ उठला नाही तरच नवल ! अंनिसवाले देव मानत नाहीत, तर देवस्थानाच्या संदर्भातील निर्णयांमध्ये ते का ढवळाढवळ करतात ?
- न्यायालय, रुग्णालय, शासकीय कार्यालय, आस्थापने, मोठी हॉटेल्स येथेही तेथील व्यवस्थापनाने व्यवस्था राखण्यासाठी काही नियम केलेले असतात. त्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असते. त्यामुळे तेथील व्यवस्था उत्तम राहते. त्याप्रमाणे चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरांचे पावित्र्य टिकण्यासाठी धर्मशास्त्रानुसार ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे, हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य असते, हे अंनिसवाल्यांना समजेल तो सुदिन ! अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांच्या नियमांच्या संदर्भात प्रश्न विचारण्याचे धैर्य नास्तिकतावाद्यांमध्ये आहे का ?
मुंबई – वणी येथील श्री सप्तश्रृंगीदेवीच्या मंदिर न्यासाने गाभार्यातील प्रवेशासाठी सोवळे घालण्याचे आणि साडी नेसण्याचे बंधन घातले आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेतील कोणते कायदे, नियम आणि तरतुदी यांच्या आधारे घेतला आहे ?, असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की, हा निर्णय उपासना स्वातंत्र्याच्या विरोधातील आणि भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींचाच भंग करणारा आहे. सोवळे-ओवळे हा प्रकार जातीय उतरंड आणि तीव्र भेदाभेद निर्माण करणारा आहे. तसेच संत विचार आणि समाजसुधारक यांच्या भूमिकांशीही सुसंगत नाही. अलीकडच्या काळात शनिशिंगणापूर देवस्थान, हाजी अली दर्गा अशा विविध प्रकरणांत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनीही स्पष्ट निर्णय दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांनंतर मंदिर प्रवेशाविषयीचे चित्र स्पष्ट असतांना असा भेदभाव करणारा निर्णय कसा घेतला ? (हिंदूंच्या सर्वच मंदिरांत (अपवाद वगळता) दर्शनासाठी महिलांना प्राचीन काळापासून प्रवेश आहेच. केवळ गाभार्यातील पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी धर्मशास्त्रानुसार ठरवून दिलेले काही नियम आहेत. असे असतांना धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ! – संपादक)