मंदिर न्यासाचा स्तुत्य निर्णय !
वणी (जिल्हा नाशिक) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि अनेकांचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावरील श्री सप्तश्रृंगीदेवीच्या गाभार्यातील पावित्र्य जपण्यासाठी दर्शनार्थी आणि भाविक यांच्यावर काही बंधने घालण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर न्यासाने घेतला आहे. यापुढे श्रद्धाळूंना थेट गाभार्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही. श्रद्धाळू बाहेरून दर्शन घेऊ शकतात. आरतीला आणि पूजेला आलेल्या भाविकांना नोंद करून विशिष्ट काळात गाभार्यात प्रवेश देण्यात येईल. त्या वेळी (गाभार्यात प्रवेश करण्यासाठी) पुरुषांनी सोवळे आणि महिलांनी साडी परिधान करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत देवीच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेता येत होते. यापूर्वी गाभार्यात प्रवेश करण्यासाठी ‘ऑनलाइन’ किंवा कार्यालयातून दिला जाणारा ‘पास’ आता बंद करण्यात आला आहे.
यामुळे गाभार्यात ‘महनीय व्यक्तींना’ (व्हीआयपी) दिले जाणारे दर्शन बंद होईल. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना याचा लाभ होईल. १ जानेवारी २०२० पासून हे निर्णय लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.
१. श्री. प्रवीण दीक्षित, पुजारी, श्री सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर – श्री सप्तश्रृंगीदेवी मंदिराच्या न्यासाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. यामुळे गडावरील पावित्र्य राखले जाईल आणि भाविकांचे दर्शन सुलभ होईल.
२. महंत श्री श्री मंडलाचार्य ज्योतिषवाचस्पती पिठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज – श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी मंदिर न्यासाने घेतलेल्या निर्णयामुळे युवा पिढीला आपले धर्माचरण, आपली संस्कृती काय आहे, ते कळेल आणि त्याप्रमाणे ते आचरण करतील. सर्व संतसमाज त्यांच्या पाठीशी आहे.