रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात हिंदु
विधीज्ञ परिषद आयोजित षष्ठम राष्ट्रीय अधिवक्ता शिबिर
रामनाथी (गोवा) – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कार्य हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील एक चळवळ आहे. निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करणे, तसेच सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील भ्रष्टाचार बाहेर काढणे, राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे विविध आघात वैध मार्गाने रोखणे यांसह अन्य विविध प्रकारचे कार्य परिषदेकडून करण्यात येत आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी नि:स्वार्थपणे करण्यात येणार्या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमात हिंदु विधीज्ञ परिषदेने २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या षष्ठम राष्ट्रीय अधिवक्ता शिबिरात ते बोलत होते. या वेळी परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, परिषदेचे संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस व्यासपिठावर उपस्थित होते.
शिबिराच्या प्रारंभी सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला. त्यानंतर पुरोहित श्री. अमर जोशी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी भावपूर्णरित्या वेदमंत्रपठण केले. या प्रसंगी केरळ येथील अधिवक्ता गोविंद भरतन्, पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, कर्नाटक येथील अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवक्ता शिबिरासाठी दिलेल्या संदेशाचे वाचन केले.
राष्ट्रीय उत्थानात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे ! – चेतन राजहंस
हिंदु राष्ट्राच्या उभारणीमध्ये अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये अधिवक्त्यांची भूमिका आणि त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे होते. आज राष्ट्र आणि धर्म संकटात असून त्यांचे आपण स्वत:ही अविभाज्य घटक आहोत. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशातील भ्रष्ट, अन्यायी आणि आळशी बनलेल्या व्यवस्थेच्या विरोधात न्यायालयीन मार्गाने लढा द्यावा लागेल अन् व्यवस्था पालटण्याचे प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे राष्ट्रीय उत्थानात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अधिवक्त्यांनी
प्रतिदिन प्रयत्न करायला हवेत ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
सध्या देशात असलेली भ्रष्ट व्यवस्था पालटून आदर्श व्यवस्था आणण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रतिदिन प्रयत्न करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिवक्त्यांकडून तन-मन-धन यांसह त्यागाची आवश्यकता असून त्यातूनच देशाची उभारणी होणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी केलेल्या त्यागामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.
या शिबिराला देशभरातील ७ राज्यांतून अधिवक्ता उपस्थित आहेत. या शिबिरात ‘आनंदी जीवनासाठी करावयाचे साधनेचे प्रयत्न’, ‘पालटत्या सामाजिक स्थितीत हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी प्रयत्न कसे करावेत ?’, या विषयांवरील परिसंवाद, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधिवक्त्यांनी करावयाचे प्रयत्न, सुराज्य अभियान यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहेत.