शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. संतपदी विराजमान !

सनातन संस्थेच्या वतीने पू. रमानंद गौडा यांनी केला भावपूर्ण सन्मान !

पू. श्री. काशिनाथ के

शिवमोग्गा (कर्नाटक) – ज्याप्रमाणे तपःसाधना करून ईश्‍वरप्राप्ती झालेले अनेक संत-महात्मे आहेत, त्याप्रमाणेच नित्य कर्मेही अत्यंत एकरूपतेने करून त्यायोगेच भगवंताशी अनुसंधान साधणारे उन्नतही आहेत. घरातील नित्य कर्मे करतांना दळण दळण्यासाठीही भगवंतालाच हाक मारणार्‍या संत जनाबाई, ‘कांदा-मुळा-भाजी, अवघी विठाई माझी’ म्हणत स्वतःच्या शेतातच भक्तीचा मळा फुलवणारे संत सावतामहाराज, मडकी बनवतांना भगवंताचा नामजप केल्यामुळे त्या मडक्यांतूनही नामजप ऐकू येण्याची अनोखी ईश्‍वरी लीला अनुभवणारे संत गोरा कुंभारही आहेत. आजच्या रज-तमप्रधान अशा कलियुगातही अशाच प्रकारे शिल्पकलेच्या माध्यमातून भगवंताशी अनुसंधानित असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. हे संतपदी विराजमान झाल्याची घोषणा सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केली. पू. रमानंद गौडा यांनी ‘भगवंताच्या मूर्ती अथवा शिल्पे घडवतांना त्यातील ईश्‍वरीतत्त्वाशी एकरूप होऊन कर्म भावपूर्ण आणि निरपेक्षतेने करणारे श्री. काशिनाथ के. हे त्यांच्यातील दैवी गुणांमुळे संतपदी विराजमान झाले आहेत’, असा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेला संदेश सांगून पू. काशिनाथ के. यांचा सनातन संस्थेच्या वतीने सन्मान केला. शिवमोग्गा (कर्नाटक) येथे १९ डिसेंबर या दिवशी एका भावसोहळ्यात ही आनंदवार्ता देण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या साधकांसह पू. काशिनाथ यांच्या पत्नी सौ. उषाबाई, पू. काशिनाथ यांचे बंधू श्री. ज्ञानेश्‍वर, श्री. प्रवीण आणि श्री. नारायण, लहान बहीण सौ. रेणुका आणि त्यांचे पती श्री. श्रीधर, पू. काशिनाथ यांचे शिष्य श्री. बंगारस्वामी आणि श्री. पांडुरंग, त्यांचे मित्र निवृत्त टपाल मास्तर श्री. बसवराज हे उपस्थित होते.

पू. काशिनाथ (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा

 

१. अशी केली घोषणा !

पू. रमानंद गौडा यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन याविषयी मार्गदर्शन केल्यानंतर पू. काशिनाथ यांच्या संदर्भातील एक ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. त्या ध्वनीचित्रचकतीच्या माध्यमातून पू. काशिनाथ हे शिल्पकलेच्या माध्यमातून सेवा कशी करतात, शिल्पे साकारतांना कोणता भाव ठेवतात, यांविषयी साधकांना पुष्कळ शिकायला मिळाले. यानंतर ‘देवतांची शिल्पे साकारतांना पू. काशिनाथ यांनी स्वतःतच ते दैवी गुण रुजवले आहेत’, असे सांगत पू. रमानंद गौडा यांनी पू. काशिनाथ यांच्या संतपदाची आनंदवार्ता दिली.

 

२. पू. काशिनाथ के. – ‘देवासाठी करत आहोत’, हा भाव असावा !

आपण प्रत्येक कृती करतांना ‘देवासाठी करत आहोत’, हा भाव असावा. ‘देव आपल्याकडे पाहत आहे’, या भावाने सेवा करावी. असे केल्यामुळे आपोआप सेवेत एकाग्रता साध्य होते.

 

३. श्री. ज्ञानेश्‍वर के. (पू. काशिनाथ यांचे बंधू)

माझे भाऊ माझे गुरु आहेत. त्यांच्याकडून मी शिल्पकला आत्मसात केली आहे. ही कला आम्हाला आमच्या आजोबांकडून (आईच्या वडिलांकडून) मिळाली आहे.

 

४. श्री. नारायण के. (पू. काशिनाथ यांचे बंधू)

आमच्या पूर्वजन्मीच्या पुण्यफळामुळे आम्हाला पू. काशिनाथ मिळाले आहेत. ‘कन्नड शिल्पकला जिवंत ठेवण्यासाठी देवाने त्यांना कर्नाटक राज्यात जन्म दिला आहे’, असे वाटते.

पू. काशिनाथ यांच्या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे या कुटुंबातील सर्व जण कलेशी जोडलेले आहेत.

पू. काशिनाथ यांनी घडवलेली मुरुडेश्‍वर (कर्नाटक) येथील १२३ फूट उंचीची शिवाची मूर्ती

 

५. साधकांनी पू. काशिनाथ यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

अ. श्री. राजू सुतार (मूर्तीकला कक्ष, सनातन आश्रम, रामनाथी)

पू. काशिनाथ यांच्याशी जेव्हा प्रथम भेट झाली, तेव्हाच ‘ते संत आहेत’, असे वाटले होते. ‘ते प्रत्येक क्षणी आनंदी आणि भावावस्थेत असतात’, असे जाणवत होते. ते मूर्तीकलेविषयी मला मार्गदर्शन करणार आहेत’, हे कळल्यावर अत्यंत आनंद होऊन मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. ‘मूर्ती घडवतांना स्वतःचा अहं वाढू नये’, यासाठी कोणते प्रयत्न करावे’, हेही त्यांनी अत्यंत प्रेमाने सांगितले. त्यांचे वय ७५ वर्षे आहे, तरीही ते थकलेले दिसत नव्हते. त्यांच्या सहवासात प्रत्येक क्षणी उत्साह जाणवत होता.

आ. श्री. रामानंद परब (मूर्तीकला कक्ष, सनातन आश्रम, रामनाथी)

पू. काशिनाथ पुष्कळ मोठे शिल्पकार असूनही त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. पू. काशिनाथगुरुजी यांच्यात प्रीती असल्यामुळे त्यांच्या सान्निध्यात आनंद जाणवतो. शिकतांनाही उत्साही वाटते. ‘ते संत आहेत’, असे मलाही जाणवत होते. ‘मूर्ती घडवतांना ते मूर्तीशी एकरूप होतात’, असे मला जाणवत होते. ‘मूर्ती घडवतांना ते ध्यानावस्था अनुभवतात’, हे लक्षात आले. त्यांच्या सान्निध्यात माझा भाव सहजतेने जागृत होत होता. ‘आपली गुरूंवर निष्ठा असेल’, तर आपण कोणतीही कला सहजतेने शिकू शकतो’, असे पू. गुरुजी यांनी सांगितले.

 

पू. काशिनाथ यांनी सनातन आश्रमाविषयी काढलेले गौरवोद्गार

सनातन आश्रम हा देवलोकच आहे !

काही दिवसांपूर्वी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेथील साधकांचे राहणीमान मला पुष्कळ आवडले. आश्रमात दैवी वातावरण जाणवत होते. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी, तसेच प्रत्येक कला जतन आणि वृद्धींगत करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले कार्यरत आहेत. त्यांचे साधकही यासाठी तन-मन-धन आणि सर्वस्वाचा त्याग करून सेवाभावाने सेवा करत आहेत. सनातन आश्रम हा देवलोकच आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment