सनातन संस्थेचे नाव सांगून आर्थिक किंवा व्यावसायिक फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

सनातन संस्था ही केवळ अध्यात्मप्रसाराचे कार्य करते. या व्यतिरिक्त संस्था कोणालाही वैद्यकीय, आर्थिक वा व्यावसायिक साहाय्य किंवा सल्ला आदी कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करत नाही. काही ठिकाणी सनातनचे साधक असल्याचे सांगत काही जण सनातन संस्थेच्या नावाचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करत असल्याचे लक्षात आले आहे. याचे एक उदाहरण नुकतेच पुणे येथे लक्षात आले.

पुण्यातील धानोरी परिसरात राहणारे श्री. सुहास गुळवणी हे सनातनच्या संपर्कात असतात. त्यांना वेळ मिळेल, तसे कधी कधी अध्यात्मप्रसाराच्या कार्यात येतात; मात्र ते सनातनचे साधक, हितचिंतक, वाचक आदींना ‘मी सनातनचा साधक असून ‘अ‍ॅक्यूप्रेशर’ उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार करतो’, असे सांगतात. सनातनचा साधक असल्याचे सांगितल्याने काही वाचक आणि हितचिंतक यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांचे उपचार चालू केले; मात्र खर्चिक उपचार करूनही प्रकृतीमध्ये सुधारणा दिसत नसल्याने त्यांचे उपचार अनेकांनी काही काळाने बंद केले.

तरी सनातन संस्था अशा प्रकारे कोणालाही वैद्यकीय किंवा व्यावसायिक दृष्ट्या कार्य करण्यास सांगत नाही. सनातनच्या साधक, वाचक आणि हिंतचिंतक यांना अशा प्रकारे ‘सनातनचा साधक’ असल्याचे सांगत कोणी व्यवहार करत असेल, तर ‘त्याचा सनातन संस्थेशी कोणताही संबंध नाही’, हे लक्षात घ्यावे. अशा प्रकारे सनातनच्या नावाचा उपयोग करून कोणी कोणाशी आर्थिक व्यवहार वा व्यवसाय करत असल्यास त्याला सनातन संस्था उत्तरदायी नाही. अशा व्यवहारांमध्ये कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्याची माहिती आम्हालाही कळवावी, ही विनंती.

आपला,

श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था.

Leave a Comment