- यावल (जळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ३ सहस्र धर्मप्रेमींची उपस्थिती
- २१ सहस्र धर्मप्रेमींनी पाहिली सभा फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून
यावल ‘महर्षि व्यासनगरी’ म्हणून ओळखले जावे, यासाठी सेक्युलर नाही,
तर ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
यावल (जळगाव) – यावल ही महर्षि व्यास यांची नगरी आहे. असे असूनही धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये महर्षि व्यास यांची महती शिकवली जात नाही. यावलला ‘महर्षि व्यासनगरी’ म्हणून ओळखले जावे, यासाठी सेक्युलर नाही तर ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी १४ डिसेंबर या दिवशी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. सभेला ३ सहस्र धर्मप्रेमींची उपस्थिती लाभली. या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनीही संबोधित केले.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘सेक्युलर’ व्यवस्था ही एक बनावट व्यवस्था बनली असून तिचा वापर हिंदु धर्मियांवर अन्याय करण्यासाठी होत आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. चर्च, मशीद, मदरसा यांचे अधिग्रहण न करता केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे अधिग्रहण होत आहे. शबरीमला, शनिशिंगणापूर आदी मंदिरांतील हिंदूंच्या प्राचीन धर्मपरंपरा ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली मोडून काढल्या जात आहेत.’’
शंखनादाने सभेला प्रारंभ झाला. वेदमूर्ती सर्वश्री शशिकांत लोकांक्षी, शामशास्त्री नाईक, उमेश सराफगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री. रमेश शिंदे यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास माल्यार्पण केले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान अधिवक्ता राजेश गडे यांनी, तर श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार श्री. विनोद पाटील आणि सौ. क्षिप्रा जुवेकर यांचा सत्कार सौ. छाया भोळे यांनी केला. श्री. प्रशांत जुवेकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा मांडला, तसेच सूत्रसंचालनही केले. सभेमध्ये स्वरक्षणविषयक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध होण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. श्लोक म्हणून सभेची सांगता झाली.
अखिल विश्व सुसंस्कृत करण्याचे धर्मकर्तव्य पार पाडूया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव
धर्माचरण आणि साधना यांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज धर्मसंस्थापना करू शकले. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेचा नामजप करावा. नामजपामुळेच धर्मरक्षणाच्या कार्यासाठी आत्मबळ मिळणार आहे. केवळ हिंदु धर्म संस्कृतीचे रक्षण करणे, एवढे संकुचित ध्येय न ठेवता ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम।’ म्हणजे अखिल विश्व सुसंस्कृत करू’, अशी आपल्या पूर्वजांची घोषणा होती. ती सार्थ करण्याचे धर्मकर्तव्य आपण सर्वजण पार पाडूया.
महिलांवरील अत्याचार करणार्यांना
कठोर शिक्षा व्हायला हवी ! – सौ. क्षिप्रा जुवेकर
हिंदु धर्मात महिलांना गौण स्थान आहे’, अशी ओरड धर्मविरोधी अन् कथित पुरोगामी करतात. त्यांनी हे लक्षात घ्यावे की, यजुर्वेदात ‘वेदकाळात आमच्या महिला राज्यांचे नेतृत्व करायच्या’, असा उल्लेख आहे. सध्या महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. याला आळा घालायचा असेल, तर गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, जेणेकरून अन्य गुन्हेगार पुन्हा असे गुन्हे करण्याचे धाडस करणार नाहीत.