विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील कनकदुर्गा मंदिर

Article also available in :

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे ‘कनकदुर्गादेवी’चे मंदिर आहे. हे मंदिर आणि ‘कनकधारास्तोत्र’ यांच्या निर्मितीचा इतिहास आपण पाहूया.

विजयवाडा (आंध्रप्रदेश)येथील कनकदुर्गादेवी

मंदिराचा इतिहास

‘कील’ या देवीभक्ताने पर्वताचे रूप धारण केल्यावर दुर्गादेवी
या पर्वतावर विराजमान होणे, या पर्वताला ‘इंद्रकीलाद्री’ हे नाव पडणे आणि देवी प्रकट
झाल्यावर पर्वतावर सोन्यासारखा प्रकाश दिसत असल्याने ती ‘कनकदुर्गा’ या नावाने ओळखली जाणे

आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी असलेले मोठे शहर म्हणजे ‘विजयवाडा’ ! येथे कृष्णेच्या काठी ‘इंद्रकीलाद्री’ नावाचा पर्वत असून येथे ऋषिमुनींनी तपश्‍चर्या केली होती. ‘कील’ नावाच्या भक्ताने दुर्गादेवीची मनोभावे तपश्‍चर्या केली. पुढे ‘कील’ या भक्ताने पर्वताचे रूप धारण केले. महिषासुराच्या संहारानंतर दुर्गादेवी कील पर्वतावर येऊन विराजमान झाली. यानंतर या पर्वताला ‘इंद्रकीलाद्री’ हे नाव पडलेे. येथील देवी स्वयंभू आहे. देवी प्रकट झाल्यावर या पर्वतावर लांबून सोन्यासारखा प्रकाश दिसायचा; म्हणून या देवीला पुढे ‘कनकदुर्गा’ या नावाने ओळखले जाऊ लागले. याच पर्वतावर अर्जुनाने तपश्‍चर्या केली होती आणि शिवाकडून पाशुपतास्त्र मिळवले होते.

 

आद्य शंकराचार्य यांच्या हातून झालेली ‘कनकधारा स्तोत्रा’ची निर्मिती !

आद्य शंकराचार्य यांनी लहान वयातच संन्यास स्वीकारला. ते ८ वर्षांचे असतांना भिक्षेसाठी एकदा गावात गेले आणि एका गरीब ब्राह्मण वृद्धेच्या घरासमोर उभे राहून भिक्षा मागू लागले. त्या वृद्धेच्या घरी काहीच नव्हते आणि केवळ एकच आवळा होता. तोच तिने भिक्षेत दिला. ते पाहून आद्य शंकराचार्यांचे डोळे पाणावले. त्यांनी तेथेच उभे राहून महालक्ष्मीदेवीची स्तुती केली. तेव्हा श्री महालक्ष्मी प्रकट झाली आणि म्हणाली, ‘हे शंकरा, तू माझी आठवण कशी काय काढलीस ?’ त्यावर बाल शंकर म्हणाले, ‘आई, तू या आजीचे भाग्य बदलून तिला संपन्नता प्रदान कर.’ देवी म्हणाली, ‘या वृद्धेच्या पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे तिला आज ही स्थिती आली आहे.’ त्यावर आद्य शंकराचार्य म्हणाले, ‘ब्रह्मदेवाने लिहिलेले विधीलिखित बदलण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे.’ बाल शंकराचे हे म्हणणे ऐकून श्री महालक्ष्मीदेवी प्रसन्न झाली आणि त्याच क्षणी तिने त्या वृद्धेच्या घरात सुवर्ण आवळ्यांचा पाऊस पाडला.

आद्य शंकराचार्यांनी श्री महालक्ष्मीला संबोधून म्हटलेली २१ कडवी असलेली स्तुती पुढे ‘कनकधारास्तोत्र’ या नावाने प्रसिद्ध झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment