रामनाथी (गोवा) – शिवमोग्गा (कर्नाटक) येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री. काशीनाथ के. (वय ७५ वर्षे) यांनी येथील सनातन आश्रमाला १३ डिसेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातन संस्थेचे साधक श्री. अभिषेक पै यांनी आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधनाविषयी माहिती दिली.
श्री. काशीनाथ के. यांना आश्रम पाहतांना
जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि त्यांनी काढलेले कौतुकोद्गार
१. आश्रम पाहतांना स्वागतकक्षाजवळील प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या छायाचित्राचे दर्शन घेतांना श्री. अभिषेक यांनी श्री. काशीनाथ के. यांना प.पू. बाबांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. ही माहिती ऐकून ते म्हणाले, ‘‘प.पू. बाबा तर तपस्वीच आहेत. त्यांच्या संकल्पामुळे सनातन संस्थेचे सर्व कार्य चालू आहे.’’
२. श्री. काशीनाथ के. यांनी आश्रमातील विविध सेवांचे आणि आश्रमातील स्वच्छतेचे नियोजन जाणून घेतले. हे नियोजन जाणल्यानंतर त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि ते म्हणाले की, आश्रमातील कार्य शिस्तीने आणि चांगल्या प्रकारे चालू आहे. हे अत्यावश्यक आहे की, सर्वांनी सर्व प्रकारच्या सेवा केल्या पाहिजेत; कारण एखाद्याने एकच सेवा केली, तर त्यामुळे ‘ती सेवा मी चांगली करतो’, असा अहं वाढू शकतो; मात्र सर्व प्रकारच्या सेवा केल्यामुळे अहं न्यून होऊन चित्तशुद्धी होईल.
३. त्यांना आश्रमातील सर्व व्यवस्था आवडली. आश्रमातील शिस्त पाहून ते म्हणाले, ‘‘गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) हे तुमच्याकडून सेवा म्हणून करवून घेत आहेत. त्यामुळे सर्व चांगले चालू आहे.’’
४. भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगतांना श्री. काशीनाथ के. म्हणाले, ‘‘पाश्चात्त्य लोक भारतात का येतात ? कारण तेथील लोकांना दिशा नसते. ईश्वर कोण आहे ?, हे ठाऊक नसते. त्याचा शोध घेण्यासाठी ते भारतात येतात. त्यांना येथील संस्कृती आणि हिंदु धर्मानुसार आचरण केल्यावर देवाची अनुभूती येते. त्यामुळे ते आपली संस्कृती आत्मसात करतात. विदेशी लोक भारतात आल्यावर ते येथे बांधलेल्या इमारती, बंगले आदी गोष्टींमध्ये भारताने केलेली प्रगती पाहत नाहीत, तर ते भारतातील पुरातन मंदिरे, शिल्पकला आदी संस्कृती पाहायला येतात. भारतातील मूर्तींमध्ये आणि विदेशातील मूर्तींमध्ये भाव कसा असतो, याचा ते अभ्यास करतात. हे केल्यावर ते ‘भारतातील कला (संस्कृती) श्रेष्ठ कशी आहे ?’, याविषयावर ते ग्रंथही लिहितात. भारतात जी काही संस्कृती, कला आहे, ती आपल्या ऋषिमुनींनी सिद्ध केलेली आहे; मात्र प्रसिद्धी विदेशी लेखकांना मिळते; कारण भारतातील लोक विदेशी लोकांनी सांगितलेले लवकर स्वीकारतात.’’
श्री. काशीनाथ के. यांचा परिचय
शिवमोग्गा येथील श्री. काशीनाथ के. यांचे ‘पंचशिल्पकले’मध्ये प्राविण्य आहे. वर्ष २००४ मध्ये त्यांना ‘अमरशिल्पी जकणाचारी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष २०१४ मध्ये ‘कर्नाटक राज्य संस्कृती इलाका शिल्पकला अॅकॅडमी’ने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी कर्नाटकमधील मुरडेश्वर येथे १३५ फूट उंचीची भगवान शिवाची मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती भारतातील सर्वांत उंच मूर्तींपैकी एक मूर्ती आहे. या व्यतिरिक्त देशभरात त्यांनी विविध ठिकाणी ५० ते ६० फूट उंचीच्या मारुति, भगवान शिव, दुर्गादेवी आदी देवतांच्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यांच्या पूर्वजांनीही शिल्प बनवण्याचे कार्य केले होते. या कार्यासाठी कर्नाटकचे राजे मुमुडी कृष्णराज वोडेयर यांनी त्यांच्या पूर्वजांना सन्मानित केले होते.
श्री. काशीनाथ के. यांच्याविषयी साधक श्री. अभिषेक पै यांना जाणवलेली सूत्रे
१. श्री. काशीनाथ के. यांच्यात अहं अल्प आहे, असे जाणवले; कारण समाजातील एखादी मोठी व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कार्याविषयी सांगते, तेव्हा त्यातून ‘मी किती मोठे कार्य करतो’, असे त्यांना सांगायचे असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात अहं जाणवतो; मात्र श्री. काशीनाथ के. जेव्हा स्वतः केलेल्या कार्याविषयी सांगत होते, त्या वेळी त्यांच्या बोलण्यातून कुठेही कर्तेपणा जाणवत नव्हता.
२. त्यांची त्यांच्या गुरूंवर पुष्कळ श्रद्धा आहे; कारण ते सातत्याने गुरूंना आर्ततेने हाक मारत असतात.