स्कॉटलंड येथील डंडी विद्यापिठाच्या संशोधनाचा निष्कर्ष
नवी देहली – शस्त्रकर्म कक्षामध्ये (ऑपरेशन थिएटर) शास्त्रीय संगीत ऐकून शल्यचिकित्सकाची कामगिरी लक्षणीयरित्या सुधारली जाऊ शकते, असे स्कॉटलंड येथील डंडी विद्यापिठाच्या नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
१. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की, शास्त्रीय संगीत ऐकण्यामुळे डॉक्टरांच्या कामगिरीत ११ टक्क्यांंपर्यंत वाढ होऊ शकते. संगीतामुळे शस्त्रकर्मपूर्व प्रक्रिया देखील १० टक्के अधिक जलद पूर्ण झाल्या.
२. शास्त्रीय संगीत तणावाची पातळी न्यून करते आणि शल्यचिकित्सकांना लक्ष केंद्रीत करण्यास साहाय्य करते, तसेच रुग्णांची चिंता न्यून करते. संगीत चालू असतांना रुग्णांना भूल देण्याची देखील आवश्यकता न्यून होते.
३. संशोधकांच्या मते, शस्त्रकर्म कक्षामध्ये संगीत सौम्य आवाजात आधीपासूनच वाजवले जात असे. याउलट, मोठा आवाज किंवा कर्णकर्कश संगीत विचलित करणारे असू शकते आणि शस्त्रकर्मानंतरच्या संसर्गामध्ये वाढ देखील आढळते. सध्याच्या अभ्यासाचा एकूण आणि महत्त्वपूर्ण निष्कर्ष असा होता की, संगीताचा सकारात्मक परिणाम शल्यचिकित्सकाच्या कार्यक्षमतेवर होतो.