देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री दत्ताच्या पालखीचे भावपूर्ण आणि उत्साहात स्वागत

श्री शिवगिरी सेवा संस्थेच्या वतीने सनातनच्या आश्रमात आलेली श्री दत्ताची पालखी

देवद – दत्तजयंतीच्या निमित्ताने येथील श्री शिवगिरी सेवा संस्थेच्या वतीने उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात काढलेल्या श्री दत्त पालखीचे येथील सनातनच्या आश्रमात ११ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता आगमन झाले. विविध फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये प.पू. शिवगिरी महाराजांच्या पादुका आणि श्री दत्ताची प्रतिमा ठेवण्यात आली होती. आश्रमात सनातन संस्थेचे संत आणि साधक यांनी पालखीचे भावपूर्ण स्वागत केले. या वेळी पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री प.पू. शांतीगिरीजी महाराज आणि पू. दादा खोत यांसह श्री शिवगिरी सेवा संस्थेतील साधक आणि भक्त उपस्थित होते.

प.पू. शांतीगिरीजी महाराज (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सनातन संस्थेचे साधक श्री. विनायक आगवेकर

पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिलांनी कलश घेतले होते. पुरुष भक्तांनीही पारंपरिक वेश परिधान केला होता. आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. राजेंद्र सांभारे यांनी पालखीचे पूजन करून औक्षण केले. त्यानंतर सनातन संस्थेचे साधक श्री. सुरेश सावंत यांनी धर्मदंडाची पूजा केली. या वेळी सनातन संस्थेचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. विनायक आगवेकर यांनी प.पू. शांतीगिरी महाराज यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला, तसेच त्यांना ‘प.पू. डॉक्टरांचे तेजस्वी विचार’ हा सनातननिर्मित ग्रंथही भेट दिला. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. राजेंद्र सांभारे यांनी पू. दादा खोत यांचाही सन्मान केला. प.पू. शांतीगिरीजी महाराज आणि पू. दादा खोत यांनी साधकांशी थोडा वेळ संवाद साधल्यानंतर पालखी आश्रमातून पुन्हा मार्गस्थ झाली.

 

सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य प्रशंसनीय आहे !
– प.पू. शांतीगिरीजी महाराज, आंतरराष्ट्रीय महामंत्री, पंचदशनाम जुना आखाडा

संत आणि धर्म यांचे कार्य सनातन संस्था करत आहे. तुमच्या कार्याविषयी मला माहिती आहे. तुम्ही सर्व कार्य झोकून देऊन करत आहात. सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य आणि प्रशंसनीय आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment