भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळा’ !

दिव्यानुभूती देणारा सनातन संस्थेच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी दिवस !
जगभरातील साधकांनी नादसंगमाच्या माध्यमातून घेतली श्री महाविष्णुतत्त्वाची अनुभूती

विष्णुसहस्रनामाचे पठण चालू असतांना ते श्रवण करतांना डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, मध्यभागी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

रामनाथी (गोवा) – भगवान श्री महाविष्णु हा विश्‍वपालक आहे. त्याच्याच कृपेने हे विश्‍व नियंत्रित होते. सध्या युगांचा संधीकाळ चालू आहे. सारी सृष्टी आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. अशा या संकटकाळात भक्तवत्सल श्री महाविष्णूचे अवतार म्हणून महर्षींनी गौरवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘हे भगवन्, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी आपण निर्गुण स्थितीतून सगुण स्थितीत यावे’, अशी प्रार्थना करण्यासाठी ११ डिसेंबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळा’ पार पडला. भृगु महर्षि यांनी चेन्नई येथील श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून केलेल्या आज्ञेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा या दत्तजयंतीच्या शुभदिनी (११ डिसेंबर या दिवशी) साक्षात् भूवैकुंठ असलेल्या रामनाथी आश्रमात अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा दिव्य सोहळा पार पडला. अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले काही काळ या सोहळ्यास उपस्थित राहिले.

विष्णुसहस्रनामाचे पठण करतांना डावीकडे श्री. दामोदर वझेगुरुजी आणि शेजारी श्री. सिद्धेश करंदीकर

ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होण्यासाठी, तसेच मोक्षप्राप्ती होण्यासाठी मानवाने ज्याला शरण जावे, असा एकमेव पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीविष्णु ! भगवान महाविष्णूचा प्रत्येक अवतार हा भक्तांच्या उद्धारासाठीच आहे. भक्ताने आर्त साद द्यावी अन् भगवंताने त्याच्या कल्याणासाठी सत्वर धावून यावे, या अलौकिक प्रीतीची अनेक युगे साक्षीदार आहेत. गुरुरूपी भगवंताला अशीच आर्त हाक देण्यासाठी हा सोहळा होता. या दिनी भक्तांच्या उद्धारासाठी त्या विष्णुस्वरूपी गुरुमाऊलीची स्तुती करण्याचे, गुरुमाऊलीतील विष्णुतत्त्व अनुभवण्याचे सौभाग्य सनातन संस्थेच्या साधकांना लाभले. सगुणानंतर निर्गुणाची अनुभूती देणार्‍या श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडलेले सोहळे साधकांनी आतापर्यंत अनुभवले आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेला मात्र ‘शब्दांतही वर्णन करता येणार नाही’, असा दिव्य भावसोहळा साधकांनी अनुभवला.

श्रीविष्णुसहस्रनामाने श्रीमहाविष्णूला जागृत केले जाते. बासरी, सतार या वाद्यांची निर्मिती तर वैकुंठलोकात केवळ श्रीविष्णूची स्तुती करण्यासाठीच झाली आहे. या दैवी वाद्यांच्या नादाने अन् गायन अन् नृत्य यांच्या द्वारे श्री विष्णूची राजोपचारे पूजा केली जाते. तोच श्रीविष्णुलोक आज भूतलावर सनातनच्या रामनाथी आश्रमात अवतरला.

सोहळ्याच्या प्रारंभी सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी पुष्पार्चना केली. श्रीविष्णुसहस्रनामाचे संकीर्तन, बासरीवादन, सतारवादन, गायन आणि नृत्य यांच्या विलक्षण संगमाच्या माध्यमातून श्रीविष्णुतत्त्वाचे आवाहन करण्यात आले. सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दामोदर वझेगुरुजी आणि पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी श्रीविष्णुसहस्रनामाचे भावपूर्ण पठण केले.

भटकळ (कर्नाटक) येथील सनातन संस्थेचे साधक उच्च लोकातून जन्माला आलेले श्री. पार्थ पै (वय १५ वर्षे) याने बासरीवादन, तर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सांगली येथील श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन केले. संगीतसाधनेद्वारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी या दोन्ही भगिनींनी गायनसेवा सादर केली. या वेळी गोवा राज्यातील श्री. रामचंद्र च्यारी यांनी संवादिनीवर, तर श्री. शैलेश बेहरे यांनी टाळ वाजवून साथ दिली. श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी सतारवादन आणि गायन यांच्या वेळी तबलावादन करून साथ दिली. त्यानंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली छत्तीसगड येथील बालसाधिका कु. शर्वरी कानस्कर (वय १२ वर्षे) हिने नृत्यसेवा सादर केली.

सद्गुरुद्वयींनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या केलेल्या मंगल दीपारतीने या दैवी भावसोहळ्याची सांगता झाली. सोहळ्याचे भावपूर्ण सूत्रसंचालन ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी केले. या सोहळ्याला सनातन संस्थेचे सद्गुरु आणि संत उपस्थित होते, तसेच संगणकीय प्रणालीद्वारे या सोहळ्याचा लाभ सनातन संस्थेच्या सर्वत्रच्या साधकांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment