शरयु तिरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी !

Article also available in :

हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीरामचंद्रांचे जन्मस्थान अयोध्या नगरी ! काळ पावले झपाट्याने टाकत असतांना गौरवशाली इतिहासाचा अभ्यास नि आचरण करणे हेही हिंदूंना हिताचे ठरेल. या पार्श्‍वभूमीवर जानकीवल्लभाचा जन्म ज्या पवित्र नगरीत झाला, त्या नगरीचा दैदीप्यमान इतिहास, हिंदु संस्कृतीच्या संवर्धनामध्ये तिने दिलेले योगदान आदी माहिती !

 

१. हिंदु संस्कृतीला जगत्वंद्य करण्यात प्राचीन नगरी अयोध्येची महत्त्वाची भूमिका !

‘अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची ह्यवन्तिका ।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः ॥

अर्थ : अयोध्या (उत्तरप्रदेश), मथुरा (उत्तरप्रदेश), माया म्हणजेच हरिद्वार (उत्तराखंड), काशी (उत्तरप्रदेश), कांची (तमिळनाडू), अवन्तिका म्हणजेच उज्जैन (मध्यप्रदेश) आणि द्वारका (गुजरात) ही मोक्ष देेणारी सात पवित्र ठिकाणे आहेत.

या सप्त मोक्षदायिनी पुण्य नगरींमध्ये आधी नाव घेतली जाणारी नगरी म्हणजे अयोध्या ! भारताची प्राचीन सनातन संस्कृती काही सहस्र वर्षे बहरत गेली, वृद्धींगत होत गेली. या संस्कृतीला नि सभ्यतेला नावलौकिकास आणण्यास, जगत्वंद्य करण्यास, अर्थ देण्यास ज्या अनेक घटकांनी योगदान दिले, त्या घटकांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच ही प्राचीन नगरी अयोध्या !

अयोध्येतील हेच ते पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणी प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांनी शरयू नदीत
अवतार समाप्त केला ! याला गुप्तहरि (गुप्तारघाट) असे संबोधले जाते !

 

२. जिच्याशी युद्ध करता येणार नाही, अशी स्वर्गतुल्य नगरी म्हणजेच अयोध्या !

ही मनुनिर्मित नगरी. हिच्या रचनेचा जेव्हा मानस झाला, तेव्हा आपल्या सर्व कुशलतेचा परिचय देत देवशिल्पी विश्‍वकाने या नगरीची रचना केली. स्कंदपुराणात अयोध्येचे वर्णन आहे. त्याचे रचयिता म्हणतात आणि त्या काळची बहुधा ही श्रद्धा होती की, ही पुण्यनगरी श्रीविष्णूंच्या सुदर्शन चक्रावर विराजमान आहे. अथर्ववेदात अयोध्येला प्रत्यक्ष ईश्‍वराची नगरी म्हटलेले आहे. ‘अष्टचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या ।’ अशा शब्दांत अथर्ववेद म्हणतो की, या नगरीच्या संपन्नतेची नि वैभवाची श्रेष्ठता ही स्वर्गाइतकीच आहे. या नगरीला त्यांनी ‘स्वर्गतुल्य’ म्हटलेले आहे. या नगरीचे नावच तिचे वैशिष्ट्य आहे, तिची ओळख आहे. ‘अ + योध्या’, यातील ‘यौध्य’ म्हणजे ज्याच्याशी युद्ध करू शकतो, असा. याचा अर्थ असा की, जो आपल्याला तुल्यबळ आहे. याच अर्थाने ‘अयोध्या’ म्हणजे जिच्याशी युद्ध करता येणार नाही, अशी नगरी ! कौशल राज्याची राजधानी, जिच्या तुल्यबळ कोणीच नाही; जी अजेय आहे, अतुल्य आहे, ती म्हणजे अयोध्या. हे अक्षरशः सार्थ करून दाखवणार्‍या ज्या नरपुंगवांनी या नगरीचे राजपद भूषवले, त्या नावांवर जरी दृष्टी टाकली, तरी याची प्रचीती येईल.

 

३. क्षात्रतेजाने तळपत असलेली अयोध्या नगरी !

सूर्यपुत्र वैवस्वत मनुने अयोध्या नगरीची निर्मिती केली. ‘शरयू’ म्हणजेच सृजन करणार्‍या नदीच्या परिसरात वैवस्वत मनुंचा महान पुत्र ‘इक्ष्वाकु’ याने राजधर्माचे, समाजधर्माचे आणि व्यक्तीधर्माचे आचरण करणारी संहिता त्याच्या राज्यात अमलात आणली. पुढील काळात ‘सूर्यवंश’ म्हणून ओळखल्या गेलेल्या महाप्रतापी कुळाचे आद्य ते हेच ! याच कुळात पुढे जन्माला आला महाराजा पृथ ! असे म्हणतात की, ‘‘या धरित्रीला जी ‘पृथ्वी’ ही संज्ञा प्राप्त झाली आहे, ती महाराजा पृथ याच्यामुळेच ! जर याचा वेगळा अर्थ लावायचा झाला, तर असे म्हणता येईल की, सगळी पृथ्वीच पृथु राजाच्या राज्याचा विस्तार होती. या कुळातील महाराजा गंधात्रीने शंभर अश्‍वमेध आणि शंभर राजसूय यज्ञ केले अन् त्याचे स्वामीत्व जगाने पुन्हा पुन्हा स्वीकारले. राजा हरिश्‍चंद्राबद्दल काय सांगावे ? दान आणि सत्यनिष्ठता यांचे पर्यायी नावच राजा हरिश्‍चंद्र आहे. खर्‍या अर्थाने राजयोगी !

देवराज इंद्राच्या आसनाला हादरा देणारा महाराजा सगर हाही याच कुळातला ! प्रजेच्या हितासाठी समस्त जिवांच्या कल्याणाकरता आपल्या तपोबलाने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर अवतरित करणारा महातपस्वी भगिरथ राजा हाही ‘सूर्यवंश’ कुळातीलच ! दहा रथींचे बळ ज्या एकट्या वीराकडे आहे, असा महावीर राजा दशरथ ! म्हणूनच यात काय आश्‍चर्य की, अशा या महान कुळामध्ये आणि पुण्यनगरीत प्रत्यक्ष परमेश्‍वराने प्रभु श्रीरामांच्या रूपाने अवतार धारण केला. शाक्य वंशही मूळ इक्ष्वाकु वंशाचाच विस्तार आहे किंवा शाखा आहे. सम्राट अशोकच्या काळात मौर्य साम्राज्यामध्ये अयोध्या एक मोठे व्यापारी केंद्र देखील होते. ही अशी अयोध्येच्या क्षात्रतेजाची पताका दिगंताला पोचली होती.

 

४. अयोध्येला पुन्हा वसवणारा सम्राट विक्रमादित्य !

उज्जैनचा राजा सम्राट विक्रमादित्य याने अयोध्येला भेट दिली होती. त्यांनी काळाच्या ओघात जीर्ण झालेल्या या नगरीतील अनेक वास्तू आणि देवालये यांचा जीर्णोद्धार केला. सम्राटाने काही नवीन मंदिरांची निर्मितीदेखील केली. हा साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा काळ ! थोडक्यात सांगायचे, तर विक्रमादित्याने अयोध्या पुन्हा वसवण्याचा प्रयत्न केला.

 

५. अयोध्येचे महत्त्व प्रतिपादणारे अन्य काही ऐतिहासिक उल्लेख !

इसवी सन १५७४ मध्ये संत तुलसीदास यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘रामचरितमानस’ या ग्रंथाच्या रचनेचा आरंभ अयोध्येत केला. इसवी सन १८०० मध्ये भगवान श्री स्वामीनारायण यांनी स्वामीनारायण पंथाची स्थापना केली. त्यांचे बालपण अयोध्येतच गेले. पुढे भगवान स्वामीनारायण यांनी आपली ७ वर्षांची यात्रा ‘नीलकंठ’ या नावाने अयोध्येतूनच चालू केली. शीख संप्रदायाचाही अयोध्येशी जवळचा संबंध आहे. रामजन्मभूमी संग्रामात शीख गुरूंचेही योगदान आहे.

इसवी सनाच्या तिसर्‍या-चौथ्या शतकात ‘फा हीयान’ या चिनी बौद्ध भिख्खूने आपल्या प्रवासातील नोंदीत अयोध्येचा उल्लेख केलेला आहे. त्या काळी भारतीय संस्कृतीची ध्वजा दशदिशांना तेजाने तळपत होती. अयोध्येची भूमी ही बृहदारतात, म्हणजेच सांस्कृतिक भारतात वंदनीय होती. आजच्या थायलंडमधील ‘अयुद्धया’ आणि इंडोनेशियामधील ‘जोगजा/जोगजकार्ता’ (योग्यकार्ता) या दोन्ही नगरांची नावे ही अयोध्येवरून ठेवण्यात आली आहेत अन् आजही तीच आहेत.

 

६. दक्षिण कोरियाशी जवळचा संबंध असलेली अयोध्या !

तेराव्या शतकातील दक्षिण कोरियाच्या ‘समगुक युसा’ नावाच्या इतिवृत्तात (Chronicle मध्ये) ‘हिओ व्हांग ओक’ या पौराणिक राणीचा उल्लेख आहे. कोरियाई द्विपाच्या दक्षिणेला  ‘गया’ नावाचे एक राज्य होते. ‘सुरो’ हे गया राज्याचे संस्थापक होते. सुरो राजाने भारतीय राज्यांमधील ‘अयुता’ साम्राज्याच्या राजकुमारीशी विवाह केला. ‘अयुता’ नावाचे राज्य म्हणजे मूळ अयोध्या या नावाचे अपभ्रंशित रूप आहे.

या संदर्भात असे सांगितले जाते की, राणीच्या आई-वडिलांना त्यांच्या स्वप्नात दृष्टांत झाला. त्यांना देवाने अशी आज्ञा केली की, तुम्ही तुमच्या मुलीला म्हणजेच राजकन्येला ‘सुरो’ राजाकडे पाठवून त्याच्याशी लग्न लावून द्या ! स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे त्यांनी राजकन्येला सेवकांसहित (आजच्या) दक्षिण कोरियाकडे रवाना केले. जवळजवळ दोन मासांच्या सागरी प्रवासानंतर राजकन्या गया राज्यात पोचली आणि ते दोघे विवाहबद्ध झाले. आज कोरियामध्ये स्वत:ला या राणीचे वंशज मानणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वर्ष २००९ मध्ये या राणीच्या सन्मानार्थ कोरियाई शिष्टमंडळाने अयोध्येत एक स्मारक उभारले. नुकतेच वर्ष २०१६ मध्ये या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठीही कोरियाच्या वतीने प्रस्ताव देण्यात आला होता. ६ नोव्हेंबर २०१८ च्या दिवाळीत कोरियाची राणी ‘कीम’ यांनी या जीर्णोद्धाराची कोनशिला बसवली.

 

७. सहस्रावधी वर्षांची महाप्रतापी परंपरा लाभलेली अयोध्यानगरी !

इतिहासाच्या आरंभापासून ते आजपर्यंत अयोध्येचा उल्लेख सर्व काळात, सर्व युगात येतो. प्रत्येक स्थित्यंतराची ही नगरी साक्षी आहे. मग ती स्थित्यंतरे राजकीय असोत, सामाजिक असोत वा धार्मिक असोत. असे नाही की, संकटे आली नाहीत, अस्थिरता आली नाही, परचक्र आले नाही; पण या नगरीने आपली ओळख पुसू दिली नाही. महाभारताच्या सभापर्वात

‘अयोध्यायां तु धर्मज्ञं दीर्घयज्ञं महाबलम् ।
अजयत् पाण्डवश्रेष्ठो नातितीव्रेण कर्मणा ॥’

– महाभारत, पर्व २, अध्याय ३०, श्‍लोक २

अर्थ : वैशंपायन राजा जनमेजयाला म्हणाले, ‘‘ त्यानंतर पांडवश्रेष्ठ भीमसेन अयोध्येला पोहोचले आणि तेथील दीर्घयज्ञ नावाच्या राजाला सहजतेने जिंकून घेतले.’’

ही तीच अयोध्या आहे, जिने इतिहासाचा आरंभ पाहिला आहे, जिने पृथूचा पराक्रम पाहिला आहे, जिने सत्यवती हरिश्‍चंद्र पाहिला आहे, जिने दृढ निश्‍चयी भगीरथ पाहिला आहे ! आपल्या पोटच्या कुमार वयाच्या राजपुत्रांना धर्मरक्षणासाठी महाभयंकर राक्षसांशी युद्धाला पाठवणारा राजा दशरथ पाहिला आहे. या अयोध्येनेच ‘रामराज्य’ पाहिले आहे. आजही हीच अयोध्या हिंदु तेजाला जागृत करत आहे नि त्यांच्या प्रतापाच्या परिचयाची साक्ष पुढच्या पिढीला सांगत आहे. अयोध्या चिरंतन आहे, अक्षय्यी आहे !

– श्री. विजय वेदपाठक (साभार : दैनिक ‘तरुण भारत’)

Leave a Comment