रामनाथी (गोवा) – उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांनी २ डिसेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. वैभव माणगावकर यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. नित्यानंद स्वामीजी यांचे शिष्य असलेले उदयानंद स्वामी यांचे मूळ नाव अनंत पद्मनाभस्वामी असे आहे, तर प्रचलित नाव उदयानंद स्वामीजी असे आहे. त्यांना जन्मापासून सूक्ष्मातून ज्ञान मिळत आहे. वास्तूशास्त्र, संख्याशास्त्र, आयुर्वेद, संगीतशास्त्र आदी विषयांवर त्यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत आहे.
१. उदयानंद स्वामी यांची सूक्ष्मातून जाणण्याची अफाट क्षमता !
स्वामीजींनी आश्रमातील वास्तव्याच्या काळात संख्याशास्त्र, तसेच आयुर्वेद आदी विषयांवर अभ्यासवर्ग घेऊन साधकांना मार्गदर्शन केले. संख्याशास्त्र उलगडून सांगतांना स्वामीजींनी काही साधकांच्या जन्मदिनांकावरून त्यांचे भविष्यकथन केले. त्यामध्ये साधकाचा स्वभाव, आध्यात्मिक वाटचाल यांविषयी सांगितले. ते तंतोतंत जुळत असल्याचे साधकांनी अनुभवले. स्वामीजींनी आयुर्वेदाविषयीचे लौकिक शिक्षण घेतलेले नाही. त्यांना त्याविषयी सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होते. शारीरिक त्रासांवर त्यांनी आयुर्वेदानुसार सांगितलेले उपाय मूळ आयुर्वेदाशी जुळणारे आहेत.
२. उदयानंद स्वामी यांची नम्रता आणि शिष्यभाव !
अ. ‘मी तुमच्या आश्रमात शिकवण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी आलो आहे’, असे स्वामीजी वारंवार म्हणत होते.
आ. आश्रमातील निवासाच्या कालावधीत स्वामीजींच्या पलंगावर तक्के आणि उशी ठेवण्यात आली होती. तेव्हा स्वामीजींनी त्या पलंगावर स्वतः विश्रांती न घेता त्यांचे गुरु नित्यानंद स्वामी यांची प्रतिमा ठेवली आणि त्यांनी स्वतः अन्य पलंगाचा उपयोग केला.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी उदयानंद स्वामी यांनी काढलेले गौरवोद्गार !
अ. तुमच्या गुरूंमध्ये एवढी शक्ती आहे की, ते केवळ आश्रमातील साधकांनाच नाही, तर कोट्यवधी साधकांनाही सांभाळू शकतात.
आ. उदयानंद स्वामी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत गेले नव्हते; मात्र स्वामीजींना सूक्ष्मातून लक्षात आले की, परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील नळाच्या पाण्यातून ॐकार नाद ऐकू येतो. प्रत्यक्षातही साधकांनाही तशी अनुभूती येते.
४. सनातन आश्रमाविषयी उदयानंद स्वामी यांनी काढलेले गौरवोद्गार !
अ. सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. जे काही करत आहेत, ते विष्णुस्वरूप गुरुदेवच करत आहेत. खरे वैकुंठ म्हणजे सनातन आश्रम आहे.
आ. साधकाने स्वतःत पालट करण्यासाठी आपण आश्रमात येऊन राहिले पाहिजे. आपण आश्रमात येऊन राहिल्यावरच आपल्यात पालट होतील.
इ. माझे अनेक जन्मांचे पुण्य आहे की, मी अशा आश्रमात आलो.
ई. सनातन आश्रम हे ‘आध्यात्मिक आश्रमांत व्यवस्था कशी असावी’, याचे प्रशिक्षण केंद्र व्हायला हवे. भारतभरातील सर्व आश्रमांच्या प्रतिनिधींनी येथील व्यवस्था शिकून घ्यावी.
उ. आश्रमात सर्वत्र इतकी सकारात्कता आहे की, ते वातावरण ध्यान करण्यासाठी अनुकूल आहे.
ऊ. आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करतांना स्वामीजी म्हणाले की, या अन्नामध्ये पुष्कळ सात्त्विक स्पंदने जाणवतात.
५. उदयानंद स्वामी यांनी सनातनच्या साधकांना केलेले मार्गदर्शन
अ. गुरु शिष्यासाठी धडपडत असतात. शिष्याची प्रगती व्हावी, यासाठी गुरुच आपल्याला शोधत येतात.
आ. प्रत्येक साधकात असा दृढविश्वास हवा की, गुरु माझ्यातच आहेत आणि तेच माझी आध्यात्मिक प्रगती करवून घेणार आहेत.
इ. माझे गुरु नित्यानंद स्वामी यांची कृपाही सर्व साधकांवर आहे. नित्यानंद स्वामी सनातनचे साधक आणि गुरुदेव यांना काही होऊ देणार नाहीत.
६. उदयानंद स्वामी यांचे आपत्काळाच्या संदर्भातील विचार !
अ. बेंगळुरू, मंगळूरू आणि मुंबई या शहरांना भविष्यात धोका आहे.
आ. घरे बांधतांना अधिकाधिक २ मजली इमारती बांधाव्या. त्याहून उंच इमारती बांधल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
७. उदयानंद स्वामी यांचे अन्य मौलिक विचार !
अ. पाश्चात्त्य संगीतामुळे वेडेपणा येतो, तर श्लोक म्हणणे किंवा डमरूचा नाद ऐकणे यांमुळे साधकाची कुंडलिनी जागृत होते.
आ. समाजातील व्यवहारिक लोक तात्कालिक सुखासाठी धडपडत असतात. त्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो; मात्र कोणीही शाश्वत सुखासाठी प्रयत्न करत नाहीत.