११ सहस्र वैज्ञानिकांनी दिली धोक्याची चेतावणी
सनातनसह अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनी ‘आगामी काळात पृथ्वीवर भयावह संकटे येतील’, असे सांगितले होते. यातून ‘विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे’, हेच सिद्ध होते. वैज्ञानिकांनी निदर्शनास आणून दिलेला धोका लक्षात घेऊन आतातरी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मावर विश्वास ठेवतील का ?
नवी देहली – अंटार्टिकामधील सर्वांत जुना आणि स्थिर मानला जाणारा, तसेच ‘द लास्ट आइस एरिया’ नावाने ओळखला जाणारा हिमनग अतीवेगाने वितळू लागला आहे. जर त्याचा हा वेग असाच राहिला, तर येत्या काही वर्षांत पृथ्वीवर भयावह संकट येईल. त्यामध्ये घरे, शेतभूमी, मैदाने आणि मोठमोठी शहरे पाण्याखाली जातील, अशी धोक्याची चेतावणी १३० देशांमधील ११ सहस्र वैज्ञानिकांनी दिली आहे.
वर्ष २०१६ मध्ये हिमनगाच्या भागाचे क्षेत्रफळ ४१.४३ लाख वर्ग कि.मी. होते. ते आता ९.९९ लाख वर्ग कि.मी. इतकेच राहिले आहे. वर्ष २०३० पर्यंत तो हिमनग नावालाही शेष राहिलेला नसेल. अंटार्टिकामधील बर्फ वितळण्याचा वेग पाहता येत्या काही वर्षांत समुद्राच्या पाण्याचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्रीनलँड आणि कॅनडा येथे उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलर बिअर, व्हेल, पेंग्विन यांसारख्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याचाच अर्थ ‘पृथ्वी संकटात असून तापमानवाढीच्या विरोधात सर्व देशांनी एकत्रितपणे कार्यक्रम राबवला नाही, तर विनाश अटळ आहे’, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.