९. संगीताचे अत्तर सिद्ध करण्याची प्रक्रिया
९ अ. ‘स्वराला अभिव्यक्त करण्यासाठी गंधही वापरता येईल’, या अत्तर
बनवण्याच्या संकल्पनेला गंधशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दुजोरा देणे
जेव्हा माझे संगीताचे अत्तर सिद्ध झाले, तेव्हा मी वार्ताहर परिषद घेतली होती. त्या वेळी मला गंधशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले काही विद्यार्थी भेटले. ‘मी काय केले आहे ?’, हे पहायला त्यांनी माझ्या अत्तरांचा पूर्ण संच मागितला. मी त्यांना ‘ती अत्तरे कशी बनवली आहेत’, हे सांगून ‘प्रत्येक रागात तांत्रिकदृष्ट्या काही गोष्टी कशा जुळवल्या आहेत’, हेसुद्धा दाखवले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी जे शिकवले आहे, ते हेच आहे.’ मी त्यांना सांगितले, ‘‘समजा, तुम्हाला लिलीचा सुगंध बनवायचा असल्यास ‘तुमच्यासाठी लिली काय आहे ? लिलीचा सुगंध घेतल्यावर कोणते गाणे आठवते ? लिली तुम्ही कशाशी संबंधित कराल ?’, आदी गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या उत्तरांनुसार त्यात आवश्यक ते घटक (ingredients) घालावे लागतात. एखादा पदार्थ बनवतांना आपण त्यात चवीनुसार पदार्थ घालतो आणि ‘त्यात अजून काय घातले ?, तर तो आणखी चांगला होईल ?’, हे पहातो. गंधाचेही असेच असून स्वरांचे आणि स्वरगंधाचेसुद्धा तसेच आहे. ‘जसे स्वराला अभिव्यक्त करण्यासाठी शब्द वापरले जातात, तसे स्वराला अभिव्यक्त करण्यासाठी गंधही वापरता येऊ शकते. ‘गंध कसा वापरता येईल ?’ या विचारांतून ही सर्व प्रक्रिया निर्माण झाली.’’
९ आ. एखाद्या व्यक्तीमत्त्वावरून एखादे गंधद्रव्य (परफ्यूम) बनवले
जाते, त्याप्रमाणे रागाचा विविध अंगांनी अभ्यास करून अत्तर बनवले जाणे
दुकानात जी विदेशी गंधद्रव्ये (परफ्यूम्स) मिळतात, ती एखाद्या व्यक्तीला डोळ्यांसमोर ठेवून बनवलेेली असतात आणि त्या व्यक्तीचेच नाव त्या गंधद्रव्याला दिलेले असते, उदा. Rasasi, Amuvaj, Jivanchi, Marcoplo, Parasilton, इत्यादी. ही सगळी गंधद्रव्यांची (सेंटची) नावे असून ही सगळी व्यक्तींचीही नावे आहेत आणि ते गंधद्रव्य त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावरून बनवले आहे. भारतात श्री. अमिताभ बच्चन यांच्या नावाचे एक गंधद्रव्य उपलब्ध आहे. ते कसे बनवले ? तर श्री. अमिताभ बच्चन यांचे व्यक्तीमत्त्व पहाता ‘त्यांच्या गंधद्रव्याचा (परफ्यूमचा) वास कसा असेल ? त्यांच्याशी कोणता गंध जुळेल ?’, याचा विचार करून त्यानुसार अत्तर बनवण्याचे साहित्य घेऊन ते बनवले जाते. त्याचप्रमाणे ‘रागाची अभिव्यक्ती काय आहे ? रागाचे पात्र काय आहे ? रागातून कशाचा बोध (perception) होतो ? स्वतःच्या मनाला राग कसा भावला आहे ? तो ऐकल्यावर माझ्या मनाला काय वाटते आहे ?’, आदी विचार करून जी आकृती बनते, त्या आकृतीला साजेसा गंध देण्याचा प्रयत्न केला आहे.
९ इ. विविध राग ऐकत अत्तर बनवून ती संगीत
क्षेत्रातील परिचितांना देणे आणि त्यांना प्रश्न विचारून अभ्यास करणे
यासाठी मी अत्तरांचे बरेच प्रयोग केले. सगळ्यांत प्रथम मी माझ्या संगीत विषयातील एका मित्राला त्याला ठाऊक असलेल्या रागाचे अत्तर दिले. ते बनवतांना मी पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व आणि श्रीमती किशोरीताई आमोणकर यांचे विशिष्ट ध्वनीमुद्रण (रेकॉर्डींग) घेतले. प्रयोग करता करता माझे ते ते राग ऐकणे सतत चालू होते. संगीत क्षेत्रातील माझ्या परिचितांना मी ही अत्तरे चाचणीसाठी दिली आणि ‘तो राग ऐकतांना त्यांना तो गंध चांगला वाटतो का ? कोणत्या वेळी चांगला वाटतो ?’ असे विविध प्रश्न विचारले.
९ ई. विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर यांनी रागांमध्ये थाटांचा
समावेश करण्यास सांगणे आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार विशिष्ट
राग घेऊन त्या रागाची वैशिष्ट्ये त्या संबंधित गंधातून मांडण्याचा प्रयत्न करणे
याचे उद्घाटन विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. श्री. शंकर अभ्यंकरांना ही संकल्पना पुष्कळ आवडली. त्यांनी आम्हाला ‘यामध्ये थाटांचा समावेश करा; कारण जे थाट राग आहेत, तसे मूळ गंध आहेत. जे मूळ आहे, त्यांना जोडण्याचा प्रयत्न करा’, असे मार्गदर्शन आम्हाला केले. (टीप : राग निर्माण करणार्या स्वररचनेस ‘थाट’ म्हटले आहे.) गंधशास्त्राच्या मूळ संहितेतून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी आम्हाला ती वाचण्यासही सांगितली. आम्ही तिचा अभ्यास केला. माझी पत्नी सौ. योगिता आणि मी आम्ही दोघांनी वरील सूत्रांवर विचारविनिमय केला आणि विशिष्ट राग घेऊन त्या रागाची वैशिष्ट्ये त्या गंधातून मांडण्याचा प्रयत्न केला, उदा. राग ललत. ललत या रागाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘भक्तीरस’ हा त्याचा भाव आहे. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या रागामध्ये ‘शुद्ध’ आणि ‘तीव्र’ असे २ ‘मध्यम’ सलग लागतात. अन्य कोणत्याच रागात दोन मध्यम सलग लागत नाहीत. एकतर आरोहात लागतो किंवा अवरोहात लागतो किंवा मध्ये ‘प’ तरी असतो किंवा त्याला वक्र पद्धतीने लावले जाते.
ललत रागाचे अत्तर साकार करतांना ठरवले की, यातून दोन गंध सलग आले पाहिजेत. सुगंध घेतांना दोन गंध आले पाहिजेत आणि ते दोन्ही भक्तीरसाचे हवेत. त्यासाठी गुलाब आणि चंदन हे दोन गंध निवडले. रागात जसे इतर स्वर असतात, उदा. वादी-संवादी, अनुवादी, विवादी इत्यादी, तसे त्याला पारंपारिक अष्टगंध, केशर आणि कस्तुरी यांचे संयोजन करून सर्व गंधांचे मिश्रण करून तो ललत सिद्ध केला.
टीप – १. शुद्ध स्वर : जेव्हा सातही स्वर आपल्या मूळ जागेवरच असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’ असे म्हणतात.
२. तीव्र स्वर : जो स्वर आपली मूळ जागा सोडून अधिक उंचीवर जातो; परंतु पुढील स्वरापेक्षा अल्प उंचीवर असतो, त्याला ‘तीव्र स्वर’ असे म्हणतात. सात स्वरांत केवळ ‘म’ हा स्वर तीव्र होतो.
३. आरोह : स्वर क्रमाक्रमाने चढवत जाण्याच्या क्रियेला ‘आरोह’ असे म्हणतात. सा रे ग म प ध नी सां ।
४. अवरोह : स्वर क्रमाक्रमाने उतरवत येण्याच्या क्रियेला ‘अवरोह’ असे म्हणतात.
५. अनुवादी स्वर : वादी आणि संवादी स्वर सोडून रागात येणार्या अन्य स्वरांना ‘अनुवादी स्वर’ असे म्हणतात.
६. वर्ज्य स्वर (विवादी स्वर) : जे स्वर रागात येत नाहीत, त्यांना ‘वर्ज्य स्वर अथवा विवादी स्वर’ असे म्हणतात.
१०. रागांनुसार केलेली गंधनिर्मिती ही मनातून आलेल्या भावांचा आविष्कार !
आतापर्यंत आमचे १८ – १९ रागांवर काम झाले आहे. ‘या रागाचे हेच अत्तर’, असे म्हणता येऊ शकत नाही; कारण ती तशी समज आहे, कल्पना आहे. ते माझ्या मनातले भाव आहेत. मी त्या रागातल्या भावांचा गंधातून केलेला आविष्कार आहे. या सगळ्या गोष्टी पुष्कळ अमूर्त आहेत, म्हणजे ‘हा याचा गंध, हा याचा वास’, असे काही याचे मूर्त प्रमाण नाही. आपल्याला जसे भक्ती म्हटले की, चंदन भावते किंवा चंदनाचा वास आठवतो आणि भक्तीरसाकडेच नेणार्या आध्यात्मिक गोष्टी आठवतात, तसे विदेशी लोकांना होत नाही. त्यामुळे आम्ही बाहेरच्या वातावरणात उपयोगी असणारी काही ‘सॉनेट’, ‘बॅले’ या नावांची विदेशी अत्तरेही बनवली आहेत.’
११. गंधशास्त्र आणि संगीत यांत असलेले साधर्म्य
११ अ. संगीतातील स्वरांप्रमाणे सुगंधातही वेगवेगळ्या
स्तरांचे गंध असून गंधशास्त्रात त्यांना ‘नोट’ असे म्हटले जाणे
अभ्यास करतांना मला संगीत आणि गंधशास्त्र यांत साधर्म्य जाणवले. संगीतात स्वर असतात. त्यांना ‘म्युझिकल नोट्स’ (स्वर) असे म्हणतात. त्याचप्रमाणे सुगंधांतही वेगवेगळ्या स्तरांचे गंध असतात. गंधशास्त्रामध्ये त्यालाच ढोबळपणे ‘नोट’ असे नाव दिले आहे. भारतीय संगीतामध्ये ‘आलाप’, ‘जोड’ आणि ‘झाला’ हे तीन प्रकार आहेत. ते अनुक्रमे ‘विलंबित’, ‘मध्य’ आणि ‘दृत’ या लयींत वाजवले जातात. गंधशास्त्रातही ‘टॉप नोट’, ‘मिडल नोट’ आणि ‘बेस नोट’ अशा तीन नोट आहेत.
११ अ १. टॉप नोट
अत्तराची कुपी उघडल्याक्षणी तिच्यातून वातावरणात गंध पसरतो आणि तो आपल्याला जाणवतो; परंतु कुपी बंद केल्यावर तो गंध येणे बंद होते, म्हणजे या अत्तराच्या गंधाच्या हलक्या; परंतु लगेच पसरणार्या लहरी असतात. त्यांना ‘टॉप नोट’ असे म्हटले जाते. ‘टॉप नोट’चा गंध फार काळ टिकणारा नसतो.
११ अ २. मिडल नोट
‘टॉप नोट’चा गंध गेल्यावर नंतर येणार्या गंधलहरींना ‘मिडल नोट’ असे म्हटले जाते. ‘मिडल नोट’ हा अत्तराच्या गंधाचा एक प्रकारे गाभा आहे.
११ अ ३. बेस नोट
तिसरा गंध, जो नंतर दीर्घकाळ रेंगाळत रहातो, त्याला ‘बेस नोट’ म्हणतात.
गंध एकच असला, तरी ‘त्याचे प्रकटीकरण कसे होते ?’, याचे हे एक प्रकारे विश्लेषण आहे. म्हणजेच संगीतातील मंद्र, मध्य आणि तार सप्तक अशी उंची गाठणार्या स्वर लहरींसारखेच हे गंधाचे वर्गीकरण केले आहे.
(टीप : मंद्र, मध्य आणि तार सप्तक : सा, रे, ग, म, प, ध, नी या सात स्वरांच्या समूहास ‘सप्तक’ असे म्हणतात. संगीतातील सप्तक पुरे होण्यास त्यात पहिल्या स्वरांचे दुसरे रूप मिळवावे लागते. सा, रे, ग, म, प, ध, नी आणि सा असे सप्तक होते. अशी ३ सप्तके आहेत, ती म्हणजे मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक.)
११ आ. संगीतातील रागाचे स्वरूप दाखवणार्या ‘आलाप’, ‘जोड’ आणि ‘झाला’ यांच्याप्रमाणेच गंधाचे
स्वरूप त्याच्या विविध स्तरांद्वारे, म्हणजे ‘टॉप नोट’, ‘मिडल नोट’ अन् ‘बेस नोट’ यांद्वारे दर्शवले जात असणे
गंधाची उत्पत्ती होते आणि काही काळ तो गंध परिपूर्ण स्थितीत असतो, म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये पूर्ण परिपक्व होतोे अन् त्यानंतर काही काळाने तो लय पावतो. त्यामुळे या गंधलहरींना उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी जोडता येते. गंधाच्या या तीन नोट आणि संगीतातील (सतारीवर वाजवले जाणारे) ‘आलाप’, ‘जोड’ अन् ‘झाला’ यांच्यामध्येही पुष्कळ साम्य आहे. आलापातून रागाचे स्वरूप मांडले जाते. पूर्ण विलंबित लयीत त्या रागाचा आविष्कार होतो आणि द्रुत (शीघ्र) लयीमध्ये त्याची सांगता होेते. रागाचे एखादे रूप आलापातून दाखवले जाते. त्याचप्रमाणे गंधशास्त्रामध्ये गंधाचे स्वरूप ‘टॉप नोट’मधून संबोधित केले जाते. त्यानंतर त्या अत्तराची १ – २ – ४ किंवा ८ घंटे जेवढी अंतिम क्षमता आहे, तेवढ्या वेळेत पूर्ण गंधाची एक नोट, म्हणजे ‘मिडल नोट’ जिला आपण ‘हार्ट ऑफ द पर्फ्यूम’ म्हणतो, ती बाहेर येते आणि शेवटी ज्याच्यावर ते अत्तर सिद्ध केले आहे, तो त्या अत्तराचा पाया (बेस नोट) बाहेर येतो. त्यामुळे मला संगीत आणि गंध या दोन्हींत सारखेपणा सापडला. ‘संगीत आणि गंध हे जसे कलात्मक आहेत, तसे ते शास्त्रही आहे’, असे माझ्या लक्षात आले.
(विलंबित : अतिशय सावकाश गतीत गायन किंवा वादन करणे
मध्यलय : विलंबितपेक्षा जरा जलद गतीत गायन किंवा वादन करणे द्रुतलय : जलद गतीत गायन किंवा वादन करणे
आलाप : विलंबित गतीत रागाचा स्वरविस्तार करून गायन किंवा वादन करणे
जोड : सतारीवरील मध्य लयीतील राग वादनाचा एक प्रकार
झाला : सतारीवरील द्रुत गतीतील राग वादनाचा एक प्रकार)