६. संगीत अथवा राग यांतून व्यक्त
होणार्या भावाचा विचार करून अत्तरनिर्मिती केली जाणे
संगीत, कंठसंगीत किंवा शास्त्रीय संगीत हे पूर्णपणे भावाधिष्ठित आहे. यात भाव महत्त्वाचा आहे. पदार्थ बनवतांना साधनसामग्री असली, तरी चव शेवटी बनवणार्याच्या हातात असते. त्याचप्रमाणे राग, त्याचे वादी आणि संवादी स्वर (टीप), तसेच राग गायनाचा समय ही संगीतातील साधनसामग्री झाली. गाणे म्हणणार्याच्या मनात जो भाव आहे, तो भाव या रागातून प्रगट होतो. त्याचप्रकारे एखादे अत्तर बनवायचे असल्यास ‘कुठल्या सामग्रीचा उपयोग केल्यावर त्याची परिणामकारकता वाढेल ?’, हा विचार आधी करावा लागतो, उदा. गुलाबाचे अत्तर बनवायचे आहे, तर ‘गुलाब कसा आहे ?’ (तो झाडावरील आहे कि गुलदस्त्यातील आहे ? फुलदाणीतील आहे ?, एखाद्या स्त्रीने केसांत माळलेला आहे कि देवाला वाहिलेला आहे ?), याचा विचार करावा लागतो. या सगळ्या गुलाबांचा सुगंध एकच आहे; पण गुलाबाचा उपयोग करतांना प्रत्येकाचा भाव मात्र वेगळा आहे.
टीप
१. वादी स्वर : रागातील प्रमुख स्वरांस ‘वादी स्वर’ असे म्हणतात. वादी स्वरांचा उपयोग रागात प्रामुख्याने आणि अधिक प्रमाणात केला जातो.
२. संवादी स्वर : रागातील दुसर्या प्रमुख स्वरांस ‘संवादी स्वर’ असे म्हणतात. हे स्वर वादी स्वरांच्या खालोखाल महत्त्वाचे असतात.
६ अ. ‘ललत’ या भक्तीरसप्रधान आणि आर्तभाव निर्माण करणार्या
रागासाठी गुलाब अन् चंदन या दोन्हींच्या मिश्रणातून अत्तर सिद्ध करणे
ज्याच्यासाठी गंध बनवायचा आहे, त्यानुसार ‘कोणत्या गुलाबाच्या फुलाचा उपयोग करायचा ?’, हे ठरवावे लागते, उदा. राग ‘ललत’ हा भक्तीरसप्रधान राग आहे. त्यामुळे देवाला वाहिलेल्या गुलाबाचा मी त्यात उपयोग केला. हा राग भक्तीरसप्रधान असून तो आर्तभाव निर्माण करणाराही असल्याने भक्तीरस ज्या गंधातून व्यक्त होतो, त्या चंदनाचा उपयोगही मी त्यात केला. म्हणजे गुलाब आणि चंदन या दोघांचे मिश्रण करून ललत रागाचे अत्तर सिद्ध केले.
६ आ. देस रागाचे अत्तर सिद्ध करतांना उद आणि गुलाब या दोन्हींचे मिश्रण करणे
राग ‘देस’ म्हटल्यावर हिमाचल प्रदेश, हिमालयातील बर्फांचे डोंगर आणि तिथला निसर्ग आदी दृश्ये डोळ्यांसमोर येतात. खमाज किंवा पहाडी राग म्हटल्यावर काश्मीरचे सौंदर्य डोळ्यांसमोर उभे रहाते. उद हा डोंगराळ भागात येणार्या गंधाशी संबंधित असून देस हा राग गोड असल्याने त्यात गुलाबाचाही अंतर्भाव केला आहे. म्हणजे उद आणि गुलाब या दोन्हींचे मिश्रण करून देस रागाचे अत्तर सिद्ध केले.
म्हणजे एखाद्या रागाचे अत्तर बनवतांना त्यात २ – ३ सुगंधांचे मिश्रण घेतले आहे. दोन गोष्टी आपल्याला एकच अनुभूती देऊ शकतात.
७. प्रत्येक इंद्रीय एकच अनुभूती देत असून एका मर्यादेनंतर
त्या अनुभूतीला अव्यक्त स्वरूप प्राप्त होऊन शेवटी एकच भाव मनात जागृत रहाणे
संत ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे,
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १६
अर्थ : त्याचप्रमाणे हेही लक्षात ठेवा की, भाषेच्या रसाळपणाच्या लोभाने श्रवणेंद्रियांच्या ठिकाणी रसनेंद्रिये येतील आणि या भाषेने इंद्रियांत परस्पर भांडणे चालू होतील.
स्पष्टीकरण : गीतेचे इतके सुंदर निरूपण चालू आहे की, गीतेचा रस ग्रहण करण्यासाठी या रसाळयुक्त लोभासाठी जीभ कान होऊ पहात आहे. सगळी इंद्रीयेच कान होऊ पहात आहेत.
ही ओवी आपल्याला पुष्कळ काही सांगून जाते.
प्रत्येक इंद्रीय आपल्याला शेवटी एकच अनुभूती देते. ही अनुभूती तुम्ही डोळ्यांतून घ्या, दृष्टीक्षेपातून तिचा रस ग्रहण करा किंवा कान, नासिका आणि स्पर्श यांद्वारे घ्या, शेवटी एका मर्यादेनंतर ती अनुभूती अव्यक्त होऊन शेवटी एकच भाव आपल्या मनामध्ये जागृत करते. ती आपल्याला मनाच्या एका स्थितीत घेऊन जाते. त्या वस्तूचे ते अंतिम लक्ष्य आहे. गंधाचेही तसेच आहे. ‘गंध घेतल्यावर आपल्या मनाला काय वाटते ?’, ते महत्त्वाचे आहे.
८. गंधशास्त्राचा अभ्यास
८ अ. सर्व प्रकारच्या गंधांशी संबंधित अभ्यास असलेले ‘गंधशास्त्रा’चे एक हस्तलिखित मिळणे
मी भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र, ज्ञानेश्वरी, वैशेषिक दर्शन, सांख्ययोग, गीता आणि इतर धार्मिक ग्रंथ वाचले. या सर्व ग्रंथांत गंधशास्त्राचा अभ्यास दिला आहे. ‘गंधशास्त्रा’चे एक हस्तलिखितही (मॅन्युअल स्क्रिप्ट) उपलब्ध असून त्यामध्ये पूर्वीपासून असलेल्या सगळ्या प्रकारच्या गंधांशी संबंधित अभ्यास आहे. थोडक्यात त्या अभ्यासाला ‘त्या त्या काळातील सूत्र (फॉर्म्युला)’ असे म्हणता येईल. ते वाचल्यावर अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या. इंद्रिये आपल्याला एक अनुभूती देतात. एखादा राग ऐकल्यानंतर जी अनुभूती किंवा अनुभव येतो, तो मनातून आलेला असतोे. मग तो प्रसन्नता, आर्तता, व्याकुळता किंवा शृंगारिकता काहीही असू शकते. हेच गंधातूनही जाणवू शकतेे, म्हणजे ‘सुगंध आणि संगीत या दोन्हींत वरील गोष्टी आहेत’, हे मला जाणवू लागले. त्यामुळे मी गंध आणि स्वर यांना एकत्र करण्याचा प्रयत्न चालू केला.
८ आ. सुगंध आणि संगीत यांचा परस्परसंबंध पडताळतांना ध्वनी अन् गंध ही
दोन्ही तत्त्वे वायूशी संबंधित असून ‘ती सगळ्यांत लवकर मनाच्या आत जाणारी आहेत’, हे ध्यानी येणे
‘सुगंध आणि संगीत यांचा एकमेकांशी संबंध आहे, हे खरे आहे का ?’, हे अभ्यासण्यासाठी मी गंधशास्त्र, इतिहास किंवा धार्मिक ग्रंथ यांतील काही संदर्भ शोधले. मला त्यांचा एकत्रित संदर्भ कुठेही न आढळता विखुरलेले संदर्भ सापडले, उदा. पूजा करतांना घंटानाद केला जातो, म्हणजे नाद आला. उदबत्ती लावली जाते किंवा कापूर लावला जातो, म्हणजे तिथे अग्नी आला, वायू आला, तसेच नाद, म्हणजे तिथे आकाशतत्त्वही आले. सगळ्यांत लवकर मनाच्या आत जाणारे तत्त्व आहे, ध्वनी आणि गंध ! याचे कारण ही दोन्ही तत्त्वे वायूशी संबंधित आहेत. ध्वनी वायूद्वारे पुढे जातो आणि गंधसुद्धा हवेच्या, म्हणजे श्वासाद्वारेच पुढे जातो. त्यामुळे हा सगळा कंपनसंख्येशी (‘फ्रिक्वेन्सी’शी) संबंधित खेळ आहे. हा सगळा वैज्ञानिक दृष्टीकोन असून प्रत्यक्षात धर्मामध्येही याविषयीचे अनेक संदर्भ दिले आहेत.
८ इ. विशिष्ट देवतेला विशिष्ट सुगंधी फुले वाहिली जाण्यामागे ‘संबंधित देवता आणि
त्या फुलाचा रंग, गंध, तसेच अन्य गोष्टी यांचा अभ्यास असून ते एक शास्त्र आहे’, असे लक्षात येणे
गंधशास्त्रामध्ये गंधनिर्मिती करतांना भक्तीरसाचे गंधसुद्धा आपल्याकडे दिले आहेत. त्यातून भाव आपोआप जागृत होतोे. आपण देवाला डेलिया, ऑरकेड इत्यादी फुले वाहत नाही; कारण ती कृत्रिम वाटतात आणि त्यांना गंधही नसतो. अपवादात्मक एखादे फूल वगळता देवाला सुगंध असणारी फुले वाहिली जातात. त्यातही विशिष्ट देवतेला विशिष्ट सुगंधी फुलेच वाहिली जातात, उदा. कमळ श्री लक्ष्मीदेवीला वाहिले जाणे, यामागे पुष्कळ सखोल अभ्यास आहे. यात ‘ती संबंधित देवता आणि त्या फुलाचा रंग, गंध, तसेच अन्य गोष्टी यांचा अभ्यास असून ते एक शास्त्र आहे’, असे माझ्या लक्षात आले.
८ ई. एका रागातील भजन किंवा गाणे म्हणतांना रागाचे स्वर तेच असले, तरी त्यातील भाव
पालटत असल्याने प्रत्येक गीतातून अपेक्षित भाव व्यक्त होण्यासाठी गीत योग्य प्रकारे म्हणणे आवश्यक !
गंधशास्त्राचा अभ्यास करतांना मला दोन महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे एकाच रागातील विविध भाव असलेले गाणे म्हणतांना अथवा वाजवतांना त्या स्वरांतून ते आकृतीबंध निर्माण होतात. मी ‘व्हायोलीन’ शिकतांना ते शिकवणार्या ताईंनी मला सांगितले, ‘आपण एखादे भजन म्हणत असतांना त्या भजनातून ईश्वराप्रतीचा भाव जाणवला पाहिजे.’ ‘तो भाव कसा आणायचा ? त्यातील हरकती, मुरक्या (टीप) कशा घ्यायच्या ?’, हे त्यांनी मला शिकवले. एका रागातील भजन किंवा गाणे शिकतांना त्या रागाचे स्वर तेच असतात; मात्र भाव पालटतात, उदा. यमन रागात भक्तीगीते, नाट्यगीते, चित्रपटातील गाणी, तसेच मराठी गाणीही आहेत. राग एकच आहे; पण त्यातून प्रकट होणारा भाव मात्र निरनिराळा आहे. प्रत्येक गीतातून अपेक्षित तो भाव व्यक्त होण्यासाठी ‘त्यातील जागा कशा घ्यायला हव्यात ?’, हे पहायला हवे. आपण भजन म्हणत असल्यास ते एखाद्या चित्रपटातील गीताच्या भावाप्रमाणे म्हणून चालणार नाही.
टीप – १. हरकती : गायन करतांना विविध स्वरसंगती करून गायनात रंगत आणणे
२. मुरकी : गायन आणि वादन करतांना एका स्वरावरून दुसर्या स्वराकडे झटकन वळणे
८ उ. चित्रकाराला अपेक्षित असलेल्या भावानुसार
चित्रातील रंगसंगतीत पालट होऊन चित्राची निर्मिती केली जाणे
दुसरे सूत्र म्हणजे एखाद्या चित्रकाराला सूर्यास्ताचे चित्र रेखाटायचे असेल, तर त्या चित्रात तो ‘सूर्य’ हा केंद्रबिंदू ठेवतो आणि ‘त्या चित्रात सूर्य कशा प्रकारे दाखवायचा ?’, हे ठरवतो. म्हणजे तो सूर्य डोंगरामधील असू शकेल, समुद्र किनार्यावरून दिसणारा असेल, एखाद्या माडातील असेल किंवा शहरातील इमारतींमधून दिसणारा असेल ! सूर्य तोच आहे. अस्तही तोच आहे. केवळ भाव वेगळा आहे. त्या भावानुसार चित्रातील रंगसंगती पालटते आणि चित्र निर्माण होते.
८ ऊ. संगीतातील दिग्गजांची त्या त्या रागाशी होणारी एकरूपता आणि
अभिव्यक्ती अभ्यासल्यावर ‘गंधाची अभिव्यक्तीही कशातून तरी व्हायला हवी’, असे वाटणे
चित्र हे संगीतातूनही निर्माण होते. संगीतातील अनेक दिग्गज सांगतात की, त्यांना राग दिसतो, उदा. पंडित कुमार गंधर्व म्हणायचे, ‘‘मला राग दिसतो. त्याची आकृती दिसते.’’ पं. भीमसेन जोशी आणि किशोरीताई आमोणकर म्हणायच्या, ‘‘आम्ही ज्या रागात जातो तो राग जणू आमच्याशी बोलतो. राग जर प्रसन्न असेल, तर रागाचे सादरीकरण छान होते आणि तो प्रसन्न नसेल, तर चांगल्या प्रकारे सादर होत नाही.’’ त्या त्या भावाची ही तरलता, हेच त्या रागाचे वैशिष्ट्य आहे. रागाला जशी अभिव्यक्ती आहे, रूप आहे, स्वर आहे, त्याचे एक ‘कॅरेक्टर’ आहे, तसेच गंधालाही अभिव्यक्ती आहे, उदा. गुलाब इत्यादी. ‘जर रागाची अभिव्यक्ती सुरांमधून व्यक्त होते, तर गंधाचीसुद्धा कशातून तरी व्हायला हवी’, असे मला वाटले. रागाची चित्रे आहेत. तोडी रागामध्ये हरिण आलेले चित्र आहे. मेघमल्हारच्या रागिणीचे चित्र आहे.
जेव्हा मी हा सगळा अभ्यास केला, तेव्हा मी गंधशास्त्राच्या अधिक जवळ आलो आणि ‘मला काहीतरी मिळाले आहे’, असे मला जाणवले. एखादा चित्रकार सागर तिरावरच्या सूर्यास्ताचे चित्र काढायचे ठरवतो, त्या वेळी ते चित्र साकार होते आणि त्यात चित्राच्या अनुषंगाने समुद्रकिनारा आणि तिरावरील इतर गोष्टीही येतात. रागाचेसुद्धा तसेच आहे. मी व्हायोलीनवर एखादा राग वाजवतांना त्या रागातून तो भाव व्यक्त करण्यासाठी त्या स्वरांतून तशा प्रकारचे आकृतीबंध निर्माण करतो आणि ती अभिव्यक्ती साकार करतो. त्याचप्रमाणे एक विशिष्ट प्रकारचा गंध बनवतांनाही तीच प्रक्रिया होत असते.
I want to purchase anat jog nirmit vividh gandhanche attar please helpe for online purchase