हासन (कर्नाटक) येथील गुरुजी मुरलीकुमार यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

रामनाथी (गोवा) – हासन (कर्नाटक) येथील गुरुजी मुरलीकुमार यांनी त्यांच्या शिष्यांसह १५ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी साधकांवर आध्यात्मिक उपायही केले.

गुरुजी मुरलीकुमार यांचे गुरु डॉ. ब्रह्माजी हिमालयात राहतात. गुरुजी विविध ठिकाणी जाण्यापूर्वी त्यांच्या गुरूंना याविषयी सूक्ष्मातून सांगतात. जेव्हा गुरुजींनी रामनाथी येथे आध्यात्मिक उपायांसाठी जात असल्याचे त्यांच्या गुरूंना सांगितले, तेव्हा त्यांच्या गुरूंनी सनातनच्या आश्रमात आवर्जून जाण्याविषयी सांगितलेे.

गुरुजी मुरलीकुमार महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योतिष विभागातील साधकांना ज्योतिष आणि संख्याशास्त्र यांविषयी अन् आश्रमातील पुरोहित साधकांना यज्ञाशी संबंधित मुद्रा यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी न्युरॉलॉजी, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, स्टोन हिलींग आदी उपाय पद्धतींचाही अभ्यास केला आहे.

 

आध्यात्मिक उपायांची पद्धत

गुरुजी मुरलीकुमार हे आध्यात्मिक उपायांसाठी वापरत असलेली पद्धत शंकराचार्यांचा जन्म होण्यापूर्वीपासून चालू होती. शंकराचार्यांनी ही उपायपद्धत अधिक विकसित केली.

या उपायपद्धतीत शरिराला औषधी वनस्पतीचा लेप लावला जातो. अशा प्रकारचा लेप तिरुपती बालाजीलाही लावला जातो. या लेपामध्ये संजीवनी भुकटी, १६३ वनस्पतींची भुकटी, चंदनाचे तेल, हळद, नवग्रहांचे रत्न, सुवर्ण आणि चांदी यांचे भस्म, तसेच तूप, केशर अन् वेलची असे विविध घटक असतात.

आध्यात्मिक उपाय करण्यासाठी व्यक्तीला चार चक्रांमध्ये बसवले जाते. पहिले चक्र नवग्रहांसाठी, दुसरे ‘स्टार हिलिंग’, तिसरे ‘सूर्य हिलिंग’ आणि चौथे ‘आरोग्य अन् आर्थिक समस्या दूर करण्यासाठी’, असे असते. सर्व चक्रे खडेमिठाने बनवण्यात येतात. सर्व चक्रांच्या मध्यभागी ‘पिरॅमिड’ ठेवून त्यावर उपायांसाठी बसवले जाते.

१. नवग्रहांसाठी बनवण्यात आलेल्या चक्रात १० भाग असतात. ९ भागांत नवग्रहांशी निगडीत नवधान्ये, नवधान्यांची रत्ने आणि ‘पिरॅमिड’ ठेवण्यात येते.

२. ‘स्टार हिलिंग’ चक्राच्या ६ भागांत फुलांच्या पाकळ्या, गहू आणि गव्हाची आेंजी (गव्हाचे दाणे काढल्यावर उरलेली टरफले) ठेवतात. त्यासमवेत १५ कवड्या ठेवण्यात येतात. १५ कवड्यांपैकी ८ श्‍वेत आणि ७ तपकिरी रंगाच्या कवड्या एक आड एक अशा रितीने ठेवण्यात येतात. प्रत्येक भागात क्रिस्टल (पारदर्शक खडा) ठेवण्यात येते.

३. ‘सूर्य हिलिंग’ चक्रात बाहेरून आतपर्यंत एकूण १० चक्रे असतात. पहिले चक्र सीमारूपात, तर आतील ९ चक्रे नवग्रहांसाठी असतात. प्रत्येक चक्रावर ९ मातीचे दीप आणि ६ क्रिस्टल ठेवण्यात येतात. १० चक्रांवर एकूण ९० दिवे आणि ६० क्रिस्टल वापरण्यात येतात. लावण्यात आलेल्या दिव्यांत मध, तेल आणि तूप यांचे मिश्रण वापरण्यात येते. ‘यातून सकारात्मक ऊर्जा दिव्यांकडे खेचली जाते’, असे गुरुजी मुरली यांनी सांगितले.

४. आरोग्य आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठीच्या चक्रात ६ भाग करण्यात येतात. विविध रंगांच्या फुलांच्या पाकळ्यांनी ते भरण्यात येतात.

क्षणचित्रे

१. साधकांना आध्यात्मिक उपायांसाठी लागणारे साहित्य गुरुजींनी स्वत: विविध ठिकाणी जाऊन गोळा केले. याचे संस्थेकडून कोणतेही मूल्य न घेता आध्यात्मिक उपाय केले.

२. विधी चालू होण्याच्या १ दिवस आधीपासून गुरुजी मुरलीकुमार यांनी भोजन न करता सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत साधकांवर सलग उपाय केले. २ दिवसांत त्यांनी केवळ फळांचा रस आणि पेय एवढेच घेतले.

३. गुरुजींच्या उपायांनी अनेक साधकांचा चक्कर येण्याचा त्रास दूर झाला. एका साधकाला आलेला तापही या उपायांमुळे पूर्णपणे गेला, तसेच साधकांना आध्यात्मिक स्तरावरील विविध अनुभूती आल्या.

४. उपायांसाठीच्या चक्रांवर दीप (पणत्या) लावले होते. २ दिवसांत ६०० हून अधिक साधकांवर उपाय करूनही कोणालाही या दीपांची धग लागणे, जळणे, असे झाले नाही. चक्रांच्या मध्यभागी भूमीवर बसायला काही साधकांना अडचण असल्याने त्यांच्यासाठी प्लास्टिकची खुर्ची ठेवली जात होती. या खुर्चीलाही या दीपांची झळ लागली नाही किंवा कोणतीही खुर्ची काळी पडली, असे झाले नाही. चक्रांवरची फुले किंवा फुलांच्या पाकळ्या यांनासुद्धा दिव्याच्या उष्णतेची धग लागली नाही. याविषयी गुरुजी मुरलीकुमार यांना विचारले असता त्यांनी ‘उपायांना प्रारंभ करतांना दीपांची प्राणप्रतिष्ठापना केली होती. त्यामुळे या दीपांनी उपायांसाठी सहकार्य केले’, असे सांगितले.

 

गुरुजी मुरलीकुमार यांचा परिचय

गुरुजी मुरलीकुमार यांनी वास्तुशास्त्र या विषयात पीएच्.डी. केली आहे. आंध्रप्रदेश येथील त्यांचे गुरु डॉ. ब्रह्माजी यांच्या आज्ञेनुसार गेल्या २२ वर्षांपासून ते लोककल्याणासाठी, अभिवृद्धीसाठी समाजसेवेच्या दृष्टीने विनामूल्य कार्यरत आहेत. ते बाधा निवारण, चक्र हिलिंग, आर्थिक समस्या निवारणासाठी हिलिंग आदी प्रकारचे उपाय करतात. त्यांना विविध प्रकारची वाद्ये वाजवता येतात, तसेच ज्योतिषशास्त्र, संख्याशास्त्र यांविषयी त्यांना विपुल प्रमाणात ज्ञान आहे.

Leave a Comment