प्रभु श्रीरामाचे दर्शन । पर्वणी आनंदाची । सद्गुरुद्वयी आशीर्वच घेती । संकल्पपूर्ती समीप आली रामराज्याची ॥
अयोध्या (उत्तरप्रदेश) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पाला प्रभु श्रीरामाचे आशीर्वाद लाभावेत, यासाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील रामललाचे दर्शन घेतले. सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्जी यांनी केलेल्या आज्ञेनुसार सद्गुरुद्वयींनी हे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी अयोध्येतील तीर्थक्षेत्रे आणि शरयूमाता (नदी) यांचेही दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. ‘रामजन्मभूमीच्या संदर्भात ज्या काही घडामोडी घडतील, त्यानंतर हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील घडामोडींना वेग येईल. दोन्ही सद्गुरु अयोध्येत एकत्र गेल्याचा सर्वांत अधिक आनंद परात्पर गुरु डॉ. आठवले यांना होणार आहे. श्रीगुरूंचे रामराज्याचे स्वप्न साकार होण्याची वेळ आता जवळ येत आहे’, असे आशीर्वचन महर्षींनी दिले आहे.
सर्व राज्यव्यवस्थांमध्ये ‘रामराज्य’ ही आदर्श राज्यव्यवस्था आहे. आदर्श राज्यव्यवस्था असलेल्या महान साम्राज्याचे प्रतीक आणि हिंदूंच्या आराध्यदेवतेच्या अवताराची जन्मभूमी असलेली अयोध्यानगरी अंतर्बाह्य हिंदु राष्ट्र स्थापनेतील दीपस्तंभ आहे. या अयोध्यानगरीचे दर्शन ही हिंदु राष्ट्र स्थापनेची नांदीच आहे.