रामनाथी (गोवा) – उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी श्री. रामप्रसाद अडिग यांनी १२ नोव्हेंबर २०१९ या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनच्या साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांनी गुरुजी अडिग यांना आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र-धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांच्या हस्ते गुरुजी अडिग यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
आश्रमभेटीत गुरुजी अडिग यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी आणि ज्योतिष विशारद श्री. राज कर्वे यांना ज्योतिष संशोधन कार्याविषयी मार्गदर्शन केले. आश्रमभेटीच्या वेळी गुरुजींच्या संपर्कातील श्री. रामकृष्ण कलकूर हे उपस्थित होते.
गुरुजी श्री. रामप्रसाद अडिग यांचा परिचय
गुरुजी श्री. रामप्रसाद अडिग हे ‘आगम’ या विषयात पदवीधर आहेत. ‘आगम’ या शास्त्रात देवप्रतिष्ठा, देवालय वास्तू, स्थळशुद्धी आणि मोक्षापर्यंतचे ज्ञान असते. गुरुजींना शैव सिद्धांत तत्त्वशास्त्राची पदवी आहे. ते ज्योतिषी असून त्यांना ऋग्वेदाचे ज्ञान आहे. ते सर्व प्रकारचे धार्मिक विधीही करतात. गुरुजी अडिग यांचे गुरु असलेले त्यांचे वडील गुरुजी अनंतपद्मनाभ अडिग हे गणपति, नारसिंह आणि श्रीचक्र यांची उपासना करतात.
क्षणचित्रे
१. आश्रम पाहिल्यावर गुरुजी श्री. रामप्रसाद अडिग यांनी ‘आश्रमातील स्वच्छता आणि शिस्त आवडली’, असे त्यांनी सांगितले.
२. प.पू. आबा उपाध्ये यांनी दिलेल्या बाणलिंगाचे दर्शन घेतल्यावर गुरुजी अडिग यांनी हे बाणलिंग शंभर टक्के शुद्ध असून त्यात पुष्कळ शक्ती असल्याचे सांगितले.
३. आश्रमातील सूक्ष्म-जगताविषयीच्या प्रदर्शन कक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहात झालेल्या दैवी पालटांविषयीची छायाचित्रे पाहून गुरुजी अडिग म्हणाले, ‘‘अवधूतगीतेमध्ये महात्म्यांची लक्षणे दिलेली आहेत. ती लक्षणे मला प्रत्यक्ष या छायाचित्रांत पहायला मिळाली. हे पाहून मला आनंद झाला.’’
४. सनातन आश्रमभेटीविषयी गुरुजी अडिग म्हणाले की, सध्या मी पुष्कळ व्यस्त असल्याने रामनाथी आश्रमाला ६ मासांनंतर भेट देणार होतो; मात्र मला गणपतीने ६ मास आधीच म्हणजे १२ नोव्हेंबरलाच आश्रमात जाण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे मी येथे लगेच आलो.