‘फलटण (जिल्हा सातारा) येथील सनातन संस्थेच्या ३१ व्या संत पू. (श्रीमती) सरस्वती कापसेआजी (वय ९१ वर्षे) यांनी १३ नोव्हेंबर २०१९ च्या रात्री राहत्या घरी देहत्याग केला. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, २ सुना, ३ मुली, ३ जावई, नातवंडे, नातसुना आणि पतवंडे असा परिवार आहे. पू. कापसेआजी यांच्या पार्थिवावर १४ नोव्हेंबर या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
धर्माचरण, पातिव्रत्य, भावावस्था, प्रेमभाव, अखंड अनुसंधान, संत आणि साधक यांचे आदरातिथ्य करणे, असे विविध गुण असलेल्या पू. कापसेआजी यांनी जुलै २०१३ मध्ये संतपद गाठले होते. पू. आजींची श्री विठ्ठलाप्रती अपार भक्ती होती. बुधवार हा श्री विठ्ठलाचा वार आहे आणि याच दिवशी पू. आजींनी देहत्याग केला. हा योग म्हणजे त्यांच्या भक्तीची श्री विठ्ठलाने दिलेली पोचपावतीच आहे.’
देहत्यागानंतर कुटुंबीय आणि साधक यांना आलेल्या अनुभूती
१. ‘पू. आजींच्या देहत्यागानंतर श्रीकृष्णाचा अखंड नामजप होत होता, तसेच पू. आजींची जपमाळ हातात धरल्यानंतर नामजप चालू झाला. पू. आजींच्या देहत्यागानंतर त्या शांत झोपल्या आहेत, असे जाणवत होते. त्यानंतर काही वेळाने त्यांची सौम्य हालचाल होत आहे, असेही जाणवले.’ – श्री. अभिजीत कापसे (पू. कापसेआजींचा नातू)
२. ‘देहत्यागानंतर पू. आजींचा तोंडवळा अधिक चैतन्यमय जाणवत होता.’ – श्री. आशिष कापसे (पू. कापसेआजींचा नातू)
३. ‘देहत्यागानंतर पू. आजींच्या देहातून चैतन्य प्रक्षेपित होत होते, तसेच त्यांचा देह पुष्कळ हलका झाल्याचे जाणवले. त्यांच्या पार्थिवाजवळ गेल्यावर मला चैतन्याचा लाभ होत होता. (फलटण येथील सौ. सुधा घाडगे यांनाही पू. आजींच्या पार्थिवाजवळ पुष्कळ चैतन्य जाणवत होते.)’
पू. कापसेआजींच्या देहत्यागाविषयी मिळालेली पूर्वसूचना
स्वप्नामध्ये पू. कापसेआजींनी देहत्याग केल्याचे दिसणे
‘१३ नोव्हेंबरला रात्री साखरवाडी (जिल्हा सातारा) येथील पू. कापसेआजींचे जावई श्री. विठ्ठलराव भोसले यांना ‘पू. आजींनी देहत्याग केला आहे’, असे स्वप्नात दिसले आणि सकाळी पू. आजींनी खरोखरच देहत्याग केल्याची वार्ता त्यांना दूरभाषद्वारे समजली.’