गेल्या १०० वर्षांच्या काळात तथाकथित आंग्लाळलेले समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ म्हणवणारी मंडळी, श्रद्धा म्हणजे काय, हे ठाऊक नसतांना अंधश्रद्धेच्या नावाने डांगोरा पिटणारे, तसेच निधर्मी म्हणवणार्या राज्यकर्त्यांनी समाजाला धर्मशिक्षण न दिल्यामुळे अध्यात्म, साधना यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर गैरसमजुती पसरलेल्या आहेत. त्याचा लाभ भोंदू लोकांनाही झाला. परिणामी ते गैरसमज अधिकच दृढ झाले. अशा या गैरसमजुतींविषयी विवेचन येथे देत आहोत.
जिज्ञासूंचे हे गैरसमज दूर होऊन त्यांनी योग्य त्या मार्गाने साधना करावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना !
९. साधनेविषयी अपसमज
हिंदु धर्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधना मार्ग’ सांगितलेले आहेत. त्यामुळे काही जण साधनेच्या संदर्भात ऐकीव माहितीच्या आधारे स्वतःला आकलन झालेले असते, त्याच्या आधारे काही निष्कर्ष काढतात. त्यातून साधनेविषयीही अपसमज आढळून येतात. हे अपसमज आणि त्यांचे खरे स्वरूप येथे जाणून घेऊया.
९ अ. वृद्धापकाळी साधना करू, असा विचार
५० टक्के व्यक्तींना ठाऊक असते की, अध्यात्म हे उपयुक्त आहे; पण त्यांतील ५० टक्के व्यक्ती म्हणतात, ‘आम्ही म्हातारपणी साधना करू.’ यात पुढील चार चुका होतात.
१. आपण वृद्धापकाळापर्यंत जगू याची शाश्वती नसतांना ‘म्हातारपणी साधना करू’, असे ठरवणे.
२. साधना करायला शरीर आणि मन सुदृढ असावे लागते. म्हातारपणात या दोन्ही गोष्टी दुर्बळ होत असल्याने साधना करणे कठीण जाते.
३. म्हातारपणी इतर काही नवीन शिकणे जसे कठीण आहे, तसेच साधना करायला शिकणे, हेही कठीण जाते.
४. म्हातारपणापर्यंत चित्तावर होणार्या संस्कारांची संख्या वाढत जाते. अध्यात्मात तर चित्तावरच्या सर्व संस्कारांचा विरोध करायचा असतो.
९ आ. स्वतःच्या मनाने आपल्या आवडीच्या देवतेची किंवा संतांची साधना करणे
साधना करणार्यांपैकी ७० टक्के असे असतात. स्वतःच्या मनाने आपण औषध घेत नाही, त्याचप्रमाणे स्वतःच्या मनाने साधनाही करून उपयोग नाही. तिचा विशेष लाभ होत नाही आणि मग वाटते की, अध्यात्म, साधना इत्यादी सर्व खोटे आहे. स्वतःच्या मनाला विसरणे, म्हणजे अध्यात्म, असे असतांना स्वतःच्या मनाने साधना करून कसे चालेल ? म्हणूनच अध्यात्मशास्त्र समजून घेऊन किंवा उन्नत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली साधना करणे जास्त फलदायी ठरते.
९ इ. ‘लग्न करू नये’, असे वाटणे
३० टक्के साधकांना वाटते की, अध्यात्मात उन्नती करायची असेल, तर लग्न करू नये. असे वाटणे हे पुढील कारणांसाठी अयोग्य आहे.
१. संसारात राहून साधना केल्यास काही जणांची आध्यात्मिक उन्नती वेगाने (जलद) होते.
२. हिमालयात गेल्यास आपली परीक्षा होत नाही, संसारात पदोपदी होते.
३. अध्यात्मात स्वतःच्या मनाने काही ठरवायचे नसते; कारण स्वतःच्या मनाला नष्ट करणे, मनोलय करणे, म्हणजे अध्यात्म. असे असतांना स्वतःच्या मनाने लग्न न करायचे ठरवणे चूक ठरते. दुसरे असे की, प्रारब्धात लग्न असले, तर त्याच्याविरुद्ध जाता येत नाही आणि लग्न तर होते. मग साधकाला वाटते की, आपण एवढेही बंधन पाळू शकलो नाही. अशा वाटण्याने काही जणांना नैराश्यही येते.
९ उ. व्यवहारात बाधा उत्पन्न होण्याची शंका
‘साधना म्हणून नामजप करायला लागलो, तर आपल्याला व्यवहार करता येणार नाहीत’, असेही काही जणांना वाटते. तेही चूक आहे. ईश्वराच्या नामाने हानी झाली, अशी एकही व्यक्ती मानवजातीच्या इतिहासात झालेली नाही. याउलट नामजप करणार्याचे अवधान वाढून तो व्यवहारही चांगल्या प्रकारे करू शकतो.
१०. भिक्षुक, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांविषयी अपसमज
भिक्षुकी करणारे, तसेच कीर्तन आणि प्रवचन करणारे सर्वच जण आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असतात, असे काहींना वाटते; पण प्रत्यक्षात तसे नसते. भिक्षुकी करणार्या काही जणांना वाटते की, आपल्याला अध्यात्म कळते. प्रत्यक्षात त्यांना कर्मकांडाचे थोडेफार ज्ञान असते. ते तसे करण्यामागील आध्यात्मिक कारण इत्यादी ठाऊक नसते, तसेच बहुतेकांची साधनाही नसते.
ईश्वरीतत्त्वाची अनुभूती नसलेले प्रवचनकार आणि कीर्तनकार अध्यात्मावर पुष्कळ बोलतात. त्यांना गुरु समजून त्यांनी सांगितलेली साधना करण्यात काही जण जीवनातील कित्येक वर्षे फुकट घालवतात.
११. साधकांविषयी अपसमज
एका साधिकेच्या पतीची हत्या झाली. तिने त्याचा शांतपणे स्वीकार केला. तेव्हा आरक्षकांना वाटले, ‘ही इतकी शांत आहे, म्हणजे हिनेच हत्या केली असावी.’ काही जणांना वाटले, ‘हिचे नवर्यावर प्रेमच नव्हते किंवा दुसर्या कोणावर असावे; म्हणून हिला दुःख होत नाही.’ आणखी काही जणांना वाटले, ‘काही काळानंतर तिच्यावर दुःखाचा परिणाम होईल !’ साधनेने धैर्य, सहनशीलता आदी गुण आपोआप येतात, हे साधना न करणार्यांना कसे कळणार ?’
१२. उन्नतांविषयी अपसमज
अ. ‘‘It is shameful that even after almost 45 years of Independence, Sâdhus are determining the fate of the nation.’’ – Jyoti Basu, West Bengal Chief Minister. (Dec. ’92.) (आज स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ ४५ वर्षे होऊनही साधूलोक देशाचे भवितव्य ठरवत आहेत, ही अत्यंत लज्जास्पद (शरमेची) गोष्ट आहे. – ज्योती बसु, मुख्यमंत्री, प. बंगाल. (डिसेंबर १९९२.))
आ. मनोरुग्ण आणि संत : संत हे paranoid schizophrenics (विभ्रमी छिन्नमनस्क) असतात का ? – शिरोडा, दि. २९.९.१९९२.
इ. ‘जगाच्या अंतासंबंधीच्या भाकितांवर विश्वास ठेवणार्यांच्या मनोभूमिकेचा सखोल वेध घेतल्यास त्यांच्या आयुष्यात वैफल्य आढळेल. या वैफल्यामुळेच त्यांनी अशी भाकिते स्वीकारलेली असतात’, असे मत जवाहरलाल नेहरु विद्यापिठाच्या ‘समाजशास्त्र’ विभागाचे प्रमुख प्रा. टी.के. ऊमेन यांचे आहे. अशा प्रकारच्या वैफल्यग्रस्त आणि पळपुट्या मनोवृत्तीचा अयोग्य प्रकारे लाभ घेण्यासाठी स्वयंघोषित गुरूंचा उदय होतो, असा ‘लाईफ पॉझिटिव्ह’ या नियतकालिकाचे मुख्य संपादक श्री. परवीन चोप्रा यांचा प्रतिवाद आहे. अशा गुरूंनी निर्मिलेली संस्था बहुतेक वेळा त्यांना एकनिष्ठ असते. मग हे गुरु आपल्या अनुयायांना एकतर सर्वनाशाच्या मार्गावर नेतात किंवा त्यांचे आर्थिक अथवा लैंगिक शोषण करतात. अशा प्रकारच्या बर्याच गटांमध्ये काही समान दुवे आढळतात, उदा. एकमेव वलयांकित पुरुषी नेतृत्व, शेष समाजापासून अलिप्तता आणि गटाच्या सुरक्षेसाठी काही विविक्षित पद्धतींचा अवलंब. जपानमधील ॐ शिन्री क्यो पंथ, अमेरिकेतील द्राविडी शाखा आणि दक्षिण भारतातील कल्कि संप्रदाय यांचा दुष्प्रवृत्तींच्या नाशासाठी ईश्वर अवतार घेणार, असा विश्वास आहे.
ई. सनातन संस्था या संस्था मानवजातीचा नाश करणार्या उत्क्रांतीवादाचा पुरस्कार करतात. ‘हेवन्सगेट’ सारखे काही इतर गट ‘उडत्या तबकड्या मानवजातीतील दुर्जनतेचा नाश करणार’, असे मानतात.’ (डूम्सडे प्रॉफेसीज फ्रॉम इनसिक्युरिटी, टाइम्स ऑफ इंडिया, १३.१०.२०००.)
उ. संतांविषयी अश्लाघ्य वक्तव्ये
१. ‘प.पू. आसारामजीबापू, प.पू. अनिरुद्धबापू, प.पू. नरेंद्र महाराज आदी संत हे दाऊदइतकेच देशद्रोही आहेत.’ – श्री. निखिल वागळे, संपादक, दैनिक ‘महानगर’
२. ‘आज समाजात संत म्हणवून घेणारे नरेंद्र महाराज, अनिरुद्धबापू यांच्यासारखे संत हरामखोर आहेत.’ – श्री. ज्ञानेश महाराव, संपादक, साप्ताहिक ‘चित्रलेखा’
१३. अध्यात्म शिकवणार्यांविषयी अपसमज
प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्याविषयी अपसमज – ‘डॉक्टर अध्यात्मापेक्षा संमोहनाचा जास्त वापर करतात; म्हणून त्यांच्या व्याख्यानांना / अभ्यासवर्गांना जास्त माणसे येतात.’
(संमोहनाच्या संदर्भात प.पू. भक्तराज महाराज म्हणायचे, ‘‘तुमचे संमोहन, तर आमचे श्रेष्ठ संमोहन !’’ प्रत्यक्षातही संमोहनशास्त्र वापरणार्यांपेक्षा ते न वापरणार्या संतांकडे अनेक पटींनी माणसे गोळा होतात. – डॉ. आठवले)
१४. गुरूंविषयी अपसमज
गुरु आपल्या प्रापंचिक अडचणी दूर करतील, असे काही जणांना वाटते. हे चूक आहे. प्रापंचिक अडचणींशी गुरूंचा संबंध नसतो. त्यांचा संबंध केवळ शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीशी असतो.
अध्यात्मशास्त्र जाणून घ्या, कृतीत आणा आणि आनंद मिळवा !