भावी पिढीला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना शिबिरांचे आयोजन

डावीकडून सौ. मनीषा पाठक, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे

मिरज – सनातनच्या मिरज आश्रमात झालेल्या तीन दिवसीय युवा शिबिराचा ७ नोव्हेंबर या दिवशी समारोप झाला. या वेळी व्यासपिठावर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. मनीषा पाठक आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे उपस्थित होत्या. तीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला.

या प्रसंगी काही शिबिरार्थींनी भावस्पर्शी मनोगत व्यक्त केले. ‘शिबिरामुळे अंतर्बाह्य पालट होण्यास प्रारंभ झाला, व्यष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबून त्याचे गांभीर्य वाढले, एकत्र कुटुंबभावना निर्माण झाली, एकमेकांकडून शिकायला मिळाले’, असे बहुतांश जणांनी सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण मनोगत

१. कु. वरद जोशी, सोलापूर – येथे आश्रम जीवन अनुभवायला मिळाले. यापुढील काळात आयुष्यात कधीच साधना सोडणार नाही. आयुष्यात जे काही करेन, त्याला साधनेची जोड देईन.

२. कु. चंदना काळे – घरी गेल्यावर व्यष्टी-समष्टीची घडी बसवून ध्येय घेऊन साधनेचे प्रयत्न करीन.

३. कु. स्नेहल पाटील – इथे आल्यावर पुष्कळ प्रेम मिळाले. आई-वडिलांची आठवण आली नाही. मी संत होण्याचे ध्येय ठेवले आहे.

४. कु. सुमित पाटील – सनातन संस्थेचा परिवार हाच माझा परिवार आहे. असा परिवार मला मिळाला, याविषयी मी भाग्यवान आहे. (भाव जागृत झाल्याने सुमित अधिक बोलू शकला नाही.)

५. कु. सुप्रिया माळी – साधनेत कुठे अल्प पडते आणि आणखी काय प्रयत्न केले पाहिजेत, ते नेमके कळले. यापुढील काळात अधिकाधिक वेळ सेवा करणार. आश्रमातून जाण्याची इच्छाच होत नाही.

विशेष – अनेक शिबिरार्थींनी ‘राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी पूर्णवेळ देण्याचा निश्‍चय केला आहे’, असे मनोगतात सांगितले.

क्षणचित्रे

१. परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव’ ही ध्वनीचित्र-चकती दाखवल्यावर अनेकांना भावाश्रू अनावर झाले. अनेक शिबिरार्थींना बराच काळ हे भावाश्रू आवरता येत नव्हते.

२. या शिबिरात भाऊ-बहीण आणि बहिणी-बहिणी असे ६ शिबिरार्थी सहभागी झाले होते.

 

प्रत्येक दिवस साधनेसाठी महत्त्वाचा आहे,
असा मनाचा निश्‍चय करून साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

साधना करतांना भाव कसा असावा, यासाठी संत मीराबाईचे आपल्यासमोर आदर्श उदाहरण आहे. आजचे शिबिरार्थीच उद्याची हिंदु राष्ट्रातील भावी पिढी आहे. ईश्‍वरी राज्य चालवण्याची क्षमता साधनेमुळेच निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दिवस साधनेसाठी महत्त्वाचा आहे, असा मनाचा निश्‍चय करून साधना करा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी शिबिरार्थींना केले.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘जो भक्त आहे, त्याचे ईश्‍वर रक्षण करणारच आहे. त्यामुळे ‘मला ईश्‍वरचा भक्त व्हायचे आहे’, असा दृढ निश्‍चय करा. साधनेच्या वाटेवर अडचणी येतील, विचारांचा संघर्ष होईल. यावर ईश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवून मात करण्याचे ध्येय ठेवा. खेळण्याच्या वयात आज तुम्ही सर्व साधना, राष्ट्र-धर्म कार्य करण्याच्या भावनेने प्रेरित आहात, हे पाहून पुष्कळ आनंद झाला. ३ दिवसांच्या कालावधीत तुम्हाला जे जे शिकायला मिळाले, ते ते कृतीत आणून त्याचे अनुकरण करा.’’

 

संतांच्या उपस्थितीत देवद, पनवेल येथील
सनातनच्या आश्रमात युवा साधना शिबिराचे आयोजन

डावीकडून सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि दीपप्रज्वलन करतांना पू. (सौ.) संगीता जाधव

मुंबई – सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत युवा साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात मुंबई, ठाणे, रायगड या तीनही जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी युवक सहभागी झाले होते. सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या वंदनीय उपस्थितीत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात शिबिर पार पडले. शिबिरानंतर सर्वच शिबिरार्थींमध्ये साधनेविषयी ओढ निर्माण झाली.

पहिल्या दिवशी शिबिरार्थी कु. हर्षल भगत याने शंखनाद केला. त्यानंतर संतांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. यानंतर श्री गणेशाच्या श्‍लोकाने शिबिराला प्रारंभ झाला. श्री. मनीष माळी यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन करून शिबिराचा उद्देश सांगितला. तीन दिवसांच्या शिबिरामध्ये जीवनातील साधनेचे महत्त्व, नामजपाचे महत्त्व, आध्यात्मिक उपाय, स्वभावदोष-अहं निर्मूलन प्रक्रिया, भावजागृतीसाठी प्रयत्न, समष्टी सेवेसाठी कौशल्य विकास आदी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 

मन स्थिर राहण्यासाठी साधना करणे अनिवार्य ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावविभोर वातावरणात ‘युवा साधना शिबिरा’चा समारोप !

समारोपीय सत्रात मार्गदर्शन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री. संदीप शिंदे

रामनाथी (गोवा) – मनुष्याला सर्व आपण करतो, असे वाटते; प्रत्यक्षात संपूर्ण जगाचा नियंता भगवंत आहे. भगवंताप्रती ही श्रद्धा असणे म्हणजेच साधना होय. मन स्थिर राहण्यासाठी साधना करणे अनिवार्य आहे. गुरूंनी सांगितलेली साधना करतांना मनोलय आणि बुद्धीलय हे टप्पे आपोआप गाठता येतात, असे मार्गदर्शन सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ३ दिवसीय ‘युवा साधना शिबिरा’च्या समारोपीय सत्रात केले. १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतून युवा साधक सहभागी झाले होते.

समारोपीय सत्रात ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैष्णवी वेसणेकर, कु. प्रियांका महापदी, कु. मधुरा गोखले, अधिवक्त्या (कु.) अदिती पवार, कु. वैदेही शिंदे आणि श्री. राजेश दोंतुल या पूर्णवेळ साधना करणार्‍या युवा साधकांनी त्यांचे अनुभव भावपूर्णरित्या सांगितले. त्यांचे अनुभव ऐकतांना शिबिरार्थींनी ‘भगवंताने यातून आपल्याला काय शिकवले’, हे टिपले आणि साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करण्याचा निश्‍चय केला. अनेक जणांनी त्यांच्या मनातील साधनेविषयीचे प्रश्‍न जिज्ञासेने विचारले. शिबिरार्थींना ‘शिबिर संपूच नये’, ‘साधनेविषयी आणखी शिकावे’, असे वाटत होते. त्यांच्यातील भगवंताप्रती असलेला कृतज्ञताभाव आणि साधनेची तळमळ यांमुळे भावविभोर वातावरणात शिबिराचा समारोप झाला. शिबिर आणि आश्रमजीवन अनुभवल्याने अनेक जणांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय केला.

 

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे

१. संत हे देवाचे सगुण रूप असतात. त्यांच्या माध्यमातून ईश्‍वर आपल्याला साधनेत साहाय्य करतो.

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना एखादा प्रयत्न जमत नसला, तरी जिद्द ठेवायला हवी. देवाला शरण जाऊन प्रार्थना करायला हवी. व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकांचे साहाय्य घ्यायला हवे. ‘आपल्याला प्रयत्न का जमत नाहीत’, याचे चिंतन करायला हवे.

३. सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र येथे साधना करणार्‍या व्यक्ती असतात. त्यामुळे येथे सात्त्विकतेचा स्रोत अधिक असतो. त्यामुळे येथे दैवी वातावरण अनुभवता येते.

४. काही वेळा आपली इच्छा आणि ईश्‍वरेच्छा एकच असते, तर काही वेळा भगवंताचे आपल्या इच्छेपेक्षा निराळे नियोजन असते. त्यामुळे सर्वकाही देवावर सोपवायला हवे. प्रार्थना करतांना ‘स्वत:ला जे वाटते, त्यानुसार व्हावे’, असे मागण्यापेक्षा ‘देवा तुला अपेक्षित आहे, तसे होऊ दे’, अशी प्रार्थना आपण करायला हवी. भगवंत आपल्याला जे देतो, ते आपण आनंदाने स्वीकारूया.

५. साधना करणार्‍या प्रत्येक जिवाचा भगवंताने हात पकडला आहे. त्यामुळे ‘देव आपल्याला काय सांगतो’, ते ऐकायला हवे.

६. कलियुगात एकट्याने साधना करू शकत नाही. त्यामुळे व्यष्टी साधना किंवा समष्टी साधना करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करावे लागतात.

७. जे घडते ते भल्यासाठीच घडते. आपण केवळ आपले क्रियमाण वापरायचे.

८. ८४ लाख योनी फिरून आपल्याला दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे, हेच आपले ध्येय आहे. ईश्‍वरप्राप्तीसाठीच मनुष्यजन्म मिळाला आहे.

९. साधनेच्या स्थितीविषयी आपण सातत्याने विचारायला हवे. जिज्ञासा असेल, तर साधनेत पुढे जाता येते.

१०. साधनेचे प्रयत्न करण्यासाठी सत्संग आवश्यक असतो.

११. शक्य नाही, असे असूच शकत नाही. जेवढे शक्य आहे, तेवढे साधनेचे प्रयत्न आपण करायला हवेत.

१२. आताचा काळ झोकून देऊन साधना करण्यासाठी आहे. स्थिर मनच योग्य निर्णय घेऊ शकते.

१३. सतत शिकण्याची स्थिती असेल, तर उत्साही राहता येते. शिकण्याचा केवळ विचार जरी ठेवला, तरी आपण कुठेही गेल्यास आपल्याला शिकता येते. शिकलेले कृतीत आणले की, देव स्वत:हून पुढच्या टप्प्याचे शिकवतो.

१४. आपल्याला देव आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ देत असतो. देवाकडे काही मागावे लागत नाही. (आपण न मागताच देव आपल्याला भरभरून देतो), ही भगवंताची प्रीती आहे.

१५. मनातील सर्व विचार सांगितल्याने मन लवकर निर्मळ होते. मन निर्मळ झाल्यास साधनेत पुढे जाता येते.

१६. कोणतीही कृती करतांना ‘हे साधनेसाठी पूरक आहे का ?’, असे मनाला विचारायला हवे.

१७. ज्याच्यासाठी अनुभूती आवश्यक आहे, त्याला भगवंत अनुभूती देतो.

१८. समाजात लोक मनाला वाटेल, तसे म्हणजेच स्वेच्छेने वागतात. त्यामुळे ते त्रस्त असतात. आश्रमात साधक ईश्‍वरेच्छेने कृती करतात. त्यामुळे साधक आनंदी असतात.

 

भाव आणि तळमळ असेल, तर साधकत्व निर्माण होऊ शकते ! – सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम

कुडाळ – युवा साधकांना साधनेत पुढच्या टप्प्याला नेण्यासाठी दिशादर्शन करणार्‍या युवा साधना शिबिराची ७ नोव्हेंबरला भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात सांगता झाली. या वेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले, ‘‘आपल्या सर्वांमध्ये ईश्‍वराप्रती भाव असतो. आपल्याला पूर्वसुकृतानुसार मनुष्यजन्म मिळालेला आहे. आपणा सर्वांमध्ये गुण आहेत; मात्र त्यांना योग्य दिशा देणे आपले कर्तव्य आहे. आपल्यात भाव चांगला असायला हवा; कारण ‘भाव तोची देव’ या उक्तीनुसार आपण भाव ठेवला, तर साधना करता येते. भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ही आपली साधना आहे. साधनेत आपणाकडून कोणतीही चूक झाली, तरी ती न लपवता प्रांजळपणे मांडणे हीसुद्धा साधना आहे. मनाने केलेल्या कृतीतून अहंभाव वाढल्याने आपली हानी होते. आपल्यात भाव आणि तळमळ नसेल, तर साधकत्व निर्माण होऊ शकत नाही. आपत्काळात टिकून राहण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment