१. प्रेमभाव
अ. प्रेमभाव हा आजीचा स्थायीभावच आहे. तिच्या मनात प्रत्येक साधक आणि नातेवाईक यांच्या विषयी प्रीतीच आहे. तिच्या प्रत्येक कृतीतून प्रीती जाणवते. तिला कुणाविषयीही पूर्वग्रह नसतो.
आ. आजीनेे माझ्या आईला कधीच ‘सून’ म्हणून वागवले नाही. तिने नेहमीच तिच्यावर मुलीप्रमाणे किंबहुना मुलीपेक्षाही अधिकच प्रेम केले. आमचे कुणीही नातेवाईक साधनेत नाहीत, तरीही त्यांना वाटते, ‘सासू असावी, तर अशी (म्हणजे आजीसारखीच) आणि आई असावी, तर तीही आजीसारखीच !’
इ. आमच्या घरात, म्हणजे आई, बाबा आणि आजी यांच्यात आतापर्यंत कधीही भांडण झाले नाही. या गोष्टीचे आमचे शेजारी आणि नातेवाईक यांना पुष्कळ कौतुक वाटते.
ई. आजी केवळ आध्यात्मिक स्तरावरच नाही, तर व्यावहारिक स्तरावरही आदर्श अशीच वागली. त्यामुळे ती समाजातील लोक आणि नातेवाईक यांच्या कौतुकास पात्र ठरली.
उ. आजी तिच्या नम्र बोलण्यामुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वांची लाडकी आहे. सर्वच नातेवाइकांचा तिच्यावर पुष्कळ जीव आहे. तिने तिच्या सासरच्यांनाही आपलेसे करून घेतले आहे.
२. साधनेतील सातत्य
आजीला गुरुकृपायोगानुसार साधना समजल्यापासून, म्हणजे मागील १५ वर्षांपासून ती पहाटे उठून मानसपूजा, नामजप, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन, सारणी लिखाण, हे सर्व व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करते. रात्री झोपायला कितीही उशीर झाला, तरी ती तिचे सारणी लिखाण करूनच झोपते आणि दुसर्या दिवशीच्या नियोजनातही खंड पडू देत नाही. तिने वरील प्रयत्नांत एकही दिवस खंड पडू दिला नाही. रुग्णाईत (आजारी) असतांनाही ती हे सर्व प्रयत्न करते. त्यात ती कधी सवलत घेत नाही. एखाद्या दिवशी तिचे प्रयत्न झाले नाहीत, तर तिला त्याची पुष्कळ खंत वाटते.
३. सकारात्मक राहून परिस्थिती स्वीकारणे
३ अ. आनंदाने आणि सकारात्मक राहून संसार करणे
आजी तिच्या लहानपणी मोठ्या घरात आणि एका मोठ्या कुटुंबात राहिली अन् वाढली होती; पण लग्नानंतर काही अडचणींमुळे तिला आमच्या काही नातेवाइकांच्या घरात १ – २ खोल्यांत राहावे लागले. याविषयी तिने आजोबांकडे कधीच गार्हाणे (तक्रार) केले नाही. तिने आनंदाने आणि सकारात्मक राहून संसार केला. ती सर्व गोष्टी आहेत, तशा स्वीकारून निरंतर साधना करते.
३ आ. प्रिय नातीचे पूर्णवेळ साधनेसाठी आश्रमात राहणे सहज स्वीकारणे
मी लहानपणापासून आजीसमवेत आहे. तिला सोडून मी कधीच कुठे गेले नव्हते. त्यामुुळे मी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी येतांना तिला एकदम भरून आले; पण तिने त्यावरही मात केली. आता मी कधी घरी गेले, तर ती मला म्हणते, ‘‘तू अल्प (थोड्या) दिवसांसाठीच घरी येत जा. तुझा येथेे वेळ जातो. तू पूर्णवेळ साधनाच केली पाहिजे.’’ माझ्यावर तिचा पुष्कळ जीव असतांना माझे पूर्णवेळ आश्रमात येऊन राहणे तिने सहज स्वीकारले आणि ‘त्यागातच खरे प्रेम आहे’, याची मला जाणीव करून दिली.
४. सेवेची तळमळ
आजी पूर्वी प्रसारात वितरण कक्ष (स्टॉल) लावणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, अशा सेवा करायची. आता तिला तेे जमत नाही. त्यामुळे ती मला, आईला आणि बाबांना सांगते, ‘‘तुम्ही बाहेर जाऊन सेवा करा आणि घरीही सेवा करा.’’ ती मध्यंतरी काही दिवस रुग्णाईत असल्यामुळे आम्ही घरी थांबायचो. तेव्हा ती देवाला सतत प्रार्थना करायची, ‘देवा, मला लवकर बरे कर. माझ्यामुळे इतरांची सेवा थांबू नये’ आणि आम्हालाही सांगायची, ‘‘तुम्ही माझ्यासाठी घरी थांबू नका. तुम्ही सेवांनाच प्राधान्य द्या.’’
५. शिकण्याची वृत्ती
ती दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातून साधनेच्या दृष्टीने शिकण्याचा प्रयत्न करते. आम्ही मनोरंजन म्हणून कार्यक्रम पाहतो; पण ती त्यातूनही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते.
६. अहं अल्प असणे
आजी सतत काही ना काही वाचत असते. साधनेत येण्यापूर्वीपासून तिला वाचन करायला पुष्कळ आवडते. तिने अनेक ग्रंथ आणि पुस्तके वाचली आहेत. त्यामुळे तिला अनेक विषयांचे ज्ञान आहे; पण याचा तिला थोडाही अहं नाही. तिच्या बोलण्यात नेहमी ‘मला काहीच येत नाही. मला काहीच कळत नाही’, अशी वाक्ये असतात.
७. स्वतःला पालटण्याची तळमळ
मध्यंतरी काही दुःखद घटनांमुळे आजीची मनस्थिती ठीक नव्हती. तेव्हा २ वर्षेे तिची आध्यात्मिक पातळी ६९ टक्केच राहिली होती. ती त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा पुष्कळ प्रयत्न करत होती. ती सतत पू. काळेआजी आणि पू. दातेआजी यांना दूरभाष करून ‘‘मी कसे प्रयत्न करू ?’’, असे विचारायची. आमची (मी, आई आणि बाबा यांची) साधना तिच्यापेक्षा अल्प असूनही ती सतत आम्हाला तिच्या चुका विचारत असे. त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी ती अखंड धडपडत होती. ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे चित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथात अनेक संतांची छायाचित्रे होती; पण आजीचे छायाचित्र नव्हते. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘आजी तू संत झालीस की, तुझेही छायाचित्र येईल.’’ तेव्हा ती एकदम रडकुंडीला येऊन म्हणाली, ‘‘मी अजून कसे प्रयत्न करू, ते सांग ना !’’
८. भावपूर्ण स्वयंपाक करणे
आजी अत्यंत उत्तम स्वयंपाक करते. आता वयोमानानुसार तिला अधिक वेळ उभे राहता येत नाही; पण ती सतत काहीतरी करत असते. तिने एखादा पदार्थ भरवला, तर केवळ पोटच नाही, तर मनही भरते. तो पदार्थ नैवेद्य बनवला असल्यासारखाच लागतो. ‘तिचा भाव पूर्णपणे त्या पदार्थात उतरला आहे’, असे वाटते.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा !
मी लहान असतांना ‘आमच्या घरात भांडणे होत नाहीत’, या गोष्टीचेे मला पुष्कळ कुतूहल वाटायचे; कारण आमच्या सभोवतालच्या घरांत होत असलेली भांडणेे माझ्या कानावर सतत पडायची. एकदा मी आजीला विचारले, ‘‘आपल्या घरात भांडणे कशी होत नाहीत ?’’ तेव्हा तिने मला ठामपणे सांगितले, ‘‘आपण सर्वजण साधक असून साधना करतो आणि आपल्या आयुष्यात गुरुदेव आहेत; म्हणून आपल्या घरातील वातावरण इतरांपेक्षा वेगळे आहे.’’ या प्रसंगातून मला तिची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली श्रद्धा, तिला पटलेले साधनेचे महत्त्व आणि तिचे साधनेचे पक्के दृष्टीकोन हे गुण लक्षात आले.
ती मायेपासून पूर्ण अलिप्त आहे. तिला मौजमजा करणे, खाणेपिणे, फिरायला जाणे, या गोष्टीत काडीमात्र रस नाही. ती म्हणते, ‘‘आपला प्रत्येक क्षण परात्पर गुरु डॉक्टरांसाठी आहे.’’
१०. परात्पर गुरु डॉक्टरांंप्रतीचा भाव
अ. आजी प्रतिदिन सकाळी परात्पर गुरु डॉक्टरांची मानसपूजा करते. ती दिवसभर त्यांचे स्मरण करत असते. ती परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलत असतांना पुष्कळ वेळा तिची भावजागृती होते. तेव्हा तिच्या मनातील कृतज्ञताभावाचे दर्शन होते.
आ. ती संत होण्यापूर्वी आमच्या घरी काही दुःखद घटना घडल्या; पण ती आम्हाला सांगायची, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांंचे आपल्याकडे लक्ष आहे. ते यातून मार्ग दाखवतील.’’ यातून तिचा गुरूंप्रती असलेला भाव लक्षात येतो.
इ. आजी शबरीप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर घरी येण्याची प्रतीक्षा करत आहे. तिला वाटते, ‘परात्पर गुरु डॉक्टर स्थूल रूपाने घरी येतील.’ त्यामुळे ती म्हणते, ‘‘आपण आपले घर आश्रमासारखे करूया.’’
ई. आजीला साधक घरी आले की, पुष्कळ आनंद होतो. ती त्यांच्याकडून नवीन गोष्टी समजून घेते. ‘त्यांच्या रूपाने परात्पर गुरु डॉक्टरच घरी आले आहेत’, असे तिला वाटते.
उ. आजी म्हणते, ‘‘भलेही आपले घर वास्तूशास्त्रानुसार नसेल; पण घरात परात्पर गुरुदेवांचा वास आहे; त्यामुळे आपले घर साधनेला पूरक झाले आहे.’’ ‘तिच्या परात्पर गुरुदेवांवरील अनन्य भक्तीमुळेच ते घरात सूक्ष्मरूपाने सदैव वास करतात’, असे वाटते.
११. पू. आजींमध्ये जाणवलेले पालट
अ. पू. आजीची त्वचा एकदम मऊ आणि गुळगुळीत झाली आहे.
आ. पू. आजीचे वय ७५ वर्षे असूनही तिचे केस काळेभोर आहेत.
इ. पू. आजीचा तोंडवळा एकदम उजळला आहे, तिच्या तोंडवळ्यावर वेगळेच तेज आले आहे.
ई. तिच्या बोलण्यात पूर्वीपेक्षा पुष्कळ गोडवा आला आहे. आधीही ती नम्रपणेच बोलायची; पण आता त्यात मृदुता आली आहे.
उ. ती प्रतिदिन देवपूजा करते. देवघरात असलेल्या दत्तगुरूंच्या चित्रात पालट जाणवतो. ते पांढरे झाले आहे. ‘त्यातील चार कुत्रे आणि गाय जिवंत झाले आहेत’, असे वाटते. दत्तगुरूंचे ते चित्र निर्गुणात गेले आहे.
ऊ. साधकांना ‘आजीला सोडून जावे’, असे वाटतच नाही. त्यांचा पाय घरातून निघत नाही.
१२. पू. आजींमुळे घरात झालेले पालट
बाहेरच्या व्यक्ती आणि साधक यांनाही घरात येताच शांत वाटते आणि त्यांच्या मनातील विचार न्यून होतात. घरात आल्यावर सुगंध येेणे, प्रकाश जाणवणे, नामजप चालू होणे, अशा विविध अनुभूती येतात. ‘हे सर्व पालट आजीच्या साधनेमुळे झाले आहेत’, असे वाटते.
१३. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘परात्पर गुरु डॉक्टर, अशी आजी मिळायला कितीतरी जन्म पुण्य करावे लागत असेल. तुमच्या कृपेनेच ते पुण्य तुम्ही माझ्या भाग्यात दिले. आजीविषयी कितीही लिहिले, तरी ते अल्पच आहे. आजी पुष्कळ वेगळी आहे. देवाने मला तिचा सहवास दिला. यातून देवानेच लक्षात आणून दिले की, ‘तिच्यासारख्या व्यक्ती बघायला आणि अनुभवायला मिळण्यासाठीच देवाने माझ्याकडून मागच्या जन्मामध्ये साधना करून घेतली असेल.’
परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या कृपेमुळेच अशी अद्वितीय गुणांचे भांडार असलेली आजी मला मिळाली. यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘माझ्यामध्ये आजीचे गुण यावेत, असे प्रयत्न माझ्याकडून होऊ देत’, असा मला आशीर्वाद द्या आणि ‘तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न माझ्याकडून करवून घ्या’, हीच तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’