कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील हंगरहळ्ळी (कुणीगल तालुका) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे.
श्री विद्याचौडेश्वरीदेवीची मूर्ती
मंदिरातील श्री विद्याचौडेश्वरीदेवीची मूर्ती पंचधातूची असून ती साधारण २.५ फूट उंच आहे. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांनी देवीच्या मूर्तीसंदर्भात पुढील माहिती दिली. काही वर्षांपूर्वी दुसर्या गावातील एका मुसलमान व्यक्तीला तिच्या शेतात देवीची एक मूर्ती सापडली. त्याने ती मूर्ती एका मंदिरात नेऊन दिली. तेथील श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांनी देवीची मूर्ती स्विकारण्यापूर्वी त्या देवीचा कौल घेण्याचे ठरवले. त्यांनी तळ्यातील एका नौकेत मध्यभागी देवीची मूर्ती ठेवली. नौकेच्या दोन टोकांपैकी एका टोकाला स्वामीजी उभे राहिले आणि दुसर्या टोकाला ती मुसलमान व्यक्ती उभी राहिली. ‘नौकेत ठेवलेली देवीची मूर्ती स्वामींच्या दिशेने सरकल्यास देवीची तशी इच्छा आहे’, असे समजून स्वामीजी देवीच्या मूर्तीचा स्वीकार करतील’, असे ठरले. देवीच्या मूर्तीला जेव्हा नौकेत ठेवण्यात आले, तेव्हा ती स्वामीजींच्या दिशेने सरकली. त्यामुळे स्वामीजींनी देवीची मूर्ती स्वीकारली आणि मंदिरात तिची स्थापना केली.
श्री विद्याचौडेश्वरीदेवीची तिच्या भक्तांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची अद्भुत पद्धत !
श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे मंदिर हे अतिशय जागृत स्थान आहे. याची प्रचीती देवीभक्तांना नित्य येते. या मंदिरात बुधवार आणि गुरुवार सोडून अन्य वारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत भाविक त्यांचे प्रश्न विचारू शकतात. श्री विद्याचौडेश्वरी देवीच्या मंदिरात अनेक भाविक येतात. ते देवीपुढे उभे राहून प्रार्थना करतात. भक्त त्यांच्या मनातील प्रश्न वा अडचणी यांविषयी प्रत्यक्ष स्थुलातून काहीच बोलत नाहीत; पण त्यांच्या मनातील विचार देवीला कळतात. देवीसमोरील एका पटलावर हळद पसरलेली असते. भाविकांच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देवी पुढीलप्रमाणे देते. स्वामीजी आणि एक सेवक श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या मूर्तीचे मुख पुढील बाजूला झुकवतात, तेव्हा देवीच्या मूर्तीच्या मुकुटाच्या टोकाने समोरच्या पटलावरील हळदीवर सांकेतिक लिपीत उत्तर आपोआप लिहिले जाते. त्या वेळी स्वामीजी आणि सेवक देवीची मूर्ती धरून ठेवतात. ही सांकेतिक लिपी केवळ स्वामीजींना वाचता येते. स्वामीजी देवीने लिहिलेले उत्तर भाविकांना समजावून सांगतात. अशाप्रकारे देवी तिच्या भक्तांच्या हाकेला ‘ओ‘ देऊन त्यांच्या अडचणी सोडवते.
श्री विद्याचौडेश्वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २४.९.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यु.ए.एस्.
(युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या मूर्तीच्या ‘यु.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यु.ए.एस्.’ (‘यु.टी.एस्.’) उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या मूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.
२ आ १. श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या मूर्तीमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे
तिची प्रभावळ २०.४५ मीटर होती.
२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धूलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.
२ इ १. श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या मूर्तीची एकूण प्रभावळ पुष्कळ अधिक असणे
श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या मूर्तीची एकूण प्रभावळ २८.४५ मीटर होती; म्हणजे सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांच्या तुलनेत मूर्तीची एकूण प्रभावळ पुष्कळ अधिक होती.
३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या मूर्तीमध्ये पुष्कळ चैतन्य असणे
श्री विद्याचौडेश्वरीदेवीची मूर्ती जागृत असून तिच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. देवीच्या मूर्तीमध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने तिच्यामध्ये पुष्कळ (२०.४५ मीटर) सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. (सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.) तसेच देवीच्या मूर्तीची एकूण प्रभावळही (२८.४५ मीटर ) सामान्य व्यक्ती वा वस्तूच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. (सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.)
थोडक्यात, आजच्या विज्ञानयुगातही श्रद्धाळू भक्तांना देवी-देवता कशाप्रकारे साहाय्य करतात, ते या उदाहरणातून लक्षात येते.’