घराच्या सज्जात लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग

१. प्रत्येकालाच अगदी घराच्या सज्जातही लावता येतील,
अशा निवडक औषधी वनस्पती आणि त्यांचे सविस्तर उपयोग

शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये रहात असल्याने त्यांना औषधी वनस्पतींची लागवड करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत पुढील १० वनस्पतींची कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लागवड करून त्या वनस्पती घराच्या सज्जामध्ये (बाल्कनीत) ठेवता येतील. यांपैकी गुळवेल, जाई, विड्याच्या पानांची वेल आणि कांडवेल या वनस्पतींना वाढीसाठी आधाराची आवश्यकता असते. यासाठी या वेली कुंडीमध्ये लावून सज्जाच्या गजांवर सोडाव्यात. या १० वनस्पती मिळून बहुतेक रोगांवर उपयुक्त असल्याने प्रत्येकानेच या वनस्पती आपल्या भोवताली लावाव्यात. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, त्यांनी अशा वनस्पती घरात न लावता घराभोवती लावाव्यात. यांतील वेली परसातील मोठ्या झाडाच्या (शक्यतो कडुनिंबाच्या) मुळाशी किंवा कुंपणावर लावाव्यात.

 

१ अ. तुळस

 

लॅटिन नाव : Ocimum tenuiflorum

१ अ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पंचांग (टीप)

टीप – पंच म्हणजे पाच आणि अंग म्हणजे वनस्पतीचा भाग. वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल आणि फळ या पाचही भागांना एकत्रितपणे पंचांग असे म्हणतात. औषधी वनस्पतींच्या संदर्भात पंचांग म्हणजे मुळासकट संपूर्ण वनस्पती.

१ अ २ . लागवडीसाठी उपयुक्त अंग : बी किंवा खोडाचे छाट
१ अ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. सर्दी : तुळशीची पाने सावलीत वाळवून त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे. यातील चिमूटभर चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाने ओढावे. सर्दी लगेच न्यून होते.

२. व्रण (जखम) किंवा रक्तस्राव : तुळशीच्या पानांचा रस लावावा.

३. कान दुखणे : तुळस आणि माका यांची पाने एकत्र वाटून त्याचे २ – २ थेंब कानात घालावेत किंवा केवळ तुळशीचा २ थेंब रस कानात घालावा.

४. दमा : प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची ४ पाने चावून खावीत.

५. भूक न लागणे : तुळशीची ४ पाने आणि खडीसाखर एकत्र करून जेवणाच्या अर्ध्या घंट्याआधी चावून खावीत.

 

१ आ. दूर्वा

 

लॅटिन नाव : Cynodon dactylon

१ आ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पंचांग
१ आ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : मूळ असलेला तुकडा
१ आ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. डोकेदुखी : दूर्वांच्या रसात कापराची पूड घालून त्याचा कपाळावर लेप लावावा.

२. नाकाचा घुळणा फुटणे (नाकातून रक्त येणे) : २ – २ थेंब दूर्वांचा रस नाकाच्या मधल्या पडद्यावर दोन्ही बाजूंनी घालावा.

३. वाईट स्वप्ने पडणे : रात्री झोपतेवेळी १ वाटी दूर्वांचा रस प्यावा.

 

१ इ. झेंडू

इ १. लॅटिन नाव : Tagetes erecta

१ इ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पान आणि फूल
१ इ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : बी (वाळलेल्या फुलाच्या पाकळ्या)
१ इ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. व्रण (जखम) :व्रण लवकर भरून येत नसल्यास त्यावर झेंडूच्या पाल्याचा रस लावावा किंवा दूर्वांच्या तेलाप्रमाणेच झेंडूच्या पानाचे तेल करून त्या तेलामध्ये कापूस बुडवून तो व्रणावर ठेवावा आणि पट्टी बांधावी.

२. शीतपित्त (त्वचेवर पित्त उठणे) : झेंडूची फुले आणि पाने यांचा रस अंगाला चोळावा.

 

१ ई. कालमेघ

 

लॅटिन नाव : Andrographis paniculata

१ ई १. औषधासाठी उपयुक्त अंग : पंचांग
१ ई २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : बी
१ ई ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. ताप : कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये मूठभर कालमेघ आणि पाव चमचा सुंठीची पूड २ पेले पाण्यात घालून एक पेला पाणी राहीपर्यंत उकळून काढा करावा. हा काढा अर्धा – अर्धा पेला सकाळ – संध्याकाळ घ्यावा.

२. आम्लपित्त : वाळलेल्या कालमेघाची पूड करून ठेवावी. घशात किंवा छातीत जळजळ होत असल्यास अर्धा चमचा कालमेघाची पूड अर्धा चमचा साखरेसह चघळून खावी.

 

१ उ. पानफुटी (पाणपोय)

लॅटिन नाव : Bryophyllum pinnatum

१ उ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पान
१ उ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : पान किंवा खोडाचे छाट
१ उ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. मूतखडा : सकाळ – संध्याकाळ पाव कप पानफुटीच्या पानांचा रस घ्यावा.

२. आग होणे (दाह) : पानफुटीची पाने ठेचून आग होत असलेल्या भागावर बांधावीत.

 

१ ऊ. कोरफड

लॅटिन नाव : Aloe vera

१ ऊ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पानांतील गर
१ ऊ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : मुळाशी येणारे मुनवे (सकर्स)
१ ऊ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. दमा (अस्थमा) : श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास २ – २ घंट्यांनी चमचाभर कोरफडीचा रस चमचाभर मध आणि अर्धा चमचा तूप घालून द्यावा. यामुळे शौचास साफ होते आणि दम लागणे थांबते.

२. आम्लपित्त : २ चमचे कोरफडीचा रस चवीपुरती खडीसाखर घालून घ्यावा.

३. भाजणे-पोळणे : कोरफडीच्या गरात हळद घालून भाजलेल्या ठिकाणी लावावे. यामुळे भाजलेल्या ठिकाणी जंतूसंसर्ग होत नाही, तसेच थोडेसे भाजले असल्यास त्याचा डागही रहात नाही.

 

१ ए. गुळवेल

लॅटिन नाव : Tinospora cordifolia

१ ए १. औषधासाठी उपयुक्त अंग : कांड (वेलीचा तुकडा)
१ ए २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : खोडाचे छाट
१ ए ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. ताप : कोणत्याही प्रकारच्या तापात गुळवेलीचा बोटभर लांबीचा तुकडा ठेचून त्याचा काढा करून घ्यावा.

२. कावीळ : आठवडाभर अर्धी वाटी गुळवेलीचा रस अर्धा चमचा खडीसाखर घालून प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.

 

१ ऐ. जाई

लॅटिन नाव : Jasminum officinale

१ ऐ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पान
१ ऐ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : खोडाचे छाट
१ ऐ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. तोंड येणे : जाईची पाने वरचेवर चावून थुंकावीत.

२. व्रण : कोणत्याही प्रकारच्या व्रणावर जाईचा पाला वाटून व्रणाची जागा भरेल असा बसवावा किंवा दूर्वांच्या तेलाप्रमाणेच जाईच्या पानांचे तेल करून त्या तेलामध्ये कापूस बुडवून तो व्रणावर ठेवावा आणि पट्टी बांधावी. व्रण लगेच भरून येतो.

 

१ ओ. पानवेल (विड्याच्या पानांची वेल)

लॅटिन नाव : Piper betle

१ ओ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पान
१ ओ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : खोडाचे छाट
१ ओ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. घशामध्ये कफ दाटणे : विडा खावा.

२. भूक न लागणे, सर्दी, कॉलेस्टेरॉल वाढणे, कॅल्शिमची न्यूनता असणे : प्रतिदिन विडा खावा.

 

१ औ. कांडवेल (हाडसांधी)

लॅटिन नाव : Cissus quadrangularis

१ औ १. औषधासाठी उपयुक्त अंग : कांड (वेलीचा तुकडा)
१ औ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : खोडाचे छाट
१ औ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :

१. अस्थिभंग (फ्रॅक्चर) : हाड मोडले असता ते नीट बसवल्यावर २१ दिवस सकाळ – संध्याकाळ अर्धी वाटी कांडवेलीच्या कांडाचा रस घ्यावा. यासाठी कांडवेलीचे कांड कुटून ते शिजवावे आणि वाटून त्याचा रस काढावा. शिजलेला चोथा हाड मोडलेल्या जागी बाहेरून बांधावा. (हाताला प्लास्टर घातलेले असल्यास केवळ पोटात रस घ्यावा.)

 

२. वास्तूशास्त्रानुसार घराच्या विविध दिशांना शुभ फल देणारे वृक्ष

घराजवळ उद्यान (बाग) करायचे असल्यास ते घराच्या डाव्या बाजूला करावे.’

– (संदर्भ : अग्निपुराण, अध्याय २४७)

वरील १० वनस्पतींचे १०० हून अधिक रोगांमध्ये सविस्तर उपयोग
जाणून घेण्यासाठी वाचा सनातन प्रकाशित ग्रंथ औषधी वनस्पतींची लागवड करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’

1 thought on “घराच्या सज्जात लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग”

Leave a Comment