‘सोमवार, ४.११.२०१९ (कार्तिक शुक्ल पक्ष अष्टमी) या उत्तररात्री २९.१८ (मंगळवार, ५.११.२०१९, पहाटे ५.१८) वाजता गुरु हा ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत तेरा मास रहातो. या तेरा मासांच्या मध्यावर असलेल्या दोन मासांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते. २९.३.२०१९ ला रात्री ८.०२ वाजल्यापासून २२.४.२०१९ या उत्तररात्री २५.१५ (रात्री १.१५) वाजेपर्यंत गुरु ग्रहाचा धनु राशीत प्रथम प्रवेश झाला. २२.४.२०१९ या उत्तररात्री २५.१५ (रात्री १.१५) वाजल्यानंतर गुरु ग्रहाचे वृश्चिक राशीत वक्री भ्रमण (विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करणे) झाले. ४.११.२०१९ या उत्तररात्री २९.१८ (मंगळवार, ५.११.२०१९, पहाटे ५.१८) वाजता गुरु हा ग्रह धनु राशीत पुन्हा प्रवेश करणार आहे.
१. गुरु या ग्रहाचा धनु राशीत प्रवेश आणि गुरु ग्रह पालटणे यांचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व
सोमवार, ४.११.२०१९ (कार्तिक शुक्ल पक्ष अष्टमी) या उत्तररात्री २९.१८ (मंगळवार, ५.११.२०१९, पहाटे ५.१८) वाजता गुरु हा ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाल सोमवारी उत्तररात्री ३.२७ पासून मंगळवारी सकाळी ७.०९ पर्यंत आहे. पुण्यकालात जप, दान, पूजा करणे आदी पुण्यकारक आणि पीडापरिहारक आहे. गुरु ग्रह एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करण्याचा हा संधीकाल आहे. संधीकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. गुरु हा सत्स्वरूपाचा कारक ग्रह आहे. ज्या व्यक्तींना या संपूर्ण पुण्यकालात जप करणे शक्य नसेल, त्यांनी न्यूनतम गुरु ग्रहाचा राशीत प्रवेश होण्यापूर्वीची १५ मिनिटे आणि राशीत प्रवेश झाल्यानंतरची १५ मिनिटे जप करावा.
२. ‘गुरु’ या ग्रहाचे महत्त्व !
गुरु हा शुभ ग्रह असून लौकिकदृष्ट्या या ग्रहाला सर्व ग्रहांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदु धर्मामध्ये उपनयन, विवाह आदींसारख्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये गुरुबळ पाहिले जाते. धर्मशास्त्राप्रमाणे कोणतेही शुभकार्य गुरूच्या अस्तामध्ये केले जात नाही. गुरु सत्स्वरूपाचा कारक ग्रह आहे. हा ग्रह आकाशतत्त्वाचा असून आकाशतत्त्व पंचतत्त्वांपैकी सर्वांत श्रेष्ठ तत्त्व होय. हा ग्रह सत्त्वगुणी, व्यासंगी, न्यायी, दयाळू, परोपकारी, महत्त्वाकांक्षी आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे. साधनेसाठी गुरुबळ उत्तम असणे आवश्यक असते.
३. धनु राशीतील गुरूचे होणारे परिणाम !
गुरु हा ग्रह सूर्यमालेतील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. धनु राशीचा राशीस्वामी गुरु ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या ‘मित्र’ आणि ‘शत्रू’ राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा मित्र राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यांसंबंधी शुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. गुरु हा शुभ ग्रह असल्याने प्रत्येक कार्यात गुरुबळ पाहिले जाते. कुंडलीत गुरु ग्रह शुभ असणे महत्त्वाचे असते. शुभ गुरु ग्रहामुळे उच्च शिक्षण, परदेशगमन, प्रसिद्धी, तत्त्वज्ञान, धर्म, कीर्ती, आर्थिक, धार्मिक, तसेच आध्यात्मिक या सर्वच क्षेत्रांत यश मिळते.
४. राशीपरत्वे गुरूची स्थाने
धनु राशीत प्रवेश करणारा गुरु राशीस पहिला, वृश्चिक राशीस दुसरा, तूळ राशीस तिसरा, कन्या राशीस चौथा, सिंह राशीस पाचवा, कर्क राशीस सहावा, मिथुन राशीस सातवा, वृषभ राशीस आठवा, मेष राशीस नववा, मीन राशीस दहावा, कुंभ राशीस अकरावा आणि मकर राशीस बारावा आहे.
५. धनु राशीतील गुरुभ्रमणाचे राशीनुसार परिणाम
अ. गुरु ग्रह कन्या, वृषभ आणि मकर या राशींना अनुक्रमे चौथा, आठवा अन् बारावा येत असल्याने या राशीच्या व्यक्तींनी अन् ज्या राशीच्या व्यक्तींना लोहपादाने गुरु येत आहे, त्यांनी पीडापरिहारार्थ गुरु ग्रहाच्या उद्देशाने जप, दान आणि पूजा अवश्य करावी.
आ. गुरु ग्रह धनु, तूळ, कर्क आणि मीन या राशींना अनुक्रमे पहिला, तिसरा, सहावा अन् दहावा येत असल्याने त्यांनी पुण्यकालात जप, दान अन् पूजा करणे पुण्यकारक आणि पीडापरिहारक आहे.
इ. सिंह, मकर आणि मीन या राशींना गुरु ग्रह सुवर्ण पादाने आला आहे. त्याचे फळ चिंता आहे. सुवर्णपादाने आलेल्या गुरूचे फळ चिंता आहे.
ई. वृषभ, कन्या आणि धनु या राशींना गुरु ग्रह रौप्यपादाने आला असून त्याचे फळ शुभ आहे.
उ. मेष, कर्क आणि वृश्चिक या राशींना गुरु ग्रह ताम्रपादाने आला असून त्याचे फळ श्रीप्राप्ती, म्हणजे लक्ष्मीप्राप्ती – पैसा, धन यांची प्राप्ती इत्यादी आहे.
ऊ. मिथुन, तूळ आणि कुंभ या राशींना गुरु ग्रह लोहपादाने आला आहे अन् त्याचे फळ कष्ट आहे.
६. गुरु ग्रह पालटाच्या कालावधीत करावयाची साधना !
६ अ. गुरु ग्रहाची पीडापरिहारक दाने : सुवर्ण, कासे, पुष्कराज, हरभर्याची डाळ, घोडा, साखर, पिवळे वस्त्र आणि पिवळी फुले.
६ आ. जपसंख्या : एकोणीस सहस्र
६ इ. पूजेसाठी गुरूची सुवर्णाची प्रतिमा वापरावी.
६ ई. गुरु ग्रहाचा पौराण (पौराणिक) मंत्र
देवानां च ऋषीणां च, गुरुं काञ्चनसंनिभम् ।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं, तं नमामि बृहस्पतिम् ॥ – नवग्रहस्तोत्र, श्लोक ५
अर्थ : देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अतिशय बुद्धीवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.
६ उ. गुरूच्या सुवर्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि दान यांचा संकल्प !
६ उ १. दानाचा संकल्प
‘मम जन्मराशेः सकाशात् अनिष्टस्थान-स्थित-गुरोः पीडापरिहारार्थम् एकादश-स्थानवत् शुभफलप्राप्त्यर्थं सुवर्ण-प्रतिमायां बृहस्पतिपूजनं तत्प्रीतिकरं (अमुक) (टीप) दानं च करिष्ये ।
अर्थ : मी ‘माझ्या जन्मपत्रिकेत अनिष्ट स्थानी असलेल्या गुरूची पीडा दूर व्हावी आणि तो कुंडलीतील अकराव्या, म्हणजे ‘लाभ’ स्थानात असल्याप्रमाणे शुभ फल देणारा व्हावा’, यासाठी सुवर्णाच्या गुरुमूर्तीची पूजा अन् ‘गुरु महाराज प्रसन्न व्हावेत’, यासाठी ‘अमुक’ वस्तूचे दान करतो.
टीप : ‘अमुक’ या शब्दाच्या ठिकाणी ज्या वस्तूचे दान करायचे असेल, त्या वस्तूचे नाव घ्यावे.
६ उ २. ध्यान
अहो वाचस्पते जीव सिन्धुमण्डलसम्भव
एह्यङ्गिरससम्भूत हयारूढ चतुर्भुज ।
दण्डाक्षसूत्रवरद कमण्डलुधर प्रभो
महान् इन्द्रेति सम्पूज्यो विधिवन्नाकिनां गुरुः ॥
अर्थ : हे वाचस्पति, तुझा जन्म आकाशगंगेतून झाला आहे. तू चिरंजीव हो. हे अंगिरसपुत्रा, तू अश्वावर आरूढ झालेला आहेस. तू तुझ्या तीन हातांत दंड, जपमाळ आणि कमंडलू धारण केला आहेस. तुझा चौथा हात वर देण्याच्या मुद्रेत आहे. तू महान आहेस. तू ज्ञानाचा स्वामी आहेस. तू देवांचा गुरु आहेस. आम्ही तुझे विधीवत् पूजन करतो.
६ उ ३. दानाचे महत्त्व
बृहस्पतिप्रीतिकरं दानं पीडानिवारकम् ।
सर्वापत्तिविनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम् ॥
अर्थ : गुरु महाराजांना प्रिय असे दान दिल्यावर पिडांचे, तसेच सर्व आपत्तींचे निवारण होते. असे हे दान मी श्रेष्ठ अशा ब्राह्मणाला देत आहे.
७. ग्रहांच्या अशुभ स्थितीत साधनेचे महत्त्व !
गोचर कुंडलीतील (चालू ग्रहमानावर आधारित कुंडलीतील) ग्रह अशुभ स्थितीत असेल, तर साधना न करणार्या व्यक्तीला त्रास अधिक होण्याचा संभव असतो. याउलट साधना करणार्या व्यक्तीला सात्त्विकतेमुळे ग्रहांच्या होणार्या अशुभ परिणामांचा फारसा त्रास होत नाही. या कालावधीत अधिकच त्रास होत असेल, तर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा. वर दिलेला गुरूचा पौराण मंत्रही म्हणू शकतो.
अध्यात्मातील एक वैशिष्ट्य असे आहे की, अनुकूल काळापेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते. त्यामुळे साधकांनी अशुभ ग्रहस्थितीचा मनावर परिणाम करून न घेता साधनेचे प्रयत्न अधिकाधिक वाढवण्याकडे लक्ष द्यावे.’