कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के, तर व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना शिबिरा’ला आरंभ

मार्गदर्शन करतांना पू. अशोक पात्रीकर आणि श्री. संदीप शिंदे

रामनाथी (गोवा) – गुरुकृपायोगानुसार साधनेची २ अंगे आहेत. व्यष्टी साधना म्हणजे वैयक्तिक उन्नतीसाठी करायची साधना, हे पहिले अंग, तर समष्टी साधना म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी करायची साधना, हे दुसरे अंग आहे. नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, प्रीती, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ही सरळ अन् सोपी व्यष्टी साधना आहे, तर धर्मप्रसार करणे, ही समष्टी साधना आहे. व्यष्टी साधनेच्या पायावर समष्टी साधना उभी राहत असल्याने समष्टी साधना करणार्‍यांनी व्यष्टी साधना करणेही आवश्यक असते. कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के, तर व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमात १ नोव्हेंबरपासून ‘युवा साधना शिबिरा’ला आरंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते.

प्रथम शंखनाद करण्यात आला. सनातन संस्थेचे श्री. संदीप शिंदे यांनी शिबिराचा हेतू सांगितला, तर आरोग्य साहाय्य समितीच्या समन्वयक अश्‍विनी कुलकर्णी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिचय आणि सनातन संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. या शिबिरात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment