समाजाला अध्यात्माचे योग्य ते शिक्षण कोठेही न दिले गेल्यामुळे त्याच्या विषयी निर्माण झालेले अज्ञान आणि त्याचा परिणाम म्हणून त्यातून निर्माण झालेली भीती याविषयी बघितले. त्याचाच पुढील भाग म्हणून समाजाची ही स्थिती ओळखून काहींनी त्याचा अयोग्य लाभ घेण्यास प्रारंभ केला; तर काहींनी ‘मला फार कळते’, या आविर्भावात समाजाची दिशाभूल केली. यांमुळे निर्माण होणार्या अयोग्य समजुतींविषयी येथे देत आहोत.

जिज्ञासूंचे हे गैरसमज दूर होऊन त्यांनी योग्य त्या मार्गाने साधना करावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना !
१. अयोग्य लाभ उठवणे
अध्यात्माच्या नावाखाली पैसे मिळवण्याचा धंदा साधारणतः ३० टक्के लोक करतात. यासाठी कुठे योगाचा अभ्यासवर्ग काढ, तर कुठे प्राणायामाचा अभ्यासवर्ग काढ, असे ते करतात. एका प्राणायाम शिक्षणकेंद्रात एकाग्रता, आरोग्य, व्यक्तीमत्त्वविकास अशा निरनिराळ्या १८ विषयांवर प्राणायामाचे अभ्यासवर्ग आयोजित केले जायचे. लोकांना आकृष्ट करण्यासाठी १८ अभ्यासवर्गांची नावे त्यांच्या पत्रकात छापलेली होती. प्रत्यक्षात प्राणायामाविषयी एकाच प्रकारचे विवेचन प्रत्येक अभ्यासवर्गात शिकवले जायचे !
२. फसवणूक
एकंदर साधूंपैकी जवळजवळ ९८ टक्के भोंदू असतात. साधुत्वाच्या नावाखाली ते पैसे कमवतात. एखाद्या स्त्रीचे कोणतेही गार्हाणे असले, तर एक ‘साधू’ तिला ‘योनीपूजा’, म्हणजे तिच्या योनीची त्या साधूने ‘पूजा’ करणे, हा एकच उपाय आहे, असे सांगायचे ! काही ‘साधू’ परीक्षेत चांगले गुण मिळावेत, चांगली चाकरी मिळावी, यांसारख्या व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी गंडे-दोरे देतात. असे करून ते समाजाची फसवणूक करण्यासह समाजाला निष्क्रीय करण्याचे कामही करतात. काही ‘गुरु’ वर्तमानपत्रात विज्ञापन देऊन ‘अमुक वाजता गुरुमंत्र देऊ’ असे प्रकाशित करतात ! ‘आमचे गुरु १५० रुपयांत गुरुमंत्र देतात’, अशा प्रकारची विज्ञापने काही गुरूंचे शिष्य करतात ! ‘स्वतः गंध-टिळे लावून फिरण्यापेक्षा असे वर्तन हवे की, लोकांनी आपल्याला गंध-टिळे लावले पाहिजेत’, हे भोंदू साधूंनी लक्षात ठेवले पाहिजे. तरच त्यांचा स्वतःचा तरी उद्धार होईल !
अशा भोंदू साधूसंतांमुळे खरे संत निष्कारण कुप्रसिद्ध होतात. तसेच अशा भोंदू गुरूंनी सांगितलेली साधना करण्याने काहींची कित्येक वर्षे वाया जातात.
३. अतीशहाणपणा
समाजातील साधारणतः ३० टक्के व्यक्ती अध्यात्माचा थोडाही अभ्यास नसतांना, आपल्याला त्यातले सगळे कळते, असा आव आणून समाजप्रबोधनाचा प्रयत्न करतात, उदा. ‘श्रीराम म्हणजे काय’, याची तोंडओळखही नसतांना एकाने वर्तमानपत्रातील आपल्या लेखात म्हटले होते, ‘राम हा आदर्श नव्हताच. राम हे श्रद्धास्थान असूच शकत नाही… ईश्वर ही कल्पनाच उखडून टाकली पाहिजे’ इत्यादी. दुसरे एक जण म्हणाले, ‘परमेश्वराला रिटायर करा !’
४. आम्हाला काय उपयोग ?
‘ज्यांना अध्यात्माची आवड आहे, त्यांनी त्याचा अभ्यास करावा. आम्हाला त्याचा काय उपयोग’, असे ५५ टक्के व्यक्तींना वाटते. त्यांना हे ठाऊक नसते की, सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात २० टक्के शारीरिक आणि मानसिक समस्या क्रियमाणकर्मातील आध्यात्मिक कारणे सोडून इतर कारणांमुळे निर्माण होतात. उरलेल्या ८० टक्के समस्या निवळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात. याचा अर्थ प्रती पाचांपैकी चार त्रस्त व्यक्ती केवळ साधना करूनच सुखी होऊ शकतात, म्हणजेच आपले कुटुंबीय, शेजारीपाजारी, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यातील प्रती पाचांपैकी चौघांना अध्यात्माची आवश्यकता असते. तसेच साधनेने प्रारब्धभोग भोगण्याची क्षमताही वाढते. अर्थात हे सर्व व्यावहारिक दृष्टीकोनातून आहे. मोक्षप्राप्तीसाठी अध्यात्माला पर्यायच नाही.
५. गुप्तता
अध्यात्मात गुप्तता राखतात, असे काही जणांना वाटते. ‘‘तुमच्या आर्यधर्मातील लोक परमार्थ असा झाकून का ठेवत असतात’’, असे विचारल्यावर त्याविषयी श्री गुलाबराव महाराज म्हणाले, ‘‘वेदान्त हा केवळ बोलण्याचाच विषय आहे, असे ज्याला वाटते, त्याचेच हे म्हणणे आहे. व्यापारामध्येसुद्धा ‘क्रयरहस्य’ (ट्रेड सिक्रेट) म्हणून जर काही आहे, तर ते परमार्थात नसावे, हे तुला कसे वाटते ? तसेच ग्रंथात कितीही लिहिले, तरी कोणत्याच गोष्टी योग्य प्रकारे समजत नसतात. दुसरे, ग्रंथातील ज्ञान अनधिकारी लोकांच्या हाती जात असते. त्यामुळे पुरे परमार्थी नसूनही पुस्तके वाचून नुसते लोकांना ज्ञान सांगणारे निपजत असतात. असे ज्ञान उघडे होऊ लागले, म्हणजे व्यवहाराचेच मूल्य लोकांना अधिक वाटू लागते.’’
सनातनच्या सत्संगामध्ये साधना करतांना येणार्या अडचणी आणि अनुभूती यांचा अर्थ, अध्यात्मविषयक लिखाणांचा भावार्थ, इत्यादीविषयींच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात.