दीपावलीच्या मंगलदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात भावपूर्ण वातावरणात झाले श्री लक्ष्मी-कुबेर पूजन !

श्री लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या वेळी आरती ओवाळतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि आरती म्हणतांना श्री. अमर जोशी

रामनाथी (गोवा) – दीपावलीच्या मंगलदिनी म्हणजे २७ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री लक्ष्मी-कुबेर यांचे पूजन केले. पूजेचे पौरोहित्य श्री. अमर जोशी यांनी केले. ‘श्री महालक्ष्मीदेवीची कृपा व्हावी, अलक्ष्मी (दारिद्य्र) दूर व्हावी आणि धर्मकार्यासाठी समृद्धी लाभावी’, असा संकल्प पूजनाच्या वेळी करण्यात आला.

क्षणचित्रे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धारण केलेल्या ‘श्रीवत्स पदका’चेही पूजन या वेळी करण्यात आले.

२. पूजनाच्या वेळी साधकांना श्री महालक्ष्मीदेवीचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवून तिच्या कृपावर्षावाची अनुभूती आली.

३. पूजनाच्या वेळी ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या देवीच्या ‘हिरण्यवर्णा’ (सुवर्णाप्रमाणे कांती असलेल्या) रूपाप्रमाणे भासत आहेत’, असे साधकांना जाणवले.

४. पूजनस्थळी श्री महालक्ष्मीदेवीप्रती भाव जागृत करणारी भक्तीगीते लावण्यात आली होती.

५. पूजनाच्या दिवशी आश्रमातील लादीवर दैवी कण मिळाले.

 

साधकांनी अनुभवला अलौकिक चैतन्यसोहळा !

‘शिवं भूत्वा शिवं यजेत् ।’ असे उपनिषदांमध्ये म्हटले आहे. याचा अर्थ, शिव म्हणजेच देवाशी एकरूप होऊनच शिवाची (देवाची) पूजा करावी. महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना महालक्ष्मीस्वरूप म्हणून गौरवले आहे. ‘महालक्ष्मीदेवीचे तत्त्व असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीलक्ष्मी-कुबेर यांचे पूजन केले. देवी स्वत:च स्वत:चे पूजन करतांनाचा अलौकिक चैतन्यसोहळा परात्पर गुरूंच्या कृपेने अनुभवायला मिळाला’, असे साधकांना जाणवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment