दिवाळीच्या शुभेच्छा मातृभाषेतून देऊया !

भाषा आणि संस्कृती यांचा संबंध निकटचा आहे. नव्हे नव्हे भाषा, ही संस्कृतीचेच एक अंग आहे. मातृभाषेतून बोलण्यात जो आपलेपणा आहे, तो अन्य भाषेत कुठे ! सध्या इंग्रजीला जागतिक भाषा समजले जाते. त्यामुळे इंग्रजी भाषेतून बोलणे, हे पुढारलेपणाचे लक्षण (?) मानले जाते. अनेकांना मातृभाषेतून बोलणे कमीपणाचे वाटते. त्यामुळे आता सण-उत्सव, वाढदिवस यांच्या शुभेच्छाही इंग्रजीतून दिल्या जातात. सामाजिक प्रसारमाध्यमांवरही शुभेच्छांचे संदेश इंग्रजीतून देण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

सामाजिक प्रसारमाध्यमांतून दिवाळीसारख्या सणांच्या शुभेच्छा देतांना मराठी संदेश पाठवले जातात. मराठी शब्दांची सुरेख गुंफण केलेल्या काव्यमय शुभेच्छांचे दालन विविध संकेतस्थळांवर खुले असते. एकप्रकारे या माध्यमातून मराठी भाषेतील शुभेच्छांचे आदान-प्रदान होते. ही एक सकारात्मक बाजू झाली; मात्र दुसरीकडे एकमेकांना भेटल्यावर बहुतांश जणांच्या तोंडून ‘हॅप्पी दिवाली’ असेच शब्द बाहेर पडतात. केवळ कार्यालयासारख्या ठिकाणीच नव्हे, तर कुटुंब आणि नातेवाईक यांच्यामध्येही अशाच प्रकारे इंग्रजीतून शुभेच्छा दिल्या जातात. यात भर म्हणून कि काय विज्ञापने, दूरचित्रवाणीवरील मालिका यांमधूनही सर्रास ‘हॅप्पी दिवाली’, ‘दिवाली सेलिब्रेशन’ यांसारखे शब्द दर्शकांच्या मनावर नकळतपणे बिंबवले जातात.

दिवाळी, दसरा, गुढीपाडवा यांसह अन्य सण हे हिंदु संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. हे सर्व सण आपण हिंदु संस्कृती आणि तिथी यांनुसार साजरे करतो. या सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी परकीय भाषेचा उपयोग कशासाठी ? ज्याप्रमाणे मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, त्याप्रमाणे अन्य राज्यांत तेथील प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. ‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी; म्हणून मी सदैव प्रयत्न करीन’, अशी प्रतिज्ञा आपण शाळेत म्हणत आलो आहोत. भारतामधील विविध भाषा आणि संस्कृती ही या परंपरांचाच भाग आहे. त्यामुळे त्यांचे पाईक होणे म्हणजे त्यांचा अंगिकार करणे होय. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी, तर अन्य राज्यांत तेथील प्रादेशिक भाषेनुसार सणांच्या शुभेच्छा दिल्या, तर ते खर्‍या अर्थाने संस्कृतीचे पालन ठरेल.

सदिच्छा व्यक्त करतांना मातृभाषेइतके दुसरे आनंददायी माध्यम नाही. मातृभाषेची समृद्ध परंपरा डावलण्यात काय अर्थ आहे ? आपणच आपल्या मातृभाषेची उपेक्षा करणे निश्‍चितच योग्य नाही. त्यामुळे ‘इंग्रजीतून शुभेच्छा दिल्याने काय मोठी हानी होणार आहे’, असा विचार करून दुर्लक्ष करू नका. मराठीप्रेमींनी तरी याचा विचार गांभीर्याने करायला हवा. असाच उथळपणे इंग्रजीचा उपयोग करत राहिलो, तर आपणच आपल्या मराठीचे महत्त्व न्यून करणार आहोत. आता यंदाच्या दिवाळीपासून मराठीतूनच शुभेच्छा देण्याचा निश्‍चय करूया. इतरांनाही मराठीतूनच शुभेच्छा देण्यासाठी प्रवृत्त करूया. ‘शुभ दीपावली’ किंवा ‘दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’, अशा आपल्या गोड, मधुर आणि ‘अमृतातेही पैजा जिंके’, अशा मराठी भाषेतच शुभेच्छा देऊन दिवाळीचा गोडवा आणखी वाढवूया !

– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment