मुलुंड – ‘आजच्या सोहळ्यात ग्रंथ-प्रकाशन करण्यासाठी येणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे ! गुरु आपल्या शिष्याचे चरित्र लिहितात, हे भारतातील इतिहासात प्रथमच झाले आहे. माझ्या गुरूंनी मला साधनारत राहण्यास सांगितले, त्याचा अनुभव मला आज घेता आला. हा माझ्या आयुष्यातील परमोच्च क्षण आहे. हा योगायोग नसून ईश्वरी संकेत आहे’, असे मनोगत ‘अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघा’चे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांनी व्यक्त केले. मुलुंड सेवासंघ येथे २१ ऑक्टोबर २०१९ या दिवशी आयोजित केलेल्या भावसोहळ्यात ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह)’ या चरित्र ग्रंथाच्या खंड १ चे डॉ. जंगम यांच्या हस्ते भावपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. या वेळी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या पू. (सौ.) संगीता जाधव यांसह लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल उपस्थित होते. तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. सुभाष अहिर, श्री. किशोर खंडेलवाल यांच्यासह ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि मुंबई, ठाणे अन् रायगड येथील साधक उपस्थित होते.
ग्रंथ प्रकाशनानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या घेतलेल्या मुलाखतीची ध्वनीचित्र-चकती सर्वांना दाखवण्यात आली. त्यातूनही साधनेतील अनेक सूत्रे सर्वांना शिकायला मिळाली.
सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा
साधनाप्रवास दर्शवणार्या ग्रंथाचे मुखपृष्ठ
संत आणि मान्यवर यांनी व्यक्त केलेले मनोगत
१. पू. (सौ.) संगीता जाधव, सनातन संस्था – साधकांसाठीच स्वतःचे जीवन असल्याचे सांगणार्या सद्गुरु अनुताई !
आजच्या सोहळ्याचा अनुभव अवर्णनीय आहे ! या सोहळ्याच्या माध्यमातून भगवंत एका वेगळ्याच स्थितीत सर्वांना घेऊन गेला आहे. ‘माझे जीवन साधकांसाठीच आहे’, असे सद्गुरु अनुताई नेहमी म्हणतात. साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात, तसेच साधनेतील अडचणींचे निवारण करतात. साधकांची साधनेची वर्तमान स्थिती जाणून घेतात आणि विचारपूस करतात.
२. श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
– १०० पेक्षा अधिक संत निर्माण करणारी संस्था म्हणजे सनातन संस्था !
सनातनच्या आश्रमात गेल्यावर ईश्वरी राज्याच्या मुख्यालयात गेल्यासारखे वाटते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे १०० पेक्षा अधिक संत निर्माण करणारी संस्था म्हणजे सनातन संस्था आहे. या संस्थेस अनेकांनी जोडावे. सनातनचा आश्रम नक्की पाहावा. सनातन संस्थेच्या साधकांना पाहिल्यावरच निर्मळता जाणवते. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे की, वर्ष २०२३ मध्ये ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. ईश्वरी राज्य येणारच ! यासाठी उचललेल्या गोवर्धन पर्वताला काठ्या लावण्याचे काम करावे. सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे अल्पच आहे. हिंदु समाजातील युवक-युवतींना साधनामार्गावर आणण्याचे सेवाभावी कार्य सनातन संस्था करत आहे.
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर – मातीचेही सोने करणारे गुरु आपल्याला लाभले असल्याने त्यांचे सदैव स्मरण करा !
गुरुदेवांच्या कृपेमुळेच आज मी हे क्षण अनुभवत आहे. मला भारावून गेल्यासारखे झाले आहे. भरभरून देणे म्हणजे काय असते ?, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; मात्र आपल्याला मातीचेही सोने करणारे गुरु लाभले आहेत ! त्यांचे स्मरण सदैव करायला हवे. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यास आपल्याला याच जन्मात मोक्षप्राप्ती करता येईल. साधनेत आल्यावर पुष्कळ गोष्टी शिकण्यास मिळाल्या. गुरुदेव एवढे सामर्थ्यवान आहेत की, तेच आपल्याला साधनेतील नवीन गोष्टी शिकवत पुढे पुढे नेत आहेत. आपण चुकल्यावर गुरु पुन:पुन्हा आपल्याला आध्यात्मिक दिशा दाखवतात. परात्पर गुरु पांडे महाराज नेहमी म्हणत, ‘दगडाला शेंदूर फासला जातो, तेव्हा दगडाला ठाऊक असते की, मी दगड आहे.’ या दगडाला आकार देण्यासाठी गुरूंनी घेतलेले कष्ट याप्रसंगी माझ्या डोळ्यांसमोर तरळत होते.