रामनाथी, गोवा – वृंदावन येथील महामंडलेश्वर कापालिक स्वामी बालयोगेश्वरानंद गिरीजी महाराज (औघड) यांनी १० ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. अमोल हंबर्डे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म यांविषयीचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. स्वामीजींनी आश्रमातील राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य जाणून घेतल्यानंतर प्रसन्नता व्यक्त केली. या वेळी स्वामीजींचे शिष्य श्री. उपेंद्र शर्मा हेही उपस्थित होते.
या भेटीच्या निमित्ताने सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते स्वामीजींचा शाल, श्रीफळ आणि हार अर्पण करून सन्मान करण्यात आला, तसेच श्री. शर्मा यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वामीजी म्हणाले, ‘‘विविध पाण्याचे प्रवाह शेवटी समुद्राला येऊन मिळतात. तसे विविध मार्गाने आध्यात्मिक कार्य करणारे शेवटी सनातन संस्थेला येऊन मिळणार आहेत.’’
महामंडलेश्वर कापालिक स्वामी
बालयोगेश्वरानंद गिरीजी महाराज (औघड) यांचा संक्षिप्त परिचय
भगवान राम अवधूतजी महाराज हे महामंडलेश्वर कापालिक स्वामी बालयोगेश्वरानंद गिरीजी महाराज (औघड) यांचे गुरु आहेत. स्वामी गिरीजी महाराज यांनी काशी येथे अघोरी साधनेचे शिक्षण घेतले. त्यांचे वृंदावन येथे ‘अघोर शक्तीपीठ’ आणि ‘अघोर शनिधाम’ हे दोन आश्रम आहेत. स्वामींचे वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही टप्प्याचे सूक्ष्म ज्ञानाद्वारे मार्गदर्शन करू शकतात. स्वामीजींचे विदेशातही शिष्य आहेत. स्वामीजींनी १२६, तर त्यांच्या गुरूंनी २१ सहस्र कुष्ठरोग्यांना आध्यात्मिक उपायांनी बरे केले आहे.