सनातन बनली बालसंतांची मांदियाळी !

 १. पू. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास)

४ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांनी मंगळुरू (कर्नाटक) येथील बालक चि. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले असून ते जन्मतःच संतपदावर विराजमान आहेत’, ही ऐतिहासिक घोषणा केली. मंगळुरू (कर्नाटक) येथे ५.५.२०१७ या दिवशी सौ. भवानी प्रभु (आई) व श्री. भरत प्रभु (वडील) ह्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आपत्काळात साधकांना मार्गदर्शन आणि त्यांचे रक्षण एवढेच या बाळाचे कार्य नाही, तर जगात सर्वत्र हिंदु (सात्त्विक) राष्ट्राची घडी सर्वत्र बसवण्याचे कार्यही हेच बाळ करणार आहे. पू. भार्गवराम यांचे बोलणे, चालणे, वागणे आणि सगळेच असामान्य असल्याचे दिसत होते. कार्यक्रमाच्या वेळी पू. भार्गवराम यांच्या मुखावर आरंभीपासून शेवटपर्यंत हास्यभाव होता. त्यांच्या मुखावर कधी रडण्याचा किंवा नकारात्मक भाव नव्हता. ही अगम्य लीला आहे.

 

२. पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष)

१० सप्टेंबर २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथे ‘जन्मतःच अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले दुसरे बालसंत आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याचे सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले. त्याचे रांगणे, मोहक हसणे, सद्गुरु आणि संत यांच्या बोलण्याला सूचक प्रतिसाद देणे आदी सर्वच त्याच्या अलौकिकत्वाची प्रचीती देत होते ! पुणे (महाराष्ट्र) येथे १० सप्टेंबर २०१८ या दिवशी सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आई) व श्री. अनिरुद्ध राजंदेकर (वडील) ह्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. पू. वामन हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आसंदीला पकडून उभे राहून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. यातून त्यांनी ‘आपले पूर्वजन्मीचे नाते आहे’, असे सर्वांना दर्शवल्याचे उपस्थितांना वाटले. पू. वामन यांना काही न सांगताही विविध प्रसंगांतून जणू त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आतून ओळखले. पू. वामन हे जनलोकातील जीव असून जन्मत:च संत असल्याची आणि ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या सर्वव्यापी कार्याशी निगडित असल्याची प्रचीती या दैवी बाललीलेतून उपस्थित साधकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली.

 

Leave a Comment