केंद्र सरकारने नुकतीच काश्मीरमधील अनेक वर्षे बंद असलेल्या ५० सहस्र मंदिरांचे सर्वेक्षण करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने कलम ३७० हटवल्यामुळे मंदिरे हिंदूंसाठी खुली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘रूट्स इन कश्मीर’चे प्रवक्ते अमित रैना यांनी सांगितले, ‘वर्ष १९८६ नंतर धर्मांधांनी काश्मीरमधील अनेक मंदिरांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मंदिरांची देखभाल करणार्या अनेक हिंदूंना काश्मीर खोरे सोडून पलायन करावे लागले होते. सद्य:स्थितीत त्या मंदिरांचे केवळ ढाचे शेष राहिले आहेत.’
खीर भवानी मंदिर
श्रीनगरपासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या गंदेरबल जिल्ह्यातील तुल्लमुल्ल या गावात काश्मिरी पंडितांचे आराध्यदैवत श्री राग्न्यादेवीचे मंदिर आहे. येथे प्रतिवर्षी खीर भवानी महोत्सव साजरा केला जातो. आतंकवाद्यांकडून या भागात अनेक वेळा आक्रमण केले जात असल्यामुळे प्रशासनाने मंदिर बंद केले होते.
श्री भवानी मंदिर
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये भवानी मंदिर असून वर्ष १९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी काश्मीर खोरे सोडल्यामुळे या मंदिराची देखभाल होत नाही. सद्य:स्थितीत या मंदिराचा केवळ ढाचा शेष आहे.
श्री त्रिपुरसुंदरी मंदिर
कुलगाम जिल्ह्यातील देवसर भागात त्रिपुरसुंदरी मंदिर आहे. या मंदिराची देखभाल करणार्यांनी सांगितले की, आतंकवाद्यांकडून दिल्या जाणार्या धमक्यांमुळे या मंदिरात प्रतिदिन पूजा होत नाही.
श्री ज्वालादेवी मंदिर
पुलवामापासून २० कि.मी. अंतरावर खरेव या गावात श्री ज्वालादेवीचे मंदिर असून ते अनेक वर्षांपासून बंद आहे. हे मंदिर काश्मिरी पंडितांच्या इष्ट देवीचे आहे.
मार्तंड सूर्य मंदिर
दक्षिण काश्मीरमधील मार्तंड भागात असलेले सूर्य मंदिर १ सहस्र ५०० वर्षे पुरातन आहे. या मंदिराची निर्मिती महाराजा अशोक यांच्या मुलाने केली होती. असे म्हटले जाते की, सूर्याचे पहिले किरण येताच राजा स्वतःच्या दिनचर्येचा प्रारंभ सूर्य मंदिरातील पूजेद्वारे करत असे. सद्य:स्थितीत सूर्य मंदिर एका जीर्ण स्वरूपात असून त्याची उंची २५ फूट शेष राहिली आहे.
नारनाग मंदिर
गंदेरबल जिल्ह्यातील कंगन तालुक्यामध्ये नारनाग मंदिर आहे. भगवान शिवाचे हे मंदिर १ सहस्र ५०० वर्षे पुरातन असून मागच्या वर्षी या मंदिराची तोडफोड झाली होती.
शीतलेश्वर मंदिर
श्रीनगरमधील हब्बा कदलमध्ये शीतलेश्वर मंदिर असून ते २ सहस्र वर्षे पुरातन आहे. या मंदिराचीही देखरेख होत नाही.
मट्टन
श्रीनगरपासून ६१ कि.मी. अंतरावर ‘मट्टन’ हे हिंदूंसाठी पवित्र स्थळ मानले जाते. येथे एक शिवमंदिर आणि झरा आहे. हे मंदिर गेली अनेक वर्षे बंद आहे.