सनातन संस्थेच्या विरोधात खोटे आणि अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याचे प्रकरण
फोंडा (गोवा) – सनातन संस्थेच्या विरोधात खोटे आणि अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रविष्ट केलेल्या फौजदारी खटल्यात ‘पुणे टाइम्स मिरर’चे संपादक श्री. सुदीप्त बसू, वार्ताहर विजय चव्हाण, प्रकाशक आणि मुद्रक रणजित जगदाळे यांच्या विरोधात फोंडा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले.
‘पुणे टाइम्स मिरर’ या इंग्रजी दैनिकाच्या १६ जून २०१६ या दिवशीच्या अंकात सनातन संस्थेच्या विरोधात ‘CBI, SIT CONDUCT JOINT SEARCH ON SANATAN SANSTHA’S RAMNATHI ASHRAM IN GOA’ या मथळ्याखाली खोटे आणि अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्तात प्रसिद्ध झाल्याप्रमाणे रामनाथी येथील सनातन आश्रमात सी.बी.आय. आणि एस्.आय.टी. (विशेष अन्वेषण पथक) यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती. असे असतांना सनातन संस्थेची मानहानी करण्याच्या उद्देशाने खोटे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे दैनिक ‘पुणे टाइम्स मिरर’चे संपादक सुदीप्त बसू, वार्ताहर विजय चव्हाण, प्रकाशक आणि मुद्रक रणजित जगदाळे यांच्या विरोधात फौजदारी खटला प्रविष्ट केला आहे. या प्रकरणात आरोपी सुदीप्त बसू, विजय चव्हाण, रणजित जगदाळे हे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात यावे, अशी विनंती सनातन संस्थेचे अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते) यांनी केली. ही मागणी मान्य करून फोंडा येथील फौजदारी न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींच्या विरोधात अजामीनपात्र (नॉन बेलेबल) वॉरंटचे आदेश काढले आहेत.