सनातन परिवाराकडून प.पू. आबा उपाध्ये यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
पुणे – ‘प.पू. सदानंद स्वामी यांचे निस्सीम शिष्य, सनातनवर प्रीतीचा वर्षाव करणारी प्रेमळ वात्सल्यमूर्ती आणि हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी आध्यात्मिक स्तरावर ऊर्जा पुरवणारे थोर संत प.पू. नरसिंह उपाध्ये (प.पू. आबा) (वय ९१ वर्षे) यांनी ४ ऑक्टोबर २०१९ च्या उत्तररात्री देहत्याग केला. वय अधिक असले, तरी अखंड उत्साह, आनंद, चैतन्य, निरागसता आणि वात्सल्य यांचे मूर्तीमंत रूप म्हणजे प.पू. आबा ! प.पू. आबा यांचा आध्यात्मिक अधिकार अत्युच्च होता. ते आणि त्यांची पत्नी कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्या उच्च कोटीच्या साधनेमुळे त्यांच्या निवासस्थानी अनेक दैवी साक्षात्कारही घडत होते. ‘मी तरुण असतो, तर सनातनचे पुष्कळ (आध्यात्मिक) कार्य केले असते’, असे ते नेहमी म्हणायचे. यातूनच त्यांचा सनातनवरील जिव्हाळा आणि हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेची तळमळ व्यक्त होते. ‘हिंदु राष्ट्र केवळ भारतभरात नाही, संपूर्ण पृथ्वीवर अवतरित व्हावे’, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा हा इच्छारूपी संकल्प साधकांना धर्मकार्यासाठी आध्यात्मिक बळ पुरवेल, यात शंका नाही.
प.पू. आबा यांच्या पश्चात त्यांचे पुत्र श्री. उदयकुमार उपाध्ये, सून सौ. भारती उपाध्ये, मुलगी सौ. राजश्री फणसळकर, जावई श्री. श्रीरंग फणसळकर, मुलगी श्रीमती संध्या कोठावळे, मुलगी सौ. विद्या शेवडे, जावई श्री. विनायक शेवडे, मुलगी सौ. तेजश्री पत्की आणि जावई श्री. प्रमोद पत्की, तसेच ११ नातवंडे आणि १५ पतवंडे असा परिवार आहे. प.पू. आबा यांनी देहत्याग केल्याने ते स्थूलातून शरीररूपाने जरी नसले, तरी तत्त्वरूपाने ते कायमच दिशादर्शन करत रहातील.
प.पू. आबा यांनी लौकिक अर्थानेही यशस्वी जीवनक्रमण केले. त्यांना आयुर्वेदिय ज्ञानाचा वारसा होता. त्यांचे वडील आयुर्वेदिक वैद्य होते. प.पू. आबा यांचा संगीताचाही गाढा अभ्यास आणि अधिकार होता. केवळ गायन, वादन नाही, तर आध्यात्मिक दृष्टीकोनातून त्यांनी संगीत साधना केली. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात नाट्यक्षेत्रात कामही केले.
प.पू. आबा यांच्या पत्नी कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी वर्ष १९५४ मध्ये गोरेगाव (मुंबई) येथे नूतन विद्यामंदिरची ‘महाराष्ट्र विद्यालय’ ही शाळा स्थापन केली. ही शाळा स्थापन करण्यापासून नावारूपाला आणण्यामध्ये प.पू. आबा यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईला ‘फॉरेन पोस्ट ऑफिस’मध्ये ते नोकरीसाठी होते. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या गतकाळातील अनेक आठवणी ते साधकांना सांगायचे.
उत्तम स्मरणशक्ती हे त्यांचे अजून एक वैशिष्ट्य ! ९१ व्या वर्षीही ते अनेक प्रसंग दिनांक अन् वर्ष यांसह सांगत असत. त्यांच्या प्रत्येक उदाहरणामध्येच जिवंतपणा आणि उत्साह असायचा. ते अशा पद्धतीने बोलायचे की, संपूर्ण प्रसंगच ऐकणार्याच्या डोळ्यांसमोर उभा रहायचा ! आयुष्यातील प्रत्येक क्षणच ते समरसून जगले. केवळ सनातनच्या साधकांनाच नाही, तर त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला ते आपलेसे करून घ्यायचे.
सहज बोलणे अन् कृती यांतून हितोपदेश करणार्या प.पू. आबा यांच्या चरणी सनातन परिवार नतमस्तक आहे !
प.पू. आबा उपाध्ये यांचे कधीही न विसरता येणारे ज्ञान, प्रेम, त्यांचा जिव्हाळा आणि उत्साह साधकांना प्रेरणादायी ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘पुणे येथील थोर संत प.पू. नरसिंह उपाध्ये (प.पू. आबा उपाध्ये) यांनी ४ ऑक्टोबर २०१९ च्या उत्तररात्री देहत्याग केल्याची वार्ता मला आज पहाटे कळली. प.पू. आबा सनातनच्या कुटुंबातील एक महत्त्वपूर्ण घटक होते. ते सनातनमय झाले होते. त्यांचे कधीही न विसरता येणारे प्रेम, त्यांचा जिव्हाळा आणि उत्साह हा साधकांना प्रेरणादायी आहे.
एक ‘संत’ म्हणून ते अधिकारी होतेच, तसेच विविध विषयांमधील त्यांची जिज्ञासा शिकण्यासारखी होती. कलेमध्ये संगीत क्षेत्रातील त्यांचा अभ्यासही साधकांना मार्गदर्शक होता. प.पू. आबा वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्धही होते. असा त्रिवेणी संगम क्वचित्च एखाद्या संतांमध्ये पाहायला मिळतो.
प.पू. आबांचा आम्हा सर्वांना मोठा आधार होता. कधी काही लागले, तर आम्ही त्यांना हक्काने विचारत होतो आणि त्यांचे मार्गदर्शनही आम्हाला वेळोवेळी लाभत होते.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणार्या प.पू. आबांच्या बोधप्रद चौकटी साधकांना अध्यात्मातील बरेच काही शिकवतात.
त्यांच्या देहत्यागानंतर त्यांचे कार्य सूक्ष्मातून जलद गतीने होणार आहे. रामराज्य येण्यासाठी जसे सगुणातून काही संतांचे मार्गदर्शन आणि चैतन्य आवश्यक आहे, तसेच निर्गुणातूनही आपल्याला मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता लागणार आहे.
‘प.पू. आबांकडून मिळणार्या या आध्यात्मिक ऊर्जेचा सनातन संस्थेच्या ईश्वरी कार्याला आणि सर्व साधकांना पुढेही असाच लाभ होवो’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. आबा उपाध्ये यांचा उच्च आध्यात्मिक अधिकार !
प.पू. आबा यांच्या माध्यमातून प.पू. सदानंद स्वामी (गुरुजी) मौलिक मार्गदर्शन करायचे. त्याविषयीची एक आठवण सांगतांना प.पू. आबा यांचे पुत्र श्री. उदयकुमार उपाध्ये म्हणाले, ‘‘जेव्हा प.पू. आबा यांच्या माध्यमातून सद्गुरुवाणी झाली, तेव्हा मी एकदा गुरुजींना विचारले की, ‘आबांच्या माध्यमातून सद्गुरुवाणी होते; पण आबा विशेष साधना करत नाहीत. तर हे कसे ?’ त्यावर सद्गुरूंनी उत्तर दिले की, प.पू. आबा यांची आधीची साधना इतकी आहे की, त्या साधनेच्या बळावरच मी त्यांना भेटलो आहे.’’
प.पू. आबा उपाध्ये आणि सनातन यांचे अतूट नाते !
प.पू. आबा उपाध्ये यांचा सनातनशी प्रथम परिचय झाल्यापासून ते सनातनमय झाले होते. त्यांनी २ वेळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमास भेट देऊन त्यांच्या पदस्पर्शाने आश्रम अधिक पावन केला. जून २०१९ मध्ये देवद येथील सनातनच्या आश्रमाला, तर जुलै २०१९ मध्ये त्यांनी रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली होती. देवद आणि रामनाथी येथील आश्रमांतील त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडील अमूल्य ज्ञानदानाने साधकांना कृतार्थ केले. ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा’, यासाठी त्यांनी अनेक आध्यात्मिक उपाय सांगितले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रकृतीस्वास्थ्य ठीक नसल्याचे जेव्हा त्यांना कळले, तेव्हापासूनच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रकृती चांगली व्हावी आणि रहावी’, याचा त्यांना ध्यासच लागला होता. ते वेळोवेळी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी लेख लिहून देत असत. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती त्यांचा उत्कट भाव होता. प.पू. आबा यांनी त्यांच्या सेवेची संधी देऊन सनातनच्या साधकांना उपकृतच केले आहे. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.
देहत्यागानंतर प.पू. आबा उपाध्ये यांच्यामध्ये जाणवलेली वैशिष्ट्ये
१. प.पू. आबा यांचा तोंडवळा देहत्यागानंतरही पुष्कळ तेजस्वी दिसत होता. त्यांची त्वचाही मऊ होती. ‘ते केवळ शांतपणे झोपले आहेत’, असेच जाणवत होते.
२. देहत्यागानंतर प.पू. आबा यांचा डावा हात ज्ञानमुद्रेत होता. (प.पू. आबा यांच्या हाताचा अंगठा आणि अंगठ्याशेजारील बोट यांची टोके जोडलेली होती.)
३. प.पू. आबा उपाध्ये यांचे पुत्र श्री. उदयकुमार हे प.पू. आबा यांच्या मुखात तुळशीपत्र ठेवत असतांना तेथे उपस्थित असणारे सनातनचे साधक श्री. केतन पाटील यांना प.पू. आबा यांच्या जिभेवर ‘ॐ’ उमटल्याचे दिसले.
४. ‘प.पू. आबा यांना जो पुष्पहार अर्पण करण्यात आला होता, त्याचा आकारही नागाच्या फण्यासारखा झाला होता’, असे श्री. केतन पाटील यांना जाणवले.’