१. ‘आयुरवस्त्र’ म्हणजे काय ?
‘आयुरवस्त्र’ हा शब्द ‘आयुर’ म्हणजे आरोग्य आणि ‘वस्त्र’ या दोन शब्दांची संधी होऊन बनला आहे. आयुर्वेदात औषधी म्हणून वापरल्या जाणार्या अनेक वनस्पतींच्या अर्कांमध्ये प्रक्रिया केलेल्या कापडाला ‘आयुरवस्त्र’, असे म्हणतात. या कापडापासून विविध प्रकारचे कपडे, पलंगपोस, उशांचे अभ्रे आदी वस्तू बनवतात.
२. आयुरवस्त्राचा इतिहास
आयुरवस्त्र बनवण्याची परंपरा ५ सहस्र वर्षांहूनही अधिक जुनी आहे. केरळमधील थिरूवनंतपूरम् जिल्ह्यातील बलरामपूरम् येथील ‘आयुरवस्त्र’चे निर्माते श्री. राजन् यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी युद्धात पुष्कळ सैनिक एका वेळी घायाळ झाले की, त्यांच्या घावांवर औषधी लेपाच्या पट्ट्या बांधण्यापेक्षा एका मोठ्या जागी त्यांना झोपवायचे आणि औषधी वनस्पतींच्या अर्कांमध्ये बुडवलेल्या मोठ्या वस्त्राने त्यांना झाकले जायचे. या वस्त्राला ‘आयुरवस्त्र’ म्हणत असत. रुग्णाच्या व्याधीनुसार त्यांना विशिष्ट वनस्पतींच्या अर्कात प्रक्रिया केलेली वस्त्रे वापरण्यास देत असत. आयुरवस्त्र शरिराच्या संपर्कात आल्यावर त्वचेतील छिद्रांद्वारे त्यातील सूक्ष्म औषधी घटक शरिरात शोषले जातात, तसेच गंधाद्वारेही औषधी वनस्पतींचे सूक्ष्म अंश शरिरात प्रवेश करतात आणि व्याधीनिवारणास साहाय्य होते. पूर्वी धर्मगुरूंची (विशेषतः सन्याशांची) वस्त्रे रक्तचंदनादी वनस्पतींच्या अर्कांमध्ये प्रक्रिया केलेली आयुरवस्त्रे असत.
३. आयुरवस्त्र बनवणारे श्री. राजन् आणि त्यांचे कुटुंबीय
‘कोणत्या व्याधीसाठी कोणत्या वनस्पतीच्या अर्कात प्रक्रिया केलेले वस्त्र वापरायचे, याचे एक शास्त्र आहे. पिढ्यान्पिढ्यांच्या अनुभवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे श्री. राजन् आणि त्यांचे कुटुंबीय विविध व्याधींनुसार आयुरवस्त्रांची निर्मिती गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. या वस्त्रांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होते; पण विदेशातून या वस्त्रांना चांगली मागणी असल्याने अनेक विक्रेते ही वस्त्रे विदेशात विकतात. त्यामुळे या वस्त्रांना भारतीय पेठेत पुरेशी प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही.
४. आयुरवस्त्र बनवण्याची प्रक्रिया
आयुरवस्त्र बनवणे, ही एक पारंपरिक कला आहे. या वस्त्रांवर प्रक्रिया करण्यासाठी ५० हून अधिक वनस्पतींच्या अर्कांचा उपयोग केला जातो. ‘या प्रक्रियेतील वनस्पती गोळा करणे, त्या साठवणे, त्यांचे कशाय बनवणे, वस्त्र रंगवणे, ते वाळवणे आदी विविध टप्पे, त्यांचा क्रम’ आदींविषयी परंपरागत आचारांचे पालन केले जाते. आयुरवस्त्र बनवण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
४ अ. कोरफड आणि गोअर्क यांनी कापडाचे ‘ब्लिचिंग’ करणे
प्रक्रियेसाठी आणलेल्या कापडामधील दोष दूर व्हावेत, यासाठी कोरफड आणि गोअर्क यांच्या मिश्रणाचा उपयोग करून कापडाचे ‘ब्लिचिंग’ केले जाते.
४ आ. वनस्पतींचा कशाय बनवणे
तुळस, वाळा, कस्तूरी, हळद आदी साधारणपणे ५० प्रकारच्या वनस्पती पाण्यात उकळून त्यांचा कशाय बनवण्यात येतो.
४ इ. कापड रंगवणे
या कशायामध्ये ‘ब्लिचींग’ केलेले कापड भिजवले जाते. कापडाला द्यायचा रंग आणि कापड कोणत्या व्याधीवर उपचार म्हणून वापरायचे आहे, यानुसार विविध प्रकारच्या कशायांचा उपयोग केला जातो.
४ ई. कापड वाळवणे
कशायमध्ये प्रक्रिया केलेले कापड सावलीत वाळवले जाते.
४ उ. वस्त्र बनवणे
वाळलेल्या कापडापासून शर्ट, कुडते, साड्या आदी वस्त्रे, तसेच पलंगपोस, उशांचे अभ्रे आदी बनवतात.
५. आयुरवस्त्राची आणि ते बनवण्याच्या प्रक्रियेतील काही वैशिष्ट्ये
५ अ. आयुरवस्त्रासाठी वापरायच्या वनस्पती
आयुरवस्त्रात प्रक्रियेसाठी सरासरी ५० वनस्पतींपासून बनवलेल्या कशायांचा उपयोग केला जातो. श्री. राजन् आणि त्यांचे कुटुंबीय आयुरवस्त्रासाठी लागणार्या वनस्पतींची लागवडही करतात. काळानुसार काही वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. त्यामुळे त्या महागही आहेत, उदा. चंदन आणि रक्तचंदन. वनस्पती मिळवतांना परंपरागत नियमांचे पालन होईल अणि निसर्गाची हानी होणार नाही, याची दक्षता घेतली जाते.
५ आ. आयुरवस्त्राचे रंग आणि त्यांसाठी उपयोगात आणल्या जाणार्या वनस्पती
आयुरवस्त्रासाठी वनस्पतींपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगांचा उपयोग केला जातो. लाल, पिवळा, हिरवा, निळा, काळा आणि पांढरा हे रंग प्रामुख्याने असतात. विविध वनस्पतींच्या मिश्रणातून रंगांच्या विविध छटा बनवल्या जातात. कोणत्या रंगासाठी कोणती वनस्पती वापरतात, या संदर्भात श्री. राजन् यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.
आयुरवस्त्राचा रंग | वनस्पती |
१. लाल | मंजिष्ठा, रक्तचंदन |
२. पिवळा | हळद, डाळींब्याच्या साली |
३. हिरवा | हिना, तुळस |
४. निळा | नीळ |
५. काळा | गूळ, हिरडा आदींचे मिश्रण |
६. आयुरवस्त्रामध्ये सात्त्विकता असण्यामागील अध्यात्मशास्त्र
श्री. राजन् आणि त्यांचे कुटुंबीय ‘आयुरवस्त्र बनवणे’ हा व्यवसाय करत असतांनाही पारंपरिक नियमांचे आणि आचारांचे काटेकोरपणे पालन करत असल्यामुळे त्यांची साधना होत आहे. साधना म्हणून केलेल्या कृतीमध्ये ईश्वराचे अधिष्ठान असते. त्यामुळे अशा कृतीमधून निर्माण होणार्या घटकामध्ये चैतन्य निर्माण होते. त्याचा लाभ तो घटक बनवणार्यालाच नव्हे, तर तो घटक उपयोगात आणणार्यालाही होतो. ‘आयुरवस्त्र बनवणे’ ही सात्त्विक कृती आहे, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.
६ अ. आयुरवस्त्र बनवण्याचा उद्देश सात्त्विक असणे
एखादा घटक उपयोगात आणण्याच्या उद्देशानुरूप त्यामध्ये सात्त्विक, राजसिक किंवा तामसिक स्पंदने येतात. आयुरवस्त्र बनवण्याचा उद्देश ‘व्याधीनिवारण’ हा सात्त्विक आहे. लोकांच्या कल्याणासाठी बनवल्यामुळे आयुरवस्त्रामध्ये सात्त्विकता आली आहे.
६ आ. आयुरवस्त्राच्या निर्मितीतील घटक सात्त्विक असणे
आयुरवस्त्राच्या निर्मितीतील घटक, उदा. वस्त्र, रंग इत्यादी नैसर्गिक आहेत. त्यामुळेही आयुरवस्त्रामध्ये सकारात्मक स्पंदने आली आहेत.
६ इ. आयुरवस्त्र बनवणार्यांनी धार्मिक आचारांचे आणि पारंपरिक पद्धतींचे पालन करणे
आयुरवस्त्र बनवतांना धार्मिक आचारांचे आणि पारंपरिक पद्धतींचे काटेकोरपणे पालन केले जाते. श्री. राजन् आणि त्यांचे कुटुंबीय आवश्यक असलेल्या आयुर्वेदीय वनस्पतींपैकी शक्य तितक्या वनस्पतींची लागवड स्वतः करतात. वनस्पती निवडणे, त्यांवर प्रक्रिया करणे आदी करतांना ते पूर्वापार चालत आलेल्या नियमांचे पालन करतात, तसेच निसर्गाची हानी होणार नाही, याचीही दक्षता घेतात. त्यामुळे त्यांना निसर्गदेवतेचा आशीर्वाद लाभतो.
७. भारतातील प्राचीन विद्या आणि कला यांना अध्यात्माचा
पाया असल्याने त्या चैतन्यमय असणे अन् काळाच्या ओघात टिकून राहू शकणे
भारतातील वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणित आदी विद्या किंवा संगीत, नृत्य, चित्रकला आदी कला यांचा पाया अध्यात्माचा असल्याने ती विद्या किंवा कला साध्य करणार्यांना ईश्वराची, म्हणजेच सर्वोच्च आनंदाची अनुभूती येऊ शकते. अध्यात्माचा पाया असल्यानेच संगीत, नृत्यादी कला अद्याप टिकून राहिल्या आहेत; परंतु सांप्रतकाळी कलेच्या आध्यात्मिक अंगाचा विचार न केल्याने कला ही केवळ अभिव्यक्तीचे, मनोरंजनाचे आणि आर्थिक लाभाचे साधन होऊन राहिली आहे. त्यामुळे अशा कलाकृतींतून कलाकाराला आणि दर्शकालाही चैतन्याची अनुभूती येऊ शकत नाही.’