काशी येथील श्री श्री यती अनिरुद्ध तीर्थ नंदजी महाराज यांची मिरज येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

आक्रमकांनी मोठ्या प्रमाणात हिंदु धर्माची हानी करूनही
सनातन हिंदु धर्म सर्वांना पुरून उरला आहे ! – श्री श्री यती अनिरुद्ध तीर्थ नंदजी महाराज

मार्गदर्शन करतांना श्री श्री यती अनिरुद्ध तीर्थ नंदजी महाराज

मिरज – सध्या हिंदु धर्मावर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत असून सर्वाधिक आक्रमणे उत्तर प्रदेश आणि काश्मीर येथे झाली आहेत. बंगाल आणि बिहार यामार्गे आक्रमक भारतात येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्माची हानी केली. असे असतांना सनातन हिंदु धर्म या सर्वांना पुरून उरला आहे. उत्तरप्रदेशात गायींच्या कत्तली मोठ्या प्रमाणात होत असून त्या थांबवण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी गोशाळा चालू केल्या, अनेक मंदिरे बांधली आणि अन्नछत्रे आरंभली, असे मार्गदर्शन काशी येथील संन्यासी परिव्राजक श्री श्री यती अनिरुद्ध तीर्थ नंदजी महाराज यांनी केले. महाराजांनी ४ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेच्या ब्राह्मणपुरी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

प्रारंभी सनातन संस्थेचे साधक श्री. किरण कुलकर्णी यांनी श्री श्री यती महाराजांची पाद्यपूजा केली. या वेळी त्यांना ‘सनातन पंचाग २०२०’ आणि हिंदी मासिक सनातन प्रभात भेट देण्यात आले.

श्री श्री यती अनिरुद्ध तीर्थ नंदजी महाराज यांना सनातन पंचांग भेट देतांना श्री. आशिष जोशी

 

परिचय

वयाच्या अकराव्या वर्षी श्री श्री यती महाराजांनी संन्यास घेऊन काशीला जाण्यासाठी प्रयाण केले. त्या ठिकाणी वेदांताचे अध्ययन पूर्ण केले. सध्या वेद आणि धर्म यांच्या प्रचारासाठी ते संपूर्ण भारतभर भ्रमण करत आहेत.

विशेष

१. श्री श्री यती महाराजांनी सर्व साधकांची आस्थेने आणि प्रेमाने चौकशी केली. त्यांनी जिज्ञासेने आश्रम पाहिला आणि साधकांचे कौतुक केले.

२. मार्गदर्शनाच्या समारोपप्रसंगी महाराजांनी ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, विश्‍व का कल्याण हो, गोमाता की जय, सनातन धर्म की जय हो’, यांसह काही उद्घोष साधकांकडून करवून घेतले.

सनातन संस्थेच्या वतीने ब्राह्मणपुरी येथील अंबामाता मंदिर परिसरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास श्री श्री यती महाराजांनी भेट दिली. या वेळी त्यांनी ‘बढीया है’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment