अनुक्रमणिका
१. सात्त्विक स्त्रिच्या हातचे अन्न
५. संतांना अर्पण केलेले खाद्यपदार्थ
६. अन्नातील सात्त्विकतेचा विज्ञानात विचार नाही !
स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते. घरच्या अन्नाची सात्त्विकता वाढवण्यासाठी हे अवश्य करावे; तसेच नैवेद्याच्या ताटातील अन्नपदार्थ सर्व अन्नात मिसळणे आदी कृती कराव्यात. येथे सात्त्विक अन्नाचे काही प्रकार पाहू.
स्वयंपाक करतांना नामजप करणे
१. सात्त्विक स्त्रिच्या हातचे अन्न
अ. ‘सात्त्विक स्त्रीच्या हस्तस्पर्शातून अन्नात संक्रमित झालेली सात्त्विक स्पंदने दुसर्याला अन्नग्रहणातील आनंद देतात.
आ. हे अन्न रज-तम विरहित असल्याने जास्त चविष्ट लागते.
इ. या अन्नाच्या सेवनाने देहातील पाचकरस-निर्मिती प्रक्रियाही निर्धोक होत असल्याने ती अन्नपचनातील वाईट शक्तींचे अडथळे दूर करू शकते.
अशा स्त्रीने बनवलेले अन्न सेवन करणे, हे आध्यात्मिकदृष्ट्याही बलवर्धक असते.
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ शुद्ध पंचमी ८.६.२००८, सायं. ७.०९)
२. नैवेद्याचे अन्न
नैवेद्याचे ताट
नैवेद्याच्या ताटातील पदार्थांमध्ये –
अ. तिखट आणि मीठ यांचा वापर अल्प करतात़
आ. तेलाच्या ठिकाणी तुपाचा वापर करून पदार्थ अधिक सात्त्विक बनवतात.
तिखट, मीठ, तेल यांसारखे रज-तमयुक्त घटक टाळून केलेल्या किंवा त्यांचा वापर अल्प प्रमाणात केलेल्या अन्नपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. हे अन्न देवाला दाखवल्यामुळे त्या देवतेचे तत्त्व त्यात येते आणि त्या अन्नाची सात्त्विकता अधिकच वाढते. हे अन्न, उदा. त्यातील भात स्वयंपाकघरातील सर्व भातात मिसळला की, जेवणात भात घेणार्या सर्वांनाच सात्त्विकता मिळते. अशी कृती नैवेद्याच्या ताटातील अन्य पदार्थांविषयीही करावी.
३. तूप वाढलेले अन्न
तूप वाढलेले अन्न
अन्नावर वाढलेले तूप अन्नशुद्धी करते, तसेच शरिराला स्नेह आणि सात्त्विकता प्रदान करते. वरण-भातावर ‘अन्नशुद्धी’ या नावाने तूप वाढण्याची पद्धत आहे. तूप हे अन्नशुद्धीकारक असल्याने ते खाल्ल्यावर अन्नातीलच नव्हे, तर अन्न पोटात गेल्यावर, तेथीलही बाधाकारक गोष्टींचा नाश करते.
४. संतांच्या आश्रमातील अन्न
संतांच्या आश्रमातील अन्न हे नामजप करत बनवलेले असते. तेथील सात्त्विक वातावरणाचा, तसेच त्या संतांचे भक्त / साधक यांच्या प्रेमभावाचाही त्या अन्नावर चांगला प्रभाव असतो.
अनुभूती
आश्रमात अल्प जेवूनही उत्साह पूर्वीपेक्षा जास्त असणे
‘पूर्वी आश्रमात आवडता पदार्थ बनवला की जास्त जेवायचो आणि नावडता पदार्थ बनवला की थोडे जेवायचो. आताच्या स्थितीला पदार्थ आवडता असो वा नावडता, तेवढेच जेवण जाते. सद्यस्थितीत जेवणही अल्प (कमी) खातो, तरीही उत्साह पूर्वीपेक्षा जास्त आहे. एक वेळचा अल्पोपहारही (नाश्ताही) घेणे मी थांबवले आहे. ‘हे गुरुदेवा, आमच्या अन्नमय कोषात असणार्या जन्मोजन्मींच्या वासना दूर करणे, आम्हाला शक्यच नाही. आमच्यात तेवढी शक्तीही नाही. केवळ आपल्या कृपेनेच हे शक्य झाले. आमच्यावर आपली कृपा आहे’, यासाठी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. संतोष आनंदा गरुड, नेसाई, गोवा. (वर्ष २००७)
५. संतांना अर्पण केलेले खाद्यपदार्थ
‘मी सुखवस्तू आहे. पाहिजे ते खाऊ शकतो, तरीही महाराजांसमवेत गेल्यावर महाराजांना लोक जे खायला देतात, त्याची चव पोट भरलेले असतांनाही घ्यावी, असे वाटते !’
(भक्तांनी संतांना अर्पण केलेले खाद्यपदार्थ नंतर प्रसाद म्हणून वाटले जातात. संतांना अर्पण केल्यामुळे अशा खाद्यपदार्थांतील सात्त्विकता वाढलेली असते, त्यामुळे पोट भरलेले असतांनाही त्याची चव घ्यावीशी वाटते. – संकलक )
६. अन्नातील सात्त्विकतेचा विज्ञानात विचार नाही !
‘आमचे विज्ञान शरिराच्या विकासाकरिता अन्नाचा उपयोग असल्याचे सांगते, त्या पलीकडे ते जात नाही. अन्नाने मन बनते. अन्न शाकाहारी आणि सात्त्विक असेल, तर मन आणि बुद्धी सात्त्विक होते. अन्नातील सूक्ष्म-भागाच्या परिणामाचा विज्ञानात काही विचार नाही. सात्त्विक अन्नामुळेच योगसाधना होते आणि ईश्वराची प्राप्तीसुद्धा होते.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी